मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

ज्या प्रमाणे  कळीमधून कमळ हळू हळू उमलत जावे, त्याममाणे माझा सर्वांगीण विकास हळूहळू होत होता. माझ्या व्यक्तिमत्वातील सूप्त गुण फुलत होते. नवरत्न दिवाळी अंकाच्या माध्यमातून आमचा छोटासा महिला वाचन कट्टा तयार झाला. त्यामध्ये आम्ही कविता वाचन हिरीरीने करतो. त्यातीलच सौ.मुग्धा कानिटकर यांनी त्यांच्या घरी हॉल मध्ये माझ्या एकटीचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींना आमंत्रित केले होते. त्यामध्ये मी भरतनाट्यम चा नृत्याविष्कार सादर केला आणि कविताही सादर केल्या नाट्य सादर केले.त्या सर्वांनी माझे तोंड भरुन कौतुक केले.त्यांच्या शाब्बासकी मुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले.

त्यापाठोपाठ तसाच कार्यक्रम मिरजेतील पाठक वृद्धाश्रमात मला आठ मार्च महिला दिनी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. सर्व आजी कंपनी मनापासून आनंद देऊन गेल्या आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले.

5 जानेवारी 2020 रोजी आमच्या नवरत्न दिवाळी अंकाच्या पुरस्कार वितरण सोहळा, सेलिब्रिटी श्रीयुत प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याप्रसंगी मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते हे गीत नृत्य रुपात सादर करायला मिळाले.विशेष म्हणजे सुरवाती पासूनच सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा ठेका धरला होता आणि नृत्य संपल्यावर सर्वांनी त्या गाण्याला आणि नृत्याला उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले. अर्थात हे मला नंतर सांगितल्या वर समजल. विशेष म्हणजे श्री प्रसाद पंडित यांनी कौतुकाची थाप दिली आणि मला म्हणाले, ” शिल्पाताई, आता आम्हाला तुमच्या बरोबर फोटो काढून घ्यायचाय.”

माझ्यातील वक्तृत्वकला ओळखून मी सूत्रसंचालन ही करू शकेनअसे वाटल्याने लागोपाठ तीन मोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला दिली गेली. एका नवरत्न दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन गोखले काकू यांच्या मदतीने मी यशस्वी करून दाखवले.ते अध्यक्षांना नाही इतके भावले की त्यांनीच माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.त्यानंतर माझा भाऊ पंकज न्यायाधीश झाल्यानंतर आई-बाबांनी एक कौतुक सोहळा ठेवला होता. त्याचेही दमदार सुत्रसंचलन मीच केले ज्याचे सर्वांनी खूप कौतुक केले. दुसऱ्या दिवशी पंकज दादा मला म्हणाला, ” शिल्पू ने समोर कागद नसतानाही काल तोंडाचा पट्टा दाणदाण सोडला होता.” तसेच माझी मैत्रिण अनिता खाडिलकर हिच्या “मनपंख” पुस्तकाचे प्रकाशनझाले त्यावेळी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन ही मी यशस्वी रित्या पार पाडले.

माझ्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी फक्त आणि फक्त गडद काळोख असूनही मी माझ्या परिचितांच्या कार्यक्रमांमध्ये सुत्रसंचलन रुपी प्रकाशाची तिरीप आणू शकले याचे मला खूप समाधान आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈