सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ नवरात्रीतील बौद्धिक उपासना…  ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

बरेच लोक नवरात्रात नऊ दिवस उपवास करतात. शारीरिक दृष्टीने या उपवासाचा फायदा होतो.. शिवाय जरासे आत्मसंयमनही होते असं म्हणता येईल. पण उपवासाची मूळ संकल्पना वेगळीच आहे जी अनेक लोक उपास करतांना विचारातच घेत नाहीत

‘उपविशति. ’ या संस्कृत क्रियापदावरून आलेल्या “ उपवास “ या शब्दाचा खरा अर्थ आहे जवळ – शेजारी राहणे – सान्निध्यात राहणे….. अर्थात देवाच्या सान्निध्यात राहणे. शरीराने व मनानेही. संसाराच्या सर्व चिंता, सर्व विचार दूर सारून मन देवावर एकाग्र करणे, मनात फक्त ‘मी आणि देव’ हा भाव असणे. आणि असा उपवास करण्याचा उद्देश काही काळ तरी मनातला भौतिक सुख-दु:खांचा विचार कटाक्षाने बाजूला सारता यावा, मनातील नकारात्मकता नकळत नष्ट व्हावी आणि मन:शांती व पर्यायाने आरोग्यही लाभावे हाच असावा असे निश्चितपणे वाटते.

मी नुकताच एक लेख वाचला ज्यात ‘ नवरात्रीत बौद्धिक उपवास कसा करावा, ‘ याविषयीचे विचार मांडलेले होते. हे विचार खरोखरच अंमलात आणण्यासारखे आहेत. पण शीर्षकातला ‘उपवास’ हा शब्द मात्र मला खटकला. कारण ‘उपवास’ या शब्दाचा संदर्भ आपल्याकडे सर्वसाधारणपणे काहीतरी ( मुख्यतः खाणे ) टाळण्याशी … थोड्याशा नकारात्मकतेशी जोडला जातो. त्यामुळे ‘ बुद्धीचा उपवास ‘ हा शब्द खटकला. मग ते शीर्षक ‘नवरात्रीत बौद्धिक उपासना ‘ असे असावे या दृष्टीने मी तो लेख वाचला आणि मग. …. त्यातील मुद्दे विचार करावा असेच आहेत हे पटले. ते मुद्दे असे आहेत —–

प्रतिपदा मी माझा सर्व राग सोडून देईन.

द्वितीया मी लोकांना judge करणं सोडून देईन.

तृतीया मी माझे इतरांबद्दल सर्व आकस, पूर्वग्रह सोडून देईन.

चतुर्थी मी स्वतःला आणि सर्वांना क्षमा करीन.

पंचमी मी स्वतःला आणि प्रत्येकाला जसे आहे तसे स्वीकारेन.

षष्टी मी स्वतःवर आणि प्रत्येकावर बिनशर्त प्रेम करीन.

सप्तमी मी माझ्या ईर्ष्या आणि अपराधाच्या सर्व भावना सोडून देईन.

अष्टमी (दुर्गाष्टमी) मी माझी सर्व भीती सोडून देईन.

नवमी (महानवमी) माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी आणि मला जे मिळेल त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करेन.

दशमी (विजयादशमी) – विश्वामध्ये सर्वांसाठी विपुलता आहे. ‘ जो जे वांछील, तो ते लाहो. ’ असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहेच. त्यासाठी बिनशर्त ‘मैत्र’, प्रेम, साधना, निष्काम सेवा आणि विश्वास याद्वारे मी योग्य तेच आणि आवश्यक तेवढेच प्राप्त करावे अशी मनोधारणा मी बाळगेन

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही उपासना फक्त नवरात्रातच केली पाहिजे, असं काही नाही. किंबहुना ती रोजच्या आचरणात आणावी. ज्याप्रमाणे आपण नित्यनेमाने, न चुकता जेवतो, झोपतो, त्याचप्रमाणे या बौद्धिक उपासनेचाही रोजच्या परिपाठात समावेश करावा. मग हळूहळू या प्रकारे वागणं आपल्या अंगवळणी पडेल. आणि आपले जीवन नक्कीच सकारात्मक व समृद्ध होईल. हेही एकप्रकारे सीमोल्लंघनच ठरेल नाही का ??

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. !!!!!

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments