सौ. अंजोर चाफेकर
☆ “कृष्ण माझ्या विचारातून…” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆
कृष्णाचा विचार मनात येताच त्याची विविध रूपे मनःचक्षुसमोर येतात.
परंतु ती सर्व त्याची सगुण रूपे आहेत.
कृष्णाची ही सगुण रूपे सुद्धा खूप प्रतीकात्मक आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी गोपींची मधुरा भक्ती खूप सुंदर वर्णिली आहे.
गोपी सखीला म्हणते,
“मी माझे रूप आरशात बघते, परंतु मला मी दिसतच नाही. मला आरशात कृष्णच दिसतो. “
तेव्हा सखी म्हणते, “कारण तू कृष्णमय झाली आहेस. तुझे स्वतःचे अस्तित्व, तुझा मीपणा विरघळला आहे. ”
गोपी म्हणते, “मी कृष्णाला शोधले. सर्व वृदांवन धुंडाळले पण कृष्ण कुठेच सापडला नाही. “
ती अतिशय व्याकुळ होते.
तेव्हा तिची सखी सांगते, “कृष्ण तुला बाहेर सापडणार नाही. तू तुझी दृष्टी बाहेर टाकण्या ऐवजी स्वत:च्या आत पहा. तिथे तुला तो दिसेल कारण कृष्ण तुझ्या अंतरात आहे, तुझ्या हृदयात आहे. “
गोपींची मधुरा भक्ती तशी द्रौपदीची आर्त भक्ती तिच्या आर्त हाकेला धावून कृष्ण येतो व तिची लाज राखतो.
गजेंद्र मोक्ष हे सुद्धा कृष्णाप्रती असलेल्या आर्त भक्तीचेच प्रतीक आहे.
आपल्या सामान्यांच्याही जीवनात कुणाच्या रूपाने कृष्ण संकटात धावून येतो.
कृष्ण खरा उलगडत जातो, तो गीतेत, जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा तत्ववेत्ता म्हणून.
तो अर्जुनाला सांगतो, “तू मला जाणून घे. माझ्या या सगुण रुपाच्या पलीकडचा जो मी आहे त्या मला, परमतत्वाला जाणून घे, माझे परम अव्यय रूप जाणून घे. मला जाणल्यावर तुला दुसरे काही ज्ञान शिकायचे बाकीच उरणार नाही. “
मी चराचरात भरून आहे, पाण्यातल्या रसात मी आहे, चंद्र सूर्यांच्या प्रभेत मीच आहे, पृथ्वीच्या गंधात मी आहे, बुद्धीवंतांची बुद्धी मी आहे, तेजस्वींचे तेज मी आहे, बलवानांचे बळ मी आहे,
तपस्वींचे तप मी आहे. “
कृष्णाला दुर्गुणी लोकांचा अतिशय राग आहे.
तो त्यांना दुष्कृतिनः, नराधमाः, आसुरम् भावम् आश्रिताः
असे म्हणतो. तो म्हणतो, “अशा लोकांना मी कधीच दिसत नाही. ”
न अहम् प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृत्तः।
आज जो हाहा:कार माजला आहे—
चिमुकल्या मुलींवर बलात्कार होतात,
भर रस्त्यात खून होतात, दरोडे पडतात,
दारुच्या नशेत बेदरकारपणे गाड्या चालवून निरपराध्यांच्या हत्या होतात
हे सर्व थांबविण्यासाठी आकाशातून कृष्ण येणार नाही.
तो म्हणतो, ” माझेच बीज, माझा अंश तुमच्यामधे आहे. ”
बीजं माम् सर्व भूतानाम।
…….. त्या आतल्या अंतर्मनातल्या कृष्णाला जागवा.
© सौ.अंजोर चाफेकर
मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈