सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बुधवारातली खाऊगल्ली-

या परिसराचं प्रमुख आकर्षण म्हणजे ‘ बुवा आईस्क्रीमवाले ‘ मधुर, मुलायम चवीचं असं सुंदर आईस्क्रीम, आम्हा मुलांच जीव की प्राण असलेल्या या दुकानाचे नांव ‘बुवा’ कां ठेवले असेल? हे कोडं सोडवणं आमच्या बुद्धी पलीकडचं काम होत. आमच्यात तशी खूप चर्चाही व्हायची. शेवटी एकाने दिवे पाजळले, दुकानाच्या मालकांच्या भरगच्च मिश्यांमुळे ते ‘बागूल बुवा’ सारखे दिसतात म्हणून असं नाव ठेवलं असावं. पण काही म्हणा, हे ‘बुवा आईस्क्रीमवाले’ पुण्यात खूप प्रसिद्ध होते. धंदाही दणक्यात चालला होता. लग्न मुंजीसाठी मुहूर्ताची पहिली अक्षत कसबा गणपती पुढे असायची. नंतर दुसरा मान होता जागृत ग्रामदैवत तांबड्या जोगेश्वरीचा. भर उन्हांत कसबा गणपती नंतर श्री जोगेश्वरी ला अक्षत देऊन बाहेर पडल्यावर कोऱ्या साडीला खोचलेल्या चार बोटाच्या टिचभर रुमालाने घाम पुसत, नऊवारीचा बोंगा आंवरत, नथीचा आकडा सांवरत वधू माय नवऱ्याला म्हणायची, काय बाई हे ऊन! इश्य! कित्ती उकडतंय ! अहो आपण आइस्क्रीम खाऊया का गडे!” गौरीसारख्या नटून थटून आलेल्या बायकोकडे बघून आणि तिच्या गोड बोलण्याला विरघळून नवऱ्याचं आईस्क्रीमच व्हायच. आणि मग ती जोडी त्या गारव्यात शिरायची. आम्हाला त्यांच्यामागे दुकानात शिरावंस वाटायच. पण फ्रॉकचा खिसा रिकामाच असायचा. मन मारून मग आम्ही प्रसादाचा, खडीसाखरेचा खडा मिळवण्यासाठी देवीच्या गाभाऱ्यात शिरायचो. आईस्क्रीमची किंमत चार आणे बाऊल होती. ते आम्हाला परवडणार नव्हतं त्यापेक्षा फुकटची देवीसमोरची खडीसाखर परवडायची. ‘– दुधाची तहान ताकावर दुसरं काय ‘—- –

टकले आत्या नावाची आमची एक मानलेली आत्त्या होती.. त्यावेळची गर्भ श्रीमंत, दागिन्यांनी नटलेली, आत्त्या कारमधून उतरली की आम्ही विट्टी दांडू फेकून जीव खाऊन पळत सुटायचो. कारचा दरवाजा उघडायला एकमेकांना ढकलत पुढे जायचो. ही आत्त्या आली की आमचा आनंद गगनाला भिडायचा, कारण श्रीमंत माहेरवाशिणीला कान तुटक्या कपातून पांचट दुधाचा चहा कसा काय द्यायचा?अशा धोरणी विचाराने आमची आई सौ. टकले आत्यांकरिता चक्क आईस्क्रीम मागवायची. आम्ही आशाळभूत पणे गुलाबी थंडगार आईस्क्रीम कडे बघत तिथेच घिरट्या घालायचो. आत्याच्या ते लक्षातच यायचं नाही. आत्याचा बाउल साफ- सूफ व्हायचा. आणि मग तिच्या लक्षात आल्यावर ती म्हणायच, ” हे काय वहिनी मुलांसाठी नाही का आईस्क्रीम मागवलत? आईला काय बोलावं काही सुचायचच नाही कारण तिच्याजवळ इतके पैसेच नसायचे. चाणाक्ष आत्या ‘त ‘ वरून ताकभात ओळखायची. आणि मग हळूवारपणे आपल्या मखमली, चंदेरी टिकल्या लावलेल्या बटव्यातून नाणी काढायची, अलगद आमच्या हातावर ठेवून म्हणायची, पळा रे पोरांनो आईस्क्रीम खाऊन या. ” हे वाक्य ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो. पैसे हातात पडताच छताला टाळू लागेल अशी उंच उडी मारावीशी वाटायची. पण मग धाड्दिशी जमिनीवर आदळायचो. कारण आईचे डोळे मोठे झालेले असायचे. आईच्या डोळ्यांकडे नजर गेल्यावर आम्ही चुळबूळ करायचो, आत्या म्हणायची “आईकडे काय बघताय ? मी सांगतेय ना! हे पैसे घ्या आणि पळा लौकरआणि जा बुवांकडे” मग काय आम्ही हांवरटासारखे चार आण्याचं नाणं मुठीत पकडून जिन्यावरून एकेक पायरी वगळत उड्या मारत बुवा आईस्क्रीम वाल्यांच्या दुकानात शिरायचो. आणि मग काय बुवांकडे गुलाबी पोपटी, पिस्ता आईस्क्रीम खाताना मनांत यायचं आपला ढग झालाय आणि आपण हवेत तरंगतोय… अहाहा! काय तो सुखद गारवा. , आईस्क्रीमची मिठ्ठास चव, अजूनही जिभेला विसर पडला नाही. आणि मग मनाला सुखावणारा गारवा अंगावर घेता घेता आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. स्वर्गच आमच्या हातात आला होता. आईस्क्रीमची चटक लागली होती, पण पैशांचा ताळमेळ जमत नव्हता. अखेर पगार झाल्यानंतर माझ्या वडिलांनी ति. नानांनी आईस्क्रीमचा पॉटच घरी आणला तो फिरवतांना नाकी दम आले. घामाच्या धारा लागल्या, पण नंतर मात्र तीन-तीन वाट्या आईस्क्रीम हादडायला मिळाल.

गेले ते दिवस, गेली ती आईस्क्रीमची तेव्हांची चव, पण अजून रंग उडालेली –‘ बुवा आईस्क्रीमवाले ‘ — ही पाटी डोळ्यासमोरून हालत नाहीय्ये. मनाचे पांखरू अजूनही त्या दुकानाभोवती गिरट्या घालतय.  .

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments