सुश्री विभावरी कुलकर्णी
☆ बावरा मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
बावऱ्या बाल मनात काय कल्पना व विचार येतील सांगू शकत नाही. आज आवरताना एक कॅसेट सापडली आणि त्यातच त्यातील रिबन प्रमाणे तिने गुंडाळून घेतले. माझ्या लहानपणी ज्याच्या कडे रेडिओ, टेप रेकॉर्डर, टिव्ही असेल, घरात नळ असेल, गॅस असेल, झोपायला कॉट आणि त्या वर गादी असेल, तर त्या घराकडे फार श्रीमंत आहेत, त्यांचे काय बाबा! अशा आविर्भावात बघितले जायचे.
तर अशा काळात वडिलांनी एक बॉक्स घरी आणला. ( बॉक्स उघडणे ही पण एक दिवाळीच बरं का! ) तर त्या बॉक्स भोवती वाड्यातील सगळे बालवीर जमले. अगदी आनंद व उत्सुकता चेहेऱ्यावर घेऊन! मोठी माणसे कडेकडेने उभी राहिली. त्यातील स्त्रियांच्या चेहेऱ्यावर नानाविध भाव! कौतुक, आसुया, उत्सुकता, थोडी इर्षा, थोडी हळहळ असे संमिश्र भाव! तर विविध सूचनांच्या भडिमारात बॉक्स उघडला. आणि आतून मस्त काळा, चमकदार अनेक बटणं असलेला एक पाहुणा घरात प्रविष्ट झाला. तो म्हणजे टू इन वन
प्रथम त्यातले काहीच कळेना. हळूहळू त्याच्याशी परिचय वाढत गेला आणि नवनवीन गुपिते कळू लागली. रेडिओ तसा थोडा फार परिचित होता. पण त्यातील कॅसेट प्लेअर हा नवीनच होता. अगदी कॅसेट फिरते कशी याचे पण निरीक्षण झाले.
त्याचा आवाज, हवी तीच गाणी ऐकणे सगळेच नवीन!
त्यात माझी बाल बुध्दी गप्प बसू देईना! या बाल कुतूहलाने कोणी नसताना खूप वस्तू खोलून बघायचे प्रताप केले आहेत.
ती कॅसेट वाजते कशी? मग घरात कोणी नसताना ती कॅसेट उलट सुलट बघितली. त्याला A व B बाजू असते. आणि दोन्हीकडे वेगळी गाणी कशी वाजतात? हा मोठाच प्रश्न होता.
आणि एका गाफील क्षणी त्यातली काळी रिबन बाहेर आली. आणि आता ओरडा मिळणार म्हणून मी घामाघुम झाले. पण कॅसेटच्या चाकात करंगळी घालून ती फिरवली आणि रिबन आत गेली. आणि मी श्वास सोडला. पण कुतूहल होतेच! मग अशी हव्या त्या कार्यक्रमाची कॅसेट मिळते हे समजले. त्या कुतूहलाने दुकाने फिरले. त्यातून हे समजले की, आपल्याला हवी ती गाणी त्यात भरून मिळतात. मग काय कोरी कॅसेट घ्यायची घरातील सर्वांनी एकत्र बसून प्रत्येकाच्या आवडीची गाणी निवडायची, त्याची यादी करायची आणि ती दुकादाराकडे सोपवायची. हा एक नवीनच खेळ मिळाला. नंतर हेही समजले की आहेत ती गाणी पुसून नवीन गाणी पण त्याच कॅसेट मध्ये भरून मिळतात. मग तर अजूनच आनंद! त्यावेळी TDK आणि SONY च्या कॅसेट सर्वात उत्तम असतात हे ज्ञान पण मिळाले. आणि जे कथाकथन, गाण्याचे कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकावे लागत, ते या कॅसेट मुळे घरात आले. एकदा घ्या आणि परत परत ऐका याचा खूप आनंद व्हायचा. पु. ल. , व. पु. , शंकर पाटील, हे सगळे जणू घरातच आले आहेत असे वाटायचे. विशेष म्हणजे ती कॅसेट विशिष्ट बटणे वापरून मागे पुढे करून हवे ते गाणे पुन्हा ऐकता यायचे. रेडिओ ऐकण्याची सवय असणाऱ्यांना आपल्या बोटावर आवडते गाणे वाजवताना फारच छान वाटायचे.
असे आनंदात ऐकणे चालू असताना अचानक खटक असा आवाज येऊन तो टेप बंद पडला. आणि सगळ्यांची नजर माझ्याकडे वळली. मी शक्य तितका निरागस की बावळट चेहरा करुन माझा त्यात काही हात नाही, मी आज टेपला हातही लावला नाही हे पटवून दिल्या नंतर ती कॅसेट बाहेर काढण्यात आली. तर त्यातून खूप लांब रिबन बाहेर आलेली. तिथे माझा पूर्वानुभव उपयोगी पडला फक्त या वेळी करंगळी ऐवजी त्या स्पूल मध्ये पेन्सिल घालून ती रिबन गुंडाळून पुन्हा आत बसवली. एकदा तर ती रिबन तुटलीच! पण ती सेलोटेपचा बारीकसा तुकडा घेऊन ती रिबन सरळ करुन, त्या वर तो तुकडा चिकटवणे हे पण काम मी करत असे. हे काम ज्यांनी केले असेल त्यांना डॉ ऑपरेशन किती टेन्शन मध्ये करत असतील याचा अनुभव आला असेल.
आता या ढगात (क्लाउड), तू नळी (यू ट्यूब), आपले गुगल बाबा यावर मागाल ते एका टिचकी (क्लिक) वर मिळते. आणि प्रत्येकाला हवे ते कानात हेड फोन घालून हवे ते ऐकता येते. पण आज काय ऐकायचे असा जेवणाचा आणि कॅसेट ऐकण्याचा मेन्यू एकदमच ठरायचा. त्या सहभोजन व सहश्रवण यात जी गंमत होती, ती हे सगळे ज्यांनी अनुभवले त्यांनाच माहिती!
तर हे सगळे एका कॅसेट मुळे पुन्हा अनुभवले.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈