सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
“अलीकडे रात्री बराच वेळ झोप लागत नाही.वेड्यासारखे विचार मनात येतात. वाटतं की काळ पंधरा वीस वर्षांनी मागे जावा.किती छान स्थळं येत होती तेव्हा मानसीसाठी. हुशार, स्मार्ट, पाच आकडी पगार घेणारी एकुलती एक लाडकी लेक आमची. काहीतरी निमित्त काढून चांगली चांगली स्थळं तेव्हा नाकारली मानसीने. ठाण्याचा एक मुलगा तर अगदी परफेक्ट मॅच होता मानसीला. पण ‘त्याची माझी उंची जवळजवळ सारखीच आहे’ असलं खुसपट काढून मानसीने त्यालासुद्धा नाकारलं. यांनी किती समजूत काढली होती तिची.त्यावेळी मानसीची बाजू घेण्याचा मूर्खपणा मी केला नसता तर……” उषाच्या मनातली खदखद बाहेर पडत होती.
उषाच्या हातावर हलकेच थोपटल्यासारखं करीत नलू म्हणाली ” जॉर्जबद्दल तर तुला माहितेय. चंदाच्याच ऑफिसमधला हुशार, सालस मुलगा. केवळ दुसर्या धर्माचा म्हणून यांनी टोकाचा विरोध केला. तो लग्न करून, अमेरिकेला जाऊन चांगला सेटल झाला. आणि ‘आता मला लग्नच करायचं नाही’ म्हणून चंदा हट्ट धरून बसलीय.”
“आजचा जमाना असता ना तर आधी लग्न करून नंतर त्यांनी तुम्हाला कळवलं असतं.”
“ते परवडलं असतं. हे गेल्यानंतर कधी नाही इतकं एकटं वाटतं आताशा”. नलू खिन्न होऊन म्हणाली.
“मला तर हल्ली जवळच्या नात्यात सुद्धा कुठल्या कार्याला जावसं वाटत नाही. तिकडे आडवळणाने गाडी शेवटी मानसीच्या लग्नावर येते.”
“परवा मुंजीला गेले होते, तेव्हा ओळखीच्या एका बाईंनी चंदा साठी घटस्फोटित स्थळ सुचवलं. धीर करून घरी बोलले मात्र, चंदा एखाद्या वाघिणीसारखी चवताळली. तिने घेतलेल्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहायला जाते म्हणाली.”
“अगबाई,मग? अरुणाने समजुत काढली का तिची?”
“काढणारच. सगळ्याच स्वार्थी आणि मतलबी झाल्येत आजकाल. चंदा सढळपणे घरात खर्च करते. मग तिची मर्जी सांभाळत अरुणा सगळं तिच्या हातात आयतं देते. ‘आत्या आत्या’ करत मुलं चंदाकडून हॉटेलिंग, उंची कपडे, गेम्स वसूल करतात. शिवाय चंदा तिच्या भाड्याने दिलेल्या फ्लॅटचं उत्पन्न थोडंच सोडणारेय? कधी लाडीगोडी लावून अरूणा मुलांना चंदाच्या खोलीत झोपायला लावते. राजा-राणीचं दार लागलं की मलाच काहीतरी अपराध केल्यासारखं वाटतं.” नलूने मनातली खंत व्यक्त केली.
क्रमशः…
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
चांगलं कथाबीज