सौ. अलका ओमप्रकाश माळी
मनमंजुषेतून
☆ – पांडुरंगाची सावली … माझी रखुमाई ! – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
आज एकादशी त्यामुळे मला दोन तीन वर्षापूर्वी घेतलेलं विठुरायाचे दर्शन आठवले.. तोबा गर्दी मध्ये सुध्दा मिळालेलं vip दर्शन आणि त्या सभा मंडपात बसून विठुराया सोबत मारलेल्या गप्पा आठवल्या.. पांडुरंगाची ती शांत मूर्ती डोळ्यात साठवत किती तरी मनीची गुपित त्याला सांगितली होती.. आणि माझ्या प्रत्येक वाक्यावर त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर भाव बदलत आहेत असा होणारा भास सुखावत होता..
आजही बऱ्याचदा मला ते तासभर घेतलेलं दर्शन, त्या गप्पा आणि ती मूर्ती कित्येकदा डोळ्यासमोर येते आणि नकळत डोळे पाणावतात.. मला विठ्ठल भेटला तर ? हा प्रश्नच कधी डोक्यात आला नव्हता.. कारण माझ्यापुरता तो सावळा मला रोज वेगवेगळ्या रूपात भेटतो ह्याची अगदी खात्री आहे.. कधी बागेत फुलणाऱ्या फुलांमध्ये, कधी बरसणाऱ्या सरींमध्ये, कधी वाऱ्याची मंद झुळूक बनून, तर कधी वाहणाऱ्या नदीच्या पात्रामध्ये तो असतोच.. कधी मन उदास असेल तर, कधी आनंदाने नाचत असेल तर तो माझ्या सोबत असतोच असतो.. आमच्याकडच्या देव्हाऱ्यात तो आहेच पण त्याहून सुंदर असं रूप माझ्या मनात आहे असं मला सतत जाणवतं राहतं..
पण तो जर कधी अगदी पांडुरंग रुपात तो माझ्यासमोर उभा राहिलाच तर मात्र मी त्याला सांगणार आहे हो.. बाबा रे त्या रखुमाईला अशी एकटीच उभी नको करुस हो.. तिचा रुसवा काढून तिला मनव आणि तुझ्या सोबत तिला घे, तुझ्या बाजूलाच ती जास्त शोभून दिसते.. आणि खरं सांगू का पांडुरंगाची ती एकटी मूर्ती मला नाही पाहवत.. ती अगदीच केविलवाणी वाटते.. पण तेच रखुमाई सोबत असताना त्या विठूरायाचे मुखकमल अगदी उजळून निघालेलं असतं.. तो रखुमाईसोबत जास्त आनंदी वाटतो.. तेंव्हा जर तो सावळा मला कधी भेटलाच तर हे एक मागणं मात्र नक्की मागणार आहे मी.. कृष्ण जसा राधेशिवाय अपूर्ण वाटतो तसचं विठ्ठलासोबत रखुमाई हवीच हवी.. तिच्याशिवाय तो अपूर्णच भासतो मला..
आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन.. तर तुम्ही काहीही म्हणालात तरी मला ते दोघे सोबतच हवेत असं वाटतं.. येवढं एकच मागणं त्या पांडुरंगाकडे मागेन.. आणि त्याला ही ते पूर्ण करावंच लागेल.. स्वतः साठी किंवा अजून कोणासाठी काहीही मागायच नाहीय मला, कारण तो न मागताच बरंच काही देऊन जातो.. कधी कधी तर पात्रता नसतानाही इतकं काही देतो की माझी झोळी अपुरी पडते.. तेंव्हा ‘ हे पांडुरंगा जर कधी भेटीचा योग आलाच तर माझ्या रखुमाईला ही सोबत घेऊनच ये हो.. ‘
*
पांडुरंगाची सावली माझी रखुमाई..
तिच्या शिवाय नाही कसलीच अपूर्वाई..
*
साऱ्या जगाची तू माऊली..
पण तुझी सखी मात्र एकटीच राहिली..
*
घे तिलाही सोबत तुझ्या विटेवरी..
सावळ्या नको अंत पाहू आता धाव घे सत्वरी..
*
© सौ. अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈