सुश्री तृप्ती कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ मुक्ती… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
कल्पना… शक्यता… शोध!
मुक्ती म्हणजे नक्की काय? मला वाटतं एखाद्या विचाराच्या स्त्रोतापर्यंत पोहोचणं म्हणजे मुक्ती. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटणं ही एक आध्यात्मिक बाजू आहेच, पण तेव्हा नक्की काय घडत असावं? विचार करताना मला जाणवलं की एकुणात मुक्ती हे प्रकरण इंटरेस्टिंग आहे… अनेक जणांना त्याचं अप्रूप आहे काहींचं जीवन ध्येय आहे… तर हे काय आहे…
एकदा प्राणायमाच्या विषयी जाणून घेताना हळूहळू विषय श्वास जन्म-मृत्यू यावर आला. आणि मग जगण्याचा दृष्टिकोन नेमका कुठला योग्य ? अशा अर्थाची आम्ही चर्चा करत होतो. त्यावेळी मला आमच्या ओळखीतल्या एकांनी सांगितलं होतं की आपल्या या जन्मातली प्रत्येक गोष्ट ही केवळ आणि केवळ आपल्या विचारांतून निर्माण झाली आहे. आपण करणाऱ्या (काही जणांच्या दृष्टिकोनातून घडणाऱ्या) प्रत्येक कृती मागे हा विचार असतो. कधी प्रगट तर कधी सुप्त अवस्थेत. आपला जन्म कधी, कुठे, कसा झाला/होतो. आपलं शरीर, आपल्या इच्छा, वासना, जगण्याचा दृष्टिकोन हे सारंकाही आपल्या विचारांनी नियंत्रित केलं जातं/आहे. हे विचारच आपल्याला निवड करायला प्रेरणा देतात. ज्यांना याची जाणीव नाही अशा कमजोर व्यक्तींच्या दृष्टीने भाग पाडतात.
हे ऐकल्यानंतर मला असं वाटू लागलं की ज्यावेळी एखाद्याला ही गोष्ट पटून आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर त्याला वाटतं की याचा शोध घ्यावा… याच्या मुळापर्यंत पोहोचावं… तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा मुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू होत असावा.
मग त्याला हे जग नक्की कोण नियंत्रित करतं? अशी कुठली शक्ती आहे? तिचं स्वरूप स्थिर आहे का अस्थिर? या उत्तराचा ध्यास लागत असावा. आणि आयुष्यातल्या प्रत्येक घटनेकडे या दृष्टिकोनातून बघताना कधीतरी त्याला या प्रश्नाचा उगम सापडत असावा. मग या उगमापाशी पोहोचल्यानंतर त्याला एका परिपूर्ण अवस्थेचा अनुभव येऊन तो मुक्त होत असावा. कारण जिथे विचार आणि प्रश्न दोन्हींची निर्मिती थांबते आणि उत्तराचीही आस राहत नाही त्या क्षणापासून त्याचा मुक्तीकडे प्रवास वेगाने होत असावा किंवा तोच एखादा क्षण त्याला मुक्तता देत असावा? असं मला वाटतं.
मुक्तीच्या कल्पना आणि शक्यता अशाही असतील.. की आणखीन काही वेगळ्या? शोध चालू आहे… कधीतरी याचं उत्तर मिळेल.
☆
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈