मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

माणसाचा दुर्मिळ जन्म मिळूनही, त्याचा अंतिम उद्देश ज्यांच्या अजिबात लक्षात येत नाही, अशा सर्वसामान्यांसाठी श्री समर्थ रामदासांना “श्री दासबोध” हा ग्रंथ लिहावासा वाटला असावा, असे या ग्रंथाच्या पानोपानी जाणवते. माणसाची दिनचर्या कशी असावी, त्याने राहावे कसे, बोलावे कसे, वागावे कसे, चांगले म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, इतक्या सगळ्या रोजच्या आचरणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपासून सुरुवात करून, अखेर, एकमेव शाश्वत असे जे परब्रह्म, ते जाणून घेण्यासाठी आवश्यक अशा आत्मज्ञानाच्या खुणा अंगात कशा बाणवायच्या,  या समजण्यास अतिशय अवघड गोष्टीपर्यंतचे सर्व ज्ञान सामान्यांना यातून मिळावे हा या ग्रंथाचा स्पष्ट हेतू असावा. अर्थात सामान्य माणसाला या पायरीपर्यंत पोहोचायला एक मानव जन्म पुरणारच नाही हेही समर्थ नक्कीच जाणून होते. आणि म्हणूनच  कोणते सद्गुण,  म्हणजेच सत्वगुण अंगी बाणवले तर अखेर “त्या जगन्नियंत्या परब्रम्हाचे दर्शन होणे” या मानव-जन्माच्या अंतिम उद्दिष्टाच्या दिशेने निदान वाटचाल तरी सुरु करणे मानवाला शक्य होईल, हेच या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारे सांगितले असावे असे वाटते. अंगी सत्वगुण बाळगणे हा यासाठीचा त्यातल्या त्यात शॉर्टकट असावा असेच पूर्ण वेळ वाटत रहावे, इतका हा मुद्दा या ग्रंथाच्या केंद्रस्थानी असल्याचेही जाणवत रहाते  —-  आणि मग आजच्या काळानुरूप सत्वगुण म्हणजे नेमके काय अपेक्षित असावे, हा प्रश्न पडतो —- त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

मानवी स्वभावातले ‘सत्व- रज – तम‘ हे ठळकपणे दिसणारे तीनही गुण सारखेच शक्तिशाली असतात. आणि कुठलीही शक्ती कशी वापरली जाते, यावर तिचा परिणाम अवलंबून असतो.  रज आणि तम हे गुण स्वतःभोवती, प्रपंचाभोवती, आणि परिणामतः ऐहिक गोष्टींभोवती फिरत राहणारे, तर सत्वगुण सतत स्वतःमधून स्वतःला बाहेर काढणारा, आणि सतत त्या परमशक्तीकडे आकर्षित करणारा. त्यामुळेच, “जग माझ्यासाठी आहे“ ही भावना रज-तम गुणांमुळे निर्माण होते.  तर “ मी जगासाठी आहे “ ही भावना वारंवार जागृत करतात ते सत्वगुण –अशी थोडक्यात व्याख्या करता येईल.  हे सत्वगुण “परमदुर्लभ“ असं समर्थांनी अगदी सार्थपणे म्हटलं आहे. कारण असं असावं की, मुळातच सगळ्या सजीवांबद्दल, “ते खऱ्या अर्थाने  स्वजातीय  आहेत, माझे स्वकीय आहेत“, अशी आपलेपणाची, जवळकीची भावना मनात उपजतच असणं अत्यंत अवघड असतं. पण निश्चयपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक सत्वगुण अंगिकारले तर ते सहजसाध्य होऊ शकतं, हा विश्वास समर्थ देतात. “मी जगासाठी आहे“ अशी मनाची ठाम धारणा झाली की, हळूहळू इतर प्रत्येक माणसाबद्दल प्रेमभावना वाटू लागते. ती वागण्यातही दिसू लागते. आप-पर भाव नकळत पुसट-पुसट व्हायला लागतो. मग आपोआपच मोह-क्रोध-मत्सरादी षड्रिपूंचा मनातला धुमाकूळ हळूहळू आणि स्वतःच्याही नकळत कमी व्हायला लागतो आणि मनही नकळत शांत- समाधानी होऊ लागतं. अर्थात “ठरवलं आणि झालं“ असा साधा- सरळ मामला नसतोच हा. यासाठी जाणीवपूर्वक सातत्याने प्रयत्न करावे लागतात. हळूहळू तो जेव्हा जगण्याचाच भाग होऊन जातो, प्रत्येक सजीवात परमात्म्याचा अंश आहे ही भावना मनात पक्की रुजते, तेव्हा मग परमात्मास्वरूप असणाऱ्या स्वतःच्या आवडत्या देवरूपाकडे,  सद्गुरुंकडे मन ओढ घ्यायला लागतं — कारण तो जागोजागी असल्याचं अंतर्मनाला जाणवायला लागतं. आणि नकळतपणे  मनातून “मी“ हद्दपार होऊ लागतो. मग स्वतःवर दुःख कोसळले, किंवा सुखे हात जोडून समोर उभी राहिली, तरी या कशानेच मन विचलित होत नाही. ते अधिकाधिक विशाल होत जातं –वृत्तीचा संकुचितपणा आपोआप कमी होत जातो. इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो, आणखी सकारात्मक होतो आणि रज – तमापेक्षा सत्वगुण अत्यंत आनंददायक, शांतीदायक, सुखदायक असल्याची खात्री पटू लागते. प्रपंचात राहूनही परमार्थ साधण्याचा मार्ग उघडपणे समोर दिसू लागणे, ही याची पुढची पायरी. मग इतर कशाहीपेक्षा ईश्वराबद्दल सर्वाधिक ओढ, प्रेम वाटू लागते. स्वतःच्या दुःखांची बोच नगण्य वाटायला लागते. आणि इतरांची दुःखे कमी करण्यासाठी हात आपोआपच पुढे होतात. संत ज्ञानेश्वर – तुकाराम यांच्यासारखे अनेक संत म्हणजे  सत्वगुणांची मूर्तिमंत उदाहरणे.  सत्वगुण म्हणजे काय, कोणत्या कृतीमध्ये  ते ठळकपणे  दिसून येतात, हे श्री समर्थांनी दासबोधाच्या दुसऱ्या दशकातल्या  सातव्या  समासात विस्तृतपणे सांगितले आहे.

 क्रमशः….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈