सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ संपलं ग नवरात्र… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

देवीच नवरात्र आलं आलं म्हणता म्हणता आता संपलं सुध्दा…. दिवस कसे भुर्रकन उडून गेले..

किती तयारी आणि गडबड चालली होती…. माती आणायची, सप्त धान्य पेरायचं आणि मग….. ती वर उगवून आलेली हिरवीगार लुसलुशीत पात… त्याचा अलवार स्पर्श… तो सुंदर असा सृजनाचा सोहळा डोळे भरून पाहायचा.. घट बसवायचे, कडकण्या करायच्या, रोज एक माळ अर्पण करायची..

श्री सूक्ताची एकवीस आर्वतन… सप्तशतीचा पाठ..

धागरा घालून केलेला गरबा…. भोंडल्याची गाणी म्हणत धरलेला फेर.. नंतर खिरापतीची मजा…

भजनाचे कार्यक्रम.. त्यात गोंधळ, जागरण हवाच…. कुंकूम् आर्चन, सवाष्णीच्या ओट्या नि कुमारीपुजन…

रोज रंगीबेरंगी जरीच्या साड्या.. दागिने… बाहेर जाणं… सर्वांना भेटणं मग गप्पा……

टाळ घेऊन आरत्या म्हणायच्या… घरी गोंधळी बोलवायचा. डफ तुंतुण्यावर म्हटलेली देवीची गाणी ऐकायची..

निरनिराळे उपवासाचे पदार्थ.. आरास, रांगोळ्या.. नऊ दिवस रोज देवीदर्शनाला जायची गडबड..

नवरात्रीची सांगता देवीला पुरणावरणाचा नैवेध दाखवून…..

कसं भारावल्यासारखंच वातावरण असतं नाही का ?

दसरा झाला आणि आज बघ….. सगळं कसं शांत शांत झालं

अगं लक्षात घे….

नवरात्री पुरतीच देवी आई आली होती का?….. ती जगतजननी आहे …. ती इथेच असते.. तिच्या देवळात…. आपली वाट बघत उभीच असते … आपण मात्र फक्त त्या त्या दिवसापुरतं जातो तिच्याकडे…

गर्दीत, गोंधळात हारा फुलांच्या राशीत एक मिनिट तिला बघतो…

आता एक कर.. शांतपणे उद्या परवा जा तिच्याकडे… देऊळ रिकामं असेल.. सजावट काढली असेल…

कुठलाही भपका नसेल…. बसावं तिच्या समोर..

… इतर वेळेस पण भेटावं ग देवी आईला…. नवरात्र नसताना सुद्धा … सहज आठवण आली म्हणून……

अचानक पण जावं ग…. किती बरं वाटेल तिला…. आणि आपल्यालाही…

— वाचता वाचता तिचे डोळे भरून आले……. मध्यंतरी फोनवर आई पण हेच म्हणत होती……

सवड काढून येत जा ग… बघावसं वाटतं तुला…

वाट बघणारी आई आहे तोपर्यंत भेटत जा ग तिला …. आईला तर कुठल्याच भारी साड्या, साज शृंगार, दागिने काही नको…… तुमचे दोन हात गळ्यात पडले आणि तुमच्या मिठीत सामावलं की ती तृप्त असते … स्पर्शाचं सुख वेगळंच असतं… आईला ते मनातून फार सुखावतं… आता तिला लेकीकडून फक्त एवढंच तर हव असतं…

तेवढचं तीच मागणं आहे ग….. आठवणीनं तुमच्या आईला आणि वडिलांनाही भेटायला जाऊन या….

… नाहीतरी देव अजून वेगळा कुठे असतो गं.. !!!!

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments