मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

बागेत बाकावर बसलेल्या नलूने समोरून येणाऱ्या उषाला बघून हसून हात हलविला. उषा येऊन बाकावर बसण्याआधीच तिला विचारलं ,”अगं कुठे होतीस काल? किती वाट पाहिली तुझी. शेवटी चार फेऱ्या मारून मी घरी गेले.”

“सॉरी ,सॉरी अगं, मानसीची एक मीटिंग रद्द झाली म्हणून आयत्यावेळी तिनं आम्हाला  मालला यायला सांगितलं. अवेंजर्स सिनेमा बघायला ”

“बरं -बरं. आवडला का?”

“डोक्यावरून गेला” हसल्यासारखं करत उषा म्हणाली.” काय ते वेडेवाकडे एलियन्स ,त्यांची विचित्र वाहनं, शस्त्रास्त्र,सारेच अगम्य! मला तर अधून-मधून  डुलक्याच येत होत्या.”

“आणि आता आपल्याला मॉल मधलं ते हिंडणं, खाणं,खरेदी काहीच नको वाटतं. त्यात सिनेमा असा असला म्हणजे…..”नलूने उषाच्या सुरात सूर मिळविला.

“आपल्या या कर्तृत्ववान, ऑफिस मध्ये बॉस असलेल्या लेकी, यांच्या सोयीप्रमाणे आपल्याला गृहीत धरतात. शिवाय घरीदारी सगळीकडे बॉस सारख्याच वागतात.”उषा नाराजीच्या स्वरात म्हणाली.

“आमची चंदा “सेव्हन सिस्टर्स” ला जायला निघालीय. ते सांगायचं होतं तुला”. नलूच्या स्वरातून काळजी डोकावत होती.

“कुणाबरोबर जातेय?”

“एकटोच जातेय. नागालँड, त्रिपुरा पासून एकटीने महिनाभर हिंडणारेय. तिच्या एनजीओतर्फे तिथल्या स्त्रियांच्या आरोग्याचा सर्व्हे करायचा आहे म्हणे. मला तर खूप टेन्शन आलंय.”

“साहजिकच आहे. तरण्याताठ्या मुलीने तिथल्या अशांत वातावरणात एकटीने वावरायचं म्हणजे काळजी वाटणारच”. नलूला दुजोरा देत उषा म्हणाली.

“हो. पण घरात तसं काही बोलायला गेले तर चंदाने मोबाईल मधून डोकं वर काढून, ‘कू–ल, आई कू–ल’ म्हणत माझ्याकडे’ जग कुठे चालले आहे आणि मी कुठल्या युगात वावरतेय’  अशा नजरेनं पाहिलं”

“अरुणा काही म्हणाली का?” उषाने नलूच्या सुनेचं मत आजमावयाला विचारलं.

म्हणाली माझी समजूत काढल्यासारखी ‘अहो आई ,तुम्ही व्हाट्सअप वापरता. आपल्या फॅमिली ग्रुपवर चंदा रोज मेसेज करीन ना. फोटो सुद्धा पाठवील.  काळजी नका करू.’

“फक्त तिथलं इंटरनेट कनेक्शन चालू असायला हवं.” ही माझी शंका मग मी मनातच ठेवली.”  नलूच्या बोलण्यात नाराजी होती.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈