डाॅ. मीना श्रीवास्तव
☆ ‘औषध नलगे मजला !’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
नमस्कार प्रिय मैत्रांनो !
दिवाळीच्या ‘उपहाराचा’ मनमुराद आनंद आपणास घेता यावा म्हणून हा ताजा लेखन प्रपंच! आपल्या आवडीनुसार याला तिखट अथवा गोड (किंवा दोहोंचे कॉम्बो) म्हणून स्वीकारावे.
‘ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले |
औषध नलगे मजला, औषध नल गे मजला |
परिसुनि माता ‘बरे’ म्हणूनी डोले ||
… नलाच्या विरहामुळे आजारी पडलेल्या दमयंतीला औषधोपचार देण्यासाठी वैद्य आले असता, तिने “औषध नलगे मजला” असे उत्तर दिले त्यावरून इतरेजनांनी “तिला औषध नको (नलगे)” असा अर्थ काढला. मात्र तिच्या मनांतील खरी भावना “मला नल हेच औषध (नल गे)” हीच होती. पण संकोचाने ती तसे व्यक्त करू शकत नव्हती. हा सदाबहार श्लेष काव्यालंकार रचणारे पंडित मोरोपंत (कवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मयूर पंडित १७२९-१७९४) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी होते. हे पुराण-काव्य अंमळ जुने झाले. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या मधुमती या गाजलेल्या चित्रपटातील वैजयंतीमालाच्या गावरान नृत्यकलेने सजलेल्या ‘चढ़ गयो पापी बिछुआ’ या गाण्यात नायिका म्हणते- ‘मंतर झूठा, बैद भी झूठा, पिया घर आ रे ! सरतेशेवटी ‘सैंया को देख के जाने किधर गयो बिछुआ ‘ असे सर्व श्रेय प्रियकराला देऊन मोकळी होते.
मंडळी, आजारामुळे घरात बसायचा जाच सहन करीत लहान मुले रडत-रडत नेमके हेच सांगतात, ‘मला औषध नको ग आई!’ पण त्याचे नाक वगैरे दाबून मधाळ औषधीयुक्त सिरप त्याच्या घशाखाली उतरवल्याशिवाय आईचे इतिकर्तव्य समाधानपूर्वक पूर्णत्वाला जात नाही. आमच्या लहानपणी कोजागिरीच्या पर्वाला लागून महिनाभर ‘भुलाबाईच्या गाण्यांना’ ऊत यायचा. त्यात पुन्हा खाद्य-संस्कृतीला जागत प्रत्येक घरी गाणी म्हटल्यानंतर स्वादिष्ट फराळाचा रतीब असायचा. त्याची सुंदर सांगता कोजागिरीला केशर-मेव्याने युक्त आटीव दुग्धपानाने व्हायची. त्यातले एक गाणे आठवणीत राहिले. आधी तर दोडक्या सासरच्या वैद्याचे वर्णन येते, ‘आला ग सासरचा वैद्य’, अपेक्षेप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व ‘फाटके तुटकेच’ असते. मग येणार लाडक्या माहेरचा वैद्य, त्याचे व्यक्तिमत्व साहजिकच राजेशाही असणार… या गाण्यांमधून सासरच्या मंडळींनी वर्षभर केलेल्या छळावर उतारा म्हणून ही गोड गाणी असायची. मात्र या गाण्यातील संदेश असेच सांगतो की – ‘ वैद्य असो वा डॉक्टर, त्याची पर्सनॅलिटी पेशंटसाठी कायमच कौतुकाचा विषय असते. ’
मैत्रांनो, आपले सणवार जेवून-खाऊन समाधानाने साजरे करायची आपली अक्षय परंपरा आहे. इतकंच काय, नावालाच निराहारी अशी एकादशीची परंपरा आपण निर्जळा एकादशी म्हणून सुरु ठेवतो. (कोणी तरी म्हटलंय, ‘निर्जळा एकादशीला इतका वैविध्यपूर्ण फराळ करावा की जळाला सुद्धा पोटात जागा असू नये!’) आम्हां भारतीयांचे सेलेब्रेशन खाण्यापिण्याभोवती रिंगण घालत असते. कोणी रुजू होऊ दे नाही तर निवृत्त, पार्टीला पर्याय नाहीच. गेलाबाजार असा कुठलाच प्रसंग मला आठवत नाही जेव्हा खाण्यापिण्यापासून वेगळे होत आपण कांही साजरे करीत असू.
मैत्रांनो, असे कधी होईल कां की आपण मळलेल्या वाटा सोडून अनवट रानवाटा धुंडाळीत एखादे समाजाभिमुख कार्य करू? खात्यापित्या घरच्या लाडक्या आप्तांची अन मैत्रमंडळींची पोटे आधीच तुडुंब भरलेली आहेत. त्यांना पार्टी देण्याऐवजी ज्यांची पोटे खपाटीला गेली आहेत अशा भुकेल्या व्यक्तींना दोन घास खाऊ घालता येतील कां, यावर आपण विचार करायला हवा. त्यांची दारिद्र्याच्या तमाने झाकोळलेली उदासीन दिवाळी उजळायला आपल्या दानाचे दीपदान त्यांचे आयुष्य नक्कीच सुसह्य करील.
तुम्हाला काय वाटतं?
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈