1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  शिवथर घळ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆  शिवथर घळ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆ 

सह्याद्रीच्या डोंगररांगात अनेक घळी आहेत, अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध ही आहेत पण सर्वात प्रसिद्धीला आली ती श्री रामदास स्वामींची शिवथरघळ!

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, वरंधा घाटाच्या कुशीत ही घळ विराजमान झालेली आहे. ही घळ चारी बाजूंनी हिरव्यागार झाडांनी झाकून गेली आहे. सतराव्या शतकात श्री.रामदासांनी निबीड अरण्यात, निसर्गसंपन्न स्थळी असलेल्या ह्या घळीची ध्यान धारणेसाठी निवड केली. समर्थांनी बावीस वर्षे इथं वास्तव्य केले आणि ह्या घळीतच दासबोधा सारख्या आध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती झाली. श्री. कल्याणस्वामी नी हा ग्रंथ अक्षरबंद केला. ह्या ग्रंथाद्वारे रामदासस्वामींनी सर्व जाती,पंथ, धर्माच्या स्त्री पुरुषांना उपदेश केला आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला.शिवराय आणि समर्थ रामदासांची पहिली भेट  ह्याच घळीत झाली.

या घळीत रहाण्या मागचा रामदासांचा ग्रंथनिर्मिती हा एकमेव हेतू नव्हता तर त्यांचा महत्त्वाचा हेतू होता की शिवरायांना स्वराज्य बांधणीत मदत करणे. डोई जड झालेले जावळीचे चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांची खबर विजापूरला कळवतात, हे ध्यानात येताच समर्थांनी मठा मंदिरा द्वारे जावळी खोऱ्याची संबंध प्रस्थापित केले. तेथील आम जनतेला स्वराज्याच्या बाजुला ओढून घेतले. पुढे शिवाजी महाराजांनी मोर्‍यांचा निपात केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी हे दोन्ही हिरे शिवाजी महाराजांना गवसले.

अफजलखान  विजापूरहून निघाला त्यावेळी याच घळीतून रामदासांनी शिवबांना निरोप धाडला “केसरी गुहेसमीप मस्तीत चालला”.

“एकांती विवेक करुनी इष्ट योजना करावी.”

समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजे शिवथर घळ.

समर्थानंतर तब्बल अडीचशे वर्षे कुणालाच या घळीची माहिती नव्हती. “रामदास गोसाव्याची गुहा” असं या घळीला म्हटले जायचे. समर्थ साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक धुळ्याचे शंकरराव देव यांनी काही कागदपत्रांच्या आधारे एकोणीशे तीस साली या घळीचा शोध लावला. नंतर एकोणीसशे पन्नास साली समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली. त्यांच्या पुढाकाराने या संपूर्ण जागेचे नूतनीकरण करण्यात आले, पर्यटकांना चढण्यास सोपे जावे म्हणून पायऱ्या बांधून दोन्ही बाजूला लोखंडी रॉड लावले गेले. पायथ्यापासून शंभर पायऱ्या चढून आल्यावर घळीपाशी पोचता येते. घळीत समोरच समर्थांच्या बसण्याची जागा आहे. सुमारे एक हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या घळीत दगड आणि माती यांचं बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत. हवा खेळती राहावी म्हणून खिडकी सारख्या पोकळ्या ठेवल्या आहेत. या घळीच्या  बाजूला असलेला धबधबा 100 फुटावरून खाली पडतो, उन्हाळा व हिवाळ्यात या धबधब्याचे पाणी शांत व मनोहरी दिसते. पण पावसाळ्यात हेच पाणी तांडव नृत्य करणाऱ्या शंकराचे रूप घेते.  घळीत आजही शांतता आणि गारवा जाणवतो निसर्गाचा हा गारवा यांत्रिक एअर कंडिशनिंग पेक्षा जास्त गार आहे. या घळीत रामदास स्वामी दासबोध सांगताहेत आणि कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अशा दोन मूर्ती पहावयास मिळतात.

शिवथर घळ येथे सेवा समितीच्या इमारतीमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

समर्थांनी या घळीला “सुंदर मठ असे म्हटले आहे.”

ही जागा अशी आहे की एक वेगळीच मनशांती इथे लाभते. अशी मनशांती मिळण्याचे भाग्य आम्ही सहलीला  गेलो तेव्हा मला लाभली. अशी ही अद्भुत घळ आपणही पहावी म्हणून हा सारा खटाटोप.

।।जय जय रघुवीर समर्थ.।।

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈