सुश्री नीता कुलकर्णी
☆ आठवणींची पेटी… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆
… माढ्याच्या काकू.
आता पक्ष पंधरवडा सुरू झाला आहे पितरांचं स्मरण करायचं.. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची.
श्राद्धपक्ष करायचं. गोडधोड करायचं. पितरांच स्मरण करून तर्पण करायचे… म्हणजे त्यांना तृप्त करायचे..
त्यासाठी आई वडील सासू सासरे …. यांच्या बद्दल लेख लिहून झाले.
मनात विचार आला … फक्त पितरंच कशाला? पितरांप्रमाणेच आपल्याला प्रेम, माया, स्नेह देऊन ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं त्यांची थोडीशी आठवण काढू…
म्हणून हा माढ्याच्या काकूंवर लेख लिहिला – – – –
… लग्न होऊन मी पुण्यासारख्या शहरातून सोलापूर जवळच्या माढा या छोट्याशा गावात गेले. हे तिथल्या स्टेट बँकेत नोकरीला होते. एका डॉक्टरांच्या वाड्यात वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. डॉक्टरांच्या आईंना काकू म्हणत असत. त्यांचा मला मोठा आधार वाटायचा. मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनच शिकले.
वाड्याच्या दरवाज्याच्या दारात एक मोठा आडवा कट्टा होता. संध्याकाळ झाली की त्या कट्ट्यावर काकु येऊन बसायच्या. आसपासच्या बायका गप्पा मारायला यायच्या. जाणारे येणारे थांबून बोलायचे.
गावात लायब्ररी होती. पुस्तकं बदलायला, भाजी आणायला मी संध्याकाळी बाहेर जात असे. येताना काकु म्हणायच्या … ” ये बैस थोडावेळ “
तो कट्टा म्हणजे गंमतच होती. अनुभवानी मला तर त्या कट्ट्याच वेडच लागलं. रोज तिथं काहीतरी नवीन घडायचं.
चार घर पलीकडे टाकून असलेली कमला लहान बाळाला घेऊन आली. “काकु बघा ना. हा नुसता रडतोय झोपतच नाहीये. “
” अग जरीची कुंची घातलीस टोचतीय बाळाला. “
” माझ्या आईनी शिवलीय”
” म्हणून काय झोपताना घालशील? जा साध टोपडं घेऊन ये”
काकुंनी कुंची काढली. पदरानी बाळाचा चेहरा, मान पुसली. पेपर घेऊन वारा घालायला लागल्या.. काही वेळातच बाळ गाढ झोपलं. जरा वेळाने येऊन ती बाळाला घेऊन गेली.
एक वेडसर मुलगा कधीतरी यायचा.
” ये बस ” काकुंनी म्हटलं की तो जमिनीवरच बसायचा. आत जाऊन त्याला पोळी, भाजी एखादं गोड काही असेल ते घेऊन यायच्या. मला म्हणाल्या,
” अशी माणसं देवाची असतात बघ.. देवानंच त्यांना असं घडवले. त्यांचा कधी राग राग करू नये. मनाने निर्मळ आहे ग ते लेकरू”
एक अतिशय सुंदर, शालीन बाई जरीची साडी नेसलेली डोक्यावरून पदर घेतलेली रस्त्याने जाताना काकुंना ” बऱ्या आहात का “?म्हणाली
” हो मी बरी आहे”
” जरा देवीला जाऊन येते. “
“ये हो”
मी म्हटल “किती सुंदर आहेत ह्या बाई. कोण आहेत”
“तू नवीन आहेस. तुला अजून काही माहित नाही. “
तेवढ्यात एक बाई म्हणाली.. ” खूप मोठं घर आहे तिचं… आणि हंड्या, झुंबर आहेत तिच्या घराला “
मी म्हटलं ” कधीतरी बघायला पाहिजे “
लगेच काकु कडक आवाजात मला म्हणाल्या, ” खबरदार काही बघायला जायची जरूर नाही. तिच्या घरी कधी जायचं नाही. पाटलाची रखेल आहे ती. “
… मी एक धडा घेतला.
पलीकडच्या घरातली नुकतच लग्न झालेली नवीन सून घाबरतच आली. ” काकु वांग्याच्या भाजीत जास्तीच मीठ झालंय. सासुबाई गावाला गेल्यात. काय करू?”
” चार बटाटे उकडून भाजीत घाल. तिखट, कूट घाल. “
” पण त्यानं वाढीव भाजी होईल.. ”
” उद्या राहिलेल्या भाजीत ज्वारीचे पीठ, तिखट, मीठ, कोथिंबीर घाल आणि त्याची थालीपिठं कर “
“चांगली होतील का “?
“अग करून तर बघ. आणि लक्षात ठेव अशा गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात”
दुसरे दिवशी ती सांगत आली, ” सगळ्यांना थालपीठं फार आवडली. कोणाला काही कळलं नाही. अगदी तुला मला झालं. “
…. संसाराला सुरुवात करतानाच अन्नाचा मान राखायचा, वाया घालवायचं नाही. हा संस्कार तिला मिळाला आणि मलाही…
एके दिवशी मी खाली कट्ट्यावर गेले नव्हते. शेजारची बायडी मला बोलवायला आली.
” खाली चला काकूंनी तुम्हाला बोलावलंय. बायजा येणार आहे. “
कोण बायजा मला कळेना. खाली गेले तर कट्टा फुल भरलेला होता. खाली मातीत सुद्धा बायका बसल्या होत्या. एक साधीशी बाई डोक्यावरून पदर घेतलेली…. तीच बायजा ओटीवर बसली होती. मला फारच उत्सुकता लागली. सगळ्या जमल्या तस काकूंनी तिला सांगितलं
” हं कर सुरू “
बायजानी संत तुकाराम, संत नामदेव, ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग सुरेल आवाजात म्हटले. एक जण म्हणाली,
” ए ते जनीच गाणं म्हण ना, तुझं ते गाणं आम्हाला आवडत. “
मग जनाबाईची गाणी झाली. गोड आवाजात जात्यावरच्या ओव्या बायजानी म्हणून दाखवल्या.
आज वाटतं तेव्हा त्या लिहून ठेवायला हव्या होत्या. सगळ्या तिचे कौतुक करत होत्या.
… नंतर लक्षात आलं की तिथे एका गायिकेचा लाईव्ह कार्यक्रम सादर झाला होता. जाणारे येणारे पण ऐकत उभे होते. काकुंनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला…
“देवानी आवाजाची देणगी दिली आहे तुला. भाग्यवान आहेस बघ. ” बायजानी काकूंना वाकून नमस्कार केला. बायजाच्या कलेचा छोटासा सन्मान त्यांनी केला. इतरांना त्याचा आनंद दिला… किती गोड कल्पना… एखाद्याच्या कलेला कशी दाद द्यावी हे मी शिकले.
काकूंचा मुलगा डॉक्टर होता. पण पेशंट काकुंनाच औषधं विचारायचे. घरगुती उपायांची तर त्यांच्याकडे पोतडीच होती.
गुराखी, रात्री येणारा रामोशी जाताना दिसला की त्याला जवसाची, तिळाची, दाण्याची चटणी दे. नाहीतर जे काही घरात असेल ते त्याला बोलवून त्या द्यायच्या.
माझ्या मुलाला आनंदला पहिला भात त्यांनीच भरवला. काकुंनी सांगितलं
“लहान लेकराला सारखं घरात ठेवू नये. सगळीकडे न्यावं म्हणजे लेकराला काही बाधत नाही. “
आज लक्षात येतं … मुलांची प्रतिकारशक्ती सहज कशी वाढवायची हे काकूंनी मला शिकवलं.
ही जुनी जाणती माणसं म्हणजे चालती बोलती ज्ञानाची पुस्तकं असतात. हे आज लक्षात येतं.
जगात वावरताना लागणाऱ्या अनेक गोष्टी नकळतपणे मी त्या कट्ट्यावर शिकले.
रोज काहीतरी तिथं नवं घडत असायचं. कधी तरी काकू एकट्या पण असायच्या…
सुनेला भाकरी करता येत नाही अशी तक्रार करण्याला बाईला त्या म्हणाल्या.. ” लोकाची पोर आपल्या घरी आली आहे. आता ती आपली झाली आहे. घे सांभाळून… पुरुषांच्या चार भाकरी तू कर. तिच्या तुटक्या भाकरी तुम्ही खा. हळूहळू शिकेल ती पोर… “
त्यांच इतकं सहज सोपं तत्वज्ञान होतं. प्रश्न फार पुढे जाऊ द्यायचेच नाहीत. तिथल्या तिथे उपाय सांगायच्या…
अशी निर्मळ मनं, प्रेमळ नाती अनुभवायला मिळाली आजही काकू… आणि त्यांचा तो कट्टा स्मरणात आहे.
एकदा काकू एकट्याच कट्ट्यावर होत्या. म्हटलं
“आज कोणी नाही तर तुम्हाला करमत नसेल ना ?”
तर म्हणाल्या, ” सांगू का तुला.. कोणी नसेल ना तर मी आपला ‘श्रीराम जय राम जय जय राम ‘ जप करत बसते. तो रामराया आपल्या जवळ आहे असं वाटतं बघ. ”
असं खरखुरं अध्यात्म काकू जगत होत्या……
“ साधं सोपं जगणं हीच श्रीमंती आहे. ”.. हे काकूंच्या वागण्यावरून मी शिकले. अशी माणसं आयुष्य समृद्ध करतात. आणि आयुष्यभर लक्षात राहतात. ही माणसं आयुष्यात आली हे माझ भाग्यच..
… आज त्यांच्या आठवणीने गहिवरूनच आलं आहे … थांबते आता इथं….
© सुश्री नीता कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर