सुश्री नीता कुलकर्णी
☆ “देवीचे नवरात्र…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आज देवीचे नवरात्र बसले आहे. ती देवी कशी आहे ? – – –
केसापासून पायाच्या नखा पर्यंत सर्वांग सुंदर आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत. कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी, प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. ती विश्वाची स्वामिनी, जगतजननी आहे. अशी ही देवी सुंदर, कोमल, शांत, नाजूक आहे. , , पण इतकच तिच वर्णन आहे का? नाही….. ती अष्टभुजा आहे. तिच्या हातात गदा, चक्र, शंख, धनुष्य बाण, शुल, पाश, खड्ग अशी अनेक शस्त्रे आहेत. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे. ती चंडिका आहे. प्रत्यक्ष देवांनीही तिची स्तुती केलेली आहे… अत्यंत नाजुक, शांत, कोमल पण वेळप्रसंगी भयानक रूप धारण करून दृष्टांचा नाश करणारी आहे. राक्षसांना शिक्षा करणारी आहे. निरनिराळ्या रक्षसांना शासन करून तिने यमलोकात धाडलेले आहे.
या देवीकडे फक्त देवी म्हणून न बघता…. एक स्त्री म्हणून बघूया… ती पण आपल्यासारखीच आहे. अशा या देवीचा अंश आपल्याही शरीरात आहे.
आपण तिची प्रार्थना करूया. प्रार्थना करून झाली की आपण तिच्याकडे काहीतरी मागतो.
आता असा विचार करा की काय मागायचे?… लौकिकात जे हवे आहे ते सगळे मागून झालेले आहे. आता थोडं वेगळं काही मागू या…
राक्षस म्हटलं की अति भयंकर, क्रूर, अक्राळ विक्राळ असं काहीस स्वरूप आपल्यासमोर येतं…
पण लक्षात घ्या की…
राक्षस ही एक वृत्ती आहे… ती विचारात, कृतीतही असू शकते.
ते प्रचंड, मोठेच असतात, त्यांचे आकार भयानक असतात असे नाही… काही मनाला नकळत सूक्ष्मपणे सतत त्रास देणारेही असतात… काही बहुरूप्यासारखे असतात… वरून गोड गोड बोलून फसवणारे ही असतात. त्यांच्यातला राक्षस ओळखायला शिकुया…..
आपण त्यांच्याशीही लढू या… अशा बारीकसारीक लढाया रोजच लढाव्या लागतात. त्यासाठी देवी सहाय्य करेलच. पण आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायची आहे हे लक्षात ठेवायला हवे.
त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे आहेत.
अगदी साध्या साध्या गोष्टींचा विचार करा. एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायला पण अंगी सामर्थ्य यावं लागतं. ते यायला हवं….. तसंच वेळ प्रसंगी शांत राहण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक असते. ” मौन” ही आपली आपण आपल्याशीच लढलेली लढाई असते. ती पण जिंकता आली पाहिजे.
पण आता तेवढ्याने भागणार नाही. आता परिस्थिती अशी आहे की आपल्या अंगात जोश ही यायला हवा…. शत्रूला भ्यायचं नाही तर… त्याच्याशी सामना करायचा.. निकरानी आणि सर्व शक्तीनिशी.. लढायचं… असं ती आपल्याला शिकवते… शत्रूला नामोहरम करून मगच देवी थांबते… विजय मिळेपर्यंत झुंजायचं ही तिची वृत्ती आपणही अंगी बाणू या.
देवीच गुणगान करा. श्री सूक्त. कुंकुमार्चन, देवी अथर्वशीर्ष, सप्तशतीचा पाठ हे सर्व काही करा.
मात्र आता तिच्याकडे ही प्रार्थना करा…..
हे देवी मला निर्भय आणि सबल कर… आज जगात वावरताना प्रत्येकीला.. प्रत्येकीला असं बनायला हवं आहे. तसेच तिला आश्वासन द्या की मी पण माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीन आणि तो मनापासून करा.
देवी यश देईलच..
दोन भुजा असलेल्या अनेक जणी अष्टभुजा असल्यासारख्या अनेक आघाड्यांवर लढत असलेल्या माझ्या आसपास आहेत.. त्यांच्या इतक आपल्याला जमलं नाही तरी चालेल… पण थोडा आपण प्रयत्न जरूर करूया. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या. आईसाहेबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेलच.
त्या मातृरूपेण संस्थिता, लक्ष्मी रुपेण संस्थिता इत्यादी वर्णनानंतर देवीच वर्णन ” शक्ति रूपेण संस्थिता ” असेही आहे… हे आपण निश्चित लक्षात ठेवूया.
अशा या देवीला माझा नम्रपणे नमस्कार.
एका मागणीचा जोगवा तुझ्यासमोर पदर पसरून मागते ग आई…….
“ आम्हाला अंतरीक बळ दे शक्ती दे. ”.
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈