श्री संभाजी बबन गायके
मनमंजुषेतून
☆ “Admit झालेली नाती !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
आई मरावी पण ही जगावी असं महत्त्व प्राप्त झालेलं नातं म्हणजे मावशी! आणि बहिणीवर असलेलं प्रेम आपल्या म्हणजे भाचरांच्या माध्यमातून व्यक्त करणारा आपल्या आईचा भाऊ म्हणजे मामा! दोन्ही नात्यांच्या संबोधनांचा आरंभ ‘मा’ या अक्षराने होतो.. मा म्हणजे… माया, मार्दव आणि मातृत्व!
रुग्णालयांत डॉक्टर्स, नर्सेस (सिस्टर्स) यांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णसेवा करणाऱ्या महिलेला मावशी आणि पुरुषाला मामा असे संबोधण्याची सुरुवात आपल्याकडे अगदी नकळत झालेली असावी! यामागे योगायोग नाही… रुग्ण कोणत्याही वयाचा असो… त्याने मामा, मावशी यांचे थोडे का असेना प्रेम आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेले असतेच. या अनुभवामुळे केवळ असे संबोधन असलेल्या व्यक्ती सुश्रुषा करीत असतील तरी सकारात्मक परिणाम होत असावा!
रुग्णाची प्रत्यक्ष शारीरिक स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांत हे मामा, मावशी अग्रभागी असतात, असे दिसते. रुग्णालयातील सिस्टर्स, वॉर्ड बॉईज, ब्रदर्स यांच्याप्रमाणे मामा, मावशी प्रशिक्षित नसतात… हे सेवक कित्येक वर्षांच्या अनुभवातून पारंगत होत जातात… त्यांच्या कामात आपसूक सफाईदारपणा येत जातो. किंबहुना एखाद्या रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा बराचसा भार ही वैयक्तिक पण आता सार्वजनिक पातळीवर रूढ झालेली नाती पेलत असतात, असे वाटते!
डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज यांनी आपापले व्यवसाय स्वतः निवडलेले असतात… पण मामा, मावशी गरजेतून उदयाला येतात! रुग्णाला धीराचे चार शब्द सांगण्याचा, एखादा सल्ला देण्याचा अधिकार यांना वयपरत्वे प्राप्त होत जातो… आणि बरे होऊन घरी निघालेल्या रुग्णाच्या नातेवाईक मंडळी कडून बक्षिसी मिळवण्याचा हक्कही (काही) मामा – मावशींनी स्वयंप्रेरणेने पदरात पाडून घेतलेला आढळून येतो!
छोट्या रुग्णांना हे न टोचणारे लोक भावत असावेत. कुणी काहीही म्हटले तरी शरीर धर्म चुकत नाही आणि त्याची घाण तर असतेच. या वासाची तमा न बाळगता, घृणा न करता मामा, मावशी रुग्णसेवा करीत राहतात… या कामाची कितीही सवय असली तरी हे काम सोपे नाही हे मान्य करावेच लागेल!
अर्थात, वेगवेगळ्या रुग्णालयांत रुग्णांना या नात्यांकडून येणारे अनुभव निरनिराळे असू शकतात. पण ही सुद्धा अखेर माणसेच आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी यांनी स्वीकारलेले काम अंती मानवसेवेचे ठरते, हेही खरेच !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈