श्री सुनील शिरवाडकर

??

☆ पत्रास कारण की… ☆ श्री सुनील शिरवाडकर

यंदाच्या दिवाळीला मला जावयाने एक पुस्तक भेट दिलं.

त्यांचं नाव..’ पत्रास कारण की..’  अरविंद जगताप त्याचे लेखक आहेत.

झी मराठी वर ‘चला हवा येऊ द्या ‘ नावाचा कार्यक्रम असतो.एकदा अरविंद जगताप यांनी त्या कार्यक्रमात एक पत्र पाठवले.ते त्या कार्यक्रमात वाचून दाखवले. खूप जणांना ते आवडले.अजून एक पत्र लिहा असा त्यांना आग्रह झाला.आणि मग तो सिलसिला सुरू झाला.सागर कारंडे ती पत्र वाचून दाखवायचे. मुळात ती पत्र खूप संवेदनशील..भावनाप्रधान..त्यात सागर कारंडेच्या आवाजाने त्या शब्दांना गहिरा अर्थ प्राप्त व्हायचा.

खूप लोकांचा आग्रह झाला..या पत्रांचे पुस्तक प्रकाशित व्हावं. मग झी मराठीच्या सहकार्याने ग्रंथाली ने हे पुस्तक प्रकाशित केले.खूप विविध विषयांवर लिहीलेली पत्रे त्यात आहेत.

खरंतर पत्रलेखन ही एक कलाच आहे.पण हळूहळू आपण ती विसरत चाललो आहे.पत्र लिहिणं  तर दूरच.. आपण लिहिणंच विसरत चाललो आहे.आता फक्त टायपिंग करणं हेच आपल्याला माहीत आहे.पत्र लिहीण्यात..ते पाठवण्यात आनंद तर होताच..पण पत्राची वाट पहाण्यात पण एक मोठा आनंद होता.आपल्या घरुन आलेली पत्र सीमेवर लढणाऱ्या जवानांना जगण्याचं बळ देत होती.गावाहुन आलेली पत्रे होस्टेलवर शिकणाऱ्या मुलांचा जगण्याचा आधार होती.पोस्टाच्या त्या लाल पेटीकडे  बघुन एक वेगळी भावना मनात निर्माण व्हायची.

बहुतांश निरक्षरता असलेल्या गावांमध्ये पोस्टमन हाच एक जाणता माणूस असायचा. गावकऱ्यांकडे आलेली पत्र तोच उघडायचा..तोच वाचून दाखवायचा.घरातली माणसं तो काय वाचून दाखवतो.. त्याकडे कानात प्राण आणून बसायचे.पोस्टमन हा सगळ्यांच्या घरातलाच एक माणूस होऊन जायचा.

काही काही पत्रे तर ऐतिहासिक ऐवज म्हणुनच जपली गेली.आदर्श राज्यकारभार कसा असावा, याबद्दल शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्रे तर आजच्या राजकारण्यांची वाचणं खूपच गरजेचं आहे.पं.नेहरुंनी इंदिरेला लिहीलेली पत्र आवर्जून वाचण्यासारखी आहे.

पत्रे लिहीणे ही कल्पनाच हळूहळू लोप पावत चालली आहे.या पत्र लेखनावरुन मला एक आरती आठवली.खरंतर ते एक भजन आहे.आमच्या गल्लीत नवरात्र उत्सवात आरत्या म्हटल्या जातात.त्यात हे भजन आरतीप्रमाणे म्हटलं जातं.

… हे आहे विठ्ठलाचं भजन.हे भजन म्हणजे पांडुरंगाला पाठवलेले एक पत्रच आहे.पण आमच्या इथे आम्ही देवीचे भक्त देवीला पत्र लिहीत आहे असं समजून आरती म्हणतो.

त्या आरतीची संकल्पना अशी आहे की एक देवीचा भक्त आहे.त्याला असं वाटतं की आपण देवीला एक पत्र लिहावं.आपल्या भावना..आपलं सुख..आपलं दुःख.. सगळं सगळं त्या पत्रात लिहावं.

*मला वाटते एकदा तुला पत्र लिहावे

माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे*

… असं म्हणून तो पत्र लिहितो.

आता हे एवढं पत्र लिहिले तर आहे..पण ते देवीला पाठवायचे कसे?त्याला थोडीच देवीचा पोस्टल ॲड्रेस माहीत आहे?देवीचं रुप चराचरात भरलं आहे हे तर आहेच..पण पत्रावर पत्ता काय लिहायचा?

*तुजला कसे आठवू

पत्र कोठे पाठवू 

पत्ता तुझा ठाऊक नाहीं गं

अंबे..गाव तुझे माहीत नाही गं*

पत्र लिहिल्यावर तो भक्त अगदी आठवणीने देवीच्या घरच्यांना नमस्कार कळवतो.

*साष्टांग नमस्कार देवी तुझ्या चरणाला

साष्टांग नमस्कार तुझ्या कुटुंबाला*

आणि मग शेवटी देवीला पुन्हा विनवितो..

*एवढे पत्र वाचुन पहावे

त्यांचे उत्तर लवकर द्यावे*

आरती लिहिणाऱ्या कवीनं ते पत्र पाठवले का.. पाठवले तर कुठे हे महत्त्वाचे नाही.देवीला..आपल्या लाडक्या दैवताला पत्र पाठवावं ही कल्पनाच किती सुंदर आहे.मनातल्या भाव भावना तिथे किती नि:संकोचपणानं लिहीता येतील.खरंच..मन मोकळं करण्यासाठी पत्र लिहीणं हा सगळ्यात सोपा आणि सुंदर मार्ग आहे

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments