श्री नितीन सुभाष चंदनशिवे
मनमंजुषेतून
☆ पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
झी मराठीवर होममिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झालेला होता. रोज संध्याकाळी हा कार्यक्रम बघण्यात आमचं कुटुंब एकत्र बसलेलं असायचं. आणि आमच्या वहिनीला इथंच स्वप्नं पडायला सुरुवात झाली. की, होम मिनिस्टर माझ्याही घरी यावा. मलाही पैठणी मिळावी. आणि आपणही टीव्ही वर दिसावं. आणि वहिनी कार्यक्रम संपल्यानंतर आदेश भावजी जो नंबर सांगायचे त्यावर ती रोज मेसेज करू लागली. मी म्हणायचो तिला, “अगं वहिनी ते कशाला येतील आपल्या घरी एवढ्या दूर, ते फक्त पुणे मुंबईतल्याच घरी जात असतात. तू हा नाद सोडून दे. ” त्यावर वहिनी म्हणायची, “नितीन भावजी, बघा एक ना एक दिवस आपल्या घरी होममिनिस्टर येणारच असं म्हणून ती तिच्या कामात व्यस्त व्हायची. आणि मी त्यावर थोबाड बघावं आपलं आरशात” असं बोलून पळून जायचो. त्यावर ती मागून ओरडायची. ” या गिळायला मग बघते कोण देतंय ताट वाढून असं चिडून बोलायची. “आणि घरातले सगळेच खळखळून हसायचे. पण वहिनी अगदी पार त्यात गुंतून गेलेली असायची. प्रत्येक कार्यक्रम तो जवळ बसून बघायची. एकटीच उगाचच हसायची, मोठ्याने खिदळायची. मला गम्मतच वाटायची.
माझी बारावी झाली. आणि मी पुण्यात आलो. काम करून शिकायला लागलो. अधून मधून फोनवर दादाशी आणि वहिणीशी बोलणं व्हायचं. तिला कधी करमत नसलं की ती मला फोन करायची. मला करमत नसलं की मी तिला फोन करायचो. कारण तिच्याच मायेच्या पदराखाली मी मोठा झालो. सुनिता वहिनी माझ्यासाठी आई होती, मोठी बहीण होती, आणि मनातलं सगळं मनमोकळेपणाने बोलण्यासाठी हक्काची जागा होती.
मला तो दिवस आठवतोय. मी कंपनीमध्ये बसलो होतो. आणि समोर लँडलाईन फोन होता. चला म्हणलं वहिनीची जरा गंमत करूया. असं म्हणून मी रुमाल तोंडाला लावला आणि वहिनीला फोन केला, हा लँडलाईन चा नंबर बघून तिने तो कट केला. मी परत लावला मग तिने उचलला. मी जरा मोठ्या आवाजात रुमाल तोंडाला लावून अगदी शुद्ध पुणेरी भाषेत बोललो, “हॅलो, नमस्कार सुनिता चंदनशिवे यांच्याशी आम्ही बोलतोय का?”वहिनी घाबरत होय म्हणाली, मी लगेच पुढचं वाक्य बोललो, “ह आम्ही झी मराठी मधून होम मिनिस्टर या कार्यक्रमामधून बोलतोय आणि आम्ही उद्याच तुमच्या घरी कवठेमहांकाळ ला म्हणजे सांगलीला येतोय. आपली परवानगी आहे असे आम्ही समजावे का?” त्यावर वहिनी मोठ्याने तीन वेळा ” या या या” असं म्हणली. बाकीचं जरा इकडंच तिकडचं बोललो, आणि “उद्या संध्याकाळी आम्ही बरोबर पाच वाजता आपल्या घरी येत आहोत” असं म्हणून मी फोन कट केला. नंतर मी कामात व्यस्त होऊन गेलो. वहिनीला फसवलं याचा मनात आनंद झालेला होता. पण आनंदाने उड्या मारण्याचं माझं वय आता निघून गेलेलं होतं.
गावी मात्र सुनिता वहिनीने सगळीकडे बोंबलत ही बातमी आनंदाने पसरवली. भावाला कामावरून सुट्टी काढून बोलावून घेतलं. तिचा आनंद बघून सगळेच आनंदी झाले. साफसफाई सुरू झाली. नव्या दोन साड्या आणल्या. ही बातमी बायकांच्या जवळची असल्यामुळे आपोआप सगळ्या गावभर झाली. आणि सुनिता वहिनी एकदम सेलिब्रिटी झाली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. वहिनीने तिच्या तीन बहिणी, तिचे दोन भाऊ, माहेरची सगळी माणसं आई वडील, तिच्या मावशी, सगळ्यांना ताबडतोब गाडीला बसायला सांगितलं. बघता बघता बातमी ग्रामपंचायतपर्यंत पोहचली. आपलं गाव टीव्ही वर दिसणार म्हणून सरपंच, उपसरपंच इतर सदस्य आणि विरोधी पक्षातले पण सगळ्यांची मिटिंगसुद्धा बसली. आणि बघता बघता आमचं घर आणि आमच्या सुनिता वहिनीची चर्चा वाऱ्यागत पसरत राहिली. सेलिब्रिटी असल्यागत आमची वहिनी वागू लागली. अचानक तिचं ग्रामीण बोलणं अगदी शुद्ध झालं. तिचं चालणं तिचं बोलणं सगळं बदलून गेलं. आमचा दादाही तिच्या आनंदात हरवून गेला. आणि लग्नात सुद्धा एवढं मेकअपचं सामान आणलं नव्हतं त्याहून कितीतरी जास्त आणि महाग सामान दादाने तिला आणून दिलं. दोन तासात त्याने आणि त्याच्या मित्रानी घर ही रंगवून काढलं. आणि सगळ्या गावात होमिनिस्टरचं वातावरण तयार झालं. बिश्या फोडून आमच्या घरातल्या सगळयांना नवीन कपडे घेतले गेले. मला यातलं एक टक्काही काही माहीत नव्हतं. मी माझ्याच नादात इकडं रमून गेलो. आणि आपण वहिनीला होममिनीस्टर बोलतोय म्हणून फोन केला होता हे ही विसरून गेलो. कारण अशा गमती जमती करणं हा माझा रिकामा उद्योगच होता.
त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या माहेरहून वीस पंचवीस माणसं लहान लेकरं वेगळीच. अस सगळं गणगोत गोळा झालं. आणि फार मोठा उत्सव असल्यागत वातावरण झालं. नुसतं आमच्या घरातच नाही तर गल्लीतसुद्धा सगळ्यांच्या तोंडात एकच चर्चा एकच विषय आणि तो म्हणजे होममिनिस्टर आणि सुनिता. आणि आमच्या सुनिता वहिनीचा रुबाब म्हणजे काय सांगावं. तिच्यासमोर इतर बायका म्हणजे चिल्लरच. एकटीचीच बडबड, सगळ्यांना आदेश सोडत होती. ये असं करायचं, तसं करायचं कुणी दंगा करायचा नाही. मध्ये मध्ये बोलायचं नाही. आणि सगळेजण तिचा आदेश नम्रपणे ऐकून घेत होते. आणि सुनिता वहिनी एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेली होती.
सायंकाळचे चार वाजून गेले. घरासमोर गर्दी झाली. सुनिता वहिनी बघावं आणि बघतच राहावं अशी नटली होती. सगळे नातेवाईक नटून थटून बसलेले होते. अजून कसं कुणी आलं नाही म्हणून हळूहळू वातावरण काळजीचं होऊ लागलं. दादाने तिच्या मोबाईलवर आलेल्या म्हणजे मी केलेल्या नंबरवर परत परत फोन करायला सुरुवात केली. पण फोन काही कुणी उचलत नव्हतं. कारण रविवार होता आणि ऑफिस बंद होतं. मी रूमवर झोपलो होतो. काय झालं कुणास ठाऊक, वडिलांना शंका आली आणि त्यांनी मला फोन केला. मी वडिलांचा नंबर फादर म्हणून सेव्ह केला होता. मी फोन उचलला तसे वडील म्हणाले, ” हे बघ मी तुझा बाप आहे, मी जे विचारीन त्याचं एकाच शब्दात उत्तर द्यायचं आणि खरं द्यायचं. “मी घाबरलो, अण्णा असं का बोलतायत म्हणून मी उठुनच बसलो. फोन कानाला आवळून धरला. आणि वडील म्हणाले, ” ते कोण टीव्ही वाले येणारयत म्हणून सुनिताला काल तूच फोन केला होता का?”मी गप्प झालो, वडिलांनी आवाज वाढवून पुन्हा विचारलं आधीच धमकी दिली होती मी पटकन म्हणलं ” होय अण्णा मीच काल आवाज बदलून वहिनीला फोन केला होता. “त्यावर अण्णांनी असल्या शिव्या दिल्या मला की बस्स. आपोआप डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी फोन कट केला. आणि माझ्या बहिणीला फोन केला, म्हणलं “तायडे, काय सुरुय ग घरी, ?'” त्यावर माझी बहिण इतक्या आनंदाने तिथल्या वातावरणाबद्दल सांगत होती. आणि माझ्या छातीत चमकत चाललं होतं. आणि डोळ्यासमोर हातात हिरव्यागार बांगड्या, तळहातावर मेहंदी काढलेली, आणि नटलेली सुनिता वहिनी दिसू लागली. मी फोन कट केला. आणि मला दम लागला.
तिकडे वडिलांनी सुनिता वहिनीला आणि इतर लोकांना कसं सांगितलं माहीत नाही. पण सुनिता वहिनी मात्र हे सगळं नितीन भावजीने केलं आहे. आपली इतकी मोठी फसवणूक झालीय या धक्क्याने गपकन खालीच बसली होती. ती रडत ही नव्हती कुणाशी बोलत ही नव्हती. एकटक ती दातात ओठ पकडून भिंतीकडे बघत बसली होती. सगळं वातावरण काही काळ शांत झालं होतं. सुनिता वहिनीला हा फार मोठा धक्का बसला होता. आणि सगळ्यांच्या तोंडात एकाच नावाने शिव्या सुरू झाल्या होत्या आणि तो ग्रेट माणूस नितीन चंदनशिवे म्हणजे मी होतो. तिच्या माहेरून आलेल्या तिच्या बहिणी तर वाट्टेल तसं बोलत होत्या. सगळेजण सुनिता वहिणीला एकच वाक्य बोलत होते
” घे तुझा लाडाचा नितीन भावजी. लै बोंबलत होतीस माझा नितीन भावजी माझा नितीन भावजी. कर अजून लाड त्याचा. बस ताटात घेऊन त्यालाच. चांगलं पांग फेडलं बघ तुझ्या भावजीने. ” … समोर भिंतीच्या फळीवर माझा फोटो मी एका काचेच्या फ्रेममध्ये बनवून ठेवला होता. वहिनी अचानक उठली आणि तिने तो फोटो जोरात फरशीवर आपटला. सगळ्या घरात काचा झाल्या. कुणीच काही बोललं नाही.
माझ्या मोबाईलवर सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली. मी उचलायचो कानाला लावायचो आणि शिव्या खायचो. तोंडातून आवाज निघत नव्हता. वहिनीची केलेली मस्करी चांगलीच महागात पडली होती. आनंदाने उत्साहाने भरलेलं घर एका क्षणात शांत झालं. सगळेजण आपल्या आपल्या गावी निघून गेले. आणि सुनिता वहिनी आजारी पडली. चार दिवस घराच्या बाहेर आली नाही. तिने टीव्ही लावला नाही. कुणाशीच बोलली नाही. आईने आणि बहिणीने मला बजावून ठेवलं. दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढू नकोस. तिचा राग शांत झाला की मग ये. पण माझं धाडसच होत नव्हतं.
– क्रमशः भाग पहिला
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈