मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 18 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 18 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

नवरत्न परिवारामध्ये माझा प्रवेश झाल्यापासून नृत्याबरोबर माझी साहित्याची आवड दिवसेंदिवस वाढत गेली. फोफावत गेली. आम्हा मैत्रिणींचा काव्य कट्टा अधून मधून रंगतदार होत असल्यामुळे, मला ही आपोआप काव्य स्फुरायला लागले.

असं म्हंटल जात – संगती संगे दोषा. माझ्याबाबतीत मात्र” संगती संगे काव्य”असे घडत गेले. आणि नकळत छान छान कविता मला सुचत गेल्या. त्यामध्ये विशेष करून आमच्यातील सौ जेरे मावशी (वय वर्षे ७७) यांनी मला खूप मार्गदर्शन केले.

माझी पहिली कविता”मानसपूजा”,मी विठ्ठलाची संपूर्ण षोडशोपचार पूजा काव्यामध्ये गुंफली. कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा मी आईबरोबर घराजवळील विठोबा देवळामध्ये पहाटे पाच वाजता काकड आरती ला जात होते.तिथले अभंग,आरत्या दिवसभर माझ्या मनामध्ये रेंगाळत रहात आणि त्यातूनच मला हे काव्य स्फुरत गेले.

एकामागून एक प्रसंगानुरूप अनेक कविता लिहिल्या गेल्या.मी मनामध्ये कविता रचून लक्षात ठेवत असे आणि सवडीनुसार फोनवरून गोखले काकूंना सांगत असे.आमची फोनची दुपारी तीनची वेळ ठरलेली होती.मी माझ्या घरा मधून फोन वरून कविता सांगत असे आणि त्या कागदावर उतरवून घेत असत.माझी फोनची घंटा वाजायचा अवकाश,पेन आणि कागद घेऊन त्या तयारच असत. अशा अनेक कविता झरझर कागदावर उतरत गेल्या. माझ्या मनाला आणि मेंदूला एक खाद्य मिळत गेलं आणि मन आणि मेंदू सतत कार्यरत राहिले.

माझा विजय मामा हिमालय दर्शन करून आला होता.त्याने मला आणि आईला प्रवासाचे संपूर्ण रसभरीत वर्णन ऐकवले.ते मला इतके भावले की माझ्या मनामध्ये ठसले आणि मेंदूमधून काव्य रचना अशी ओघवती होत गेली की साक्षात हिमालय माझ्या नसलेल्या डोळ्यापुढे उभा राहिला आणि ती कविता तयार झाली.जी सगळ्यांना खूपच आवडली.

अशा प्रसंगानुरुप आणि कविता बनत गेल्या इथून पुढे मी तुमच्यासमोर सादर करणार आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈