सौ. उज्ज्वला केळकर
☆ देणार्याचे हात घ्यावे… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
काल शारदा कामावर लवकरच आली. मी म्हंटलं, ‘ काय ग आज लवकर कशी? ’
ती म्हणाली, ‘आजपासून सानेवहिनींचं काम सोडलं. ’
‘ का ग? ’
‘ चार दिवसांपूर्वी बघा, त्यांच्या अन्वयने टेबलावर ५०० रु. ठेवले होते. कॉलेजमध्ये जाताना न्यायचे म्हणून आणि विसरला. नंतर त्यांनी आईला फोन करून सांगितलं, टेबलावर पैसे विसरलेत म्हणून. मी खोली झाडायला गेले, तेव्हा तिथे पैसे नव्हते. सानेवहिनी मला चार-चारदा विचारायला लागल्या. कुठे गेले म्हणून? आता मी पाहिलेच नव्हते तर काय सांगणार? मी तेव्हाच ठरवलं, हे काम सोडायचं. आम्ही तुमच्यापेक्षा गरीब, पण आम्ही कष्ट करून खातो, चो-या करत नाही. काम लगेच सोडलं असतं, तर संशय आला असता. पैसे घेतले असणार म्हणूनच काम सोडलं.‘
‘ मग?’ ‘ संध्याकाळी खुलासा झाला, की टेबलावर पैसे पडलेले पाहून त्याच्या पप्पांनी उचलून खिशात ठेवले. त्यांचे पैसे सापडले आणि मग मी काम सोडायचं ठरवलं. आम्ही दुसर्याकडे काम करतो, पण आम्हालाही काही मान-अपमान आहे की नाही? ‘
खरंच होतं तिचं बोलणं. घरातील एखादी वस्तू, इथे-तिथे टाकलेले पैसे, सापडेनासे झाले की प्रथम संशय येतो, तो कामवालीवर. कुणी तो आडवळणाने व्यक्त करतात. कुणी स्पष्टच विचारतात.
नंतर डाव्या-उजव्या हाताने ठेवलेली ती वस्तू किंवा पैसे आपल्याला सापडतात. पण आपण कामवालीवर संशय घेतला, ही आपली चूक होती, असं किती जणांना वाटतं? किती जणांना त्याचा मनापासून पश्चात्ताप होतो? किती जण त्यासाठी त्यांची क्षमा मागतात.
‘नाही रे’ वर्गाकडे आहे रे वर्ग नेहमीच संशयाने बघतो. व्यवहारात बर्याचदा असं दिसतं, की ‘आहे रे’ किंवा ‘खूप खूप आहे रे’ वर्गातील लोकच नीतीमूल्यांचं उल्लंघन मोठ्या प्रमाणावर करतात.
लाखो-करोडोंनी पैसे गोळा करणार्या सिनेमातील नट-नट्या, व्यापारी वर्ग, इन्कम टॅक्स चुकवताना दिसतात. सेल्स टॅक्स बुडवतात. आपला माल दुसर्या बॅनरखाली विकतात. एखाद्या सामान्य माणसाने विजेचं बील लवकर दिलं नाही, तर दंड होतो. वीज-पाणी तोडली जाण्याचे धमकी – पत्र मिळते, पण लाखो-करोडोंची वीज-पाणी बिलं थकवणार्या कारखानदारांचं, संस्थांचं, प्रतिष्ठानचं काय?. वीज-पाणी तोडलं गेलं, तर आम्ही कारखान्याला टाळं ठोकून घरी बसून राहू.
त्यावर अवलांबून असणार्या लोकांचा तुम्ही विचार करा, असं आरडा-ओरडा करायला ही मंडळी मोकळी. माझे मामा नेहमी म्हणायचे, गेली ना वस्तू, जाऊ दे. चोराच्या उपयोगी पडेल की नाही?
गेलेल्या गोष्टीचा सारखा विचार करून ती परत येणार आहे का? तुम्ही स्वत::मात्र दु:खी होता.
चोरीला गेलेल्या पैशांचा, वस्तूंचा विचार करण्यापेक्षा, विचार करण्यासारख्या पुष्कळ महत्वाच्या गोष्टी आहेत जगात. भाकरी पळवणार्या कुत्र्यामागे तूप घेऊन धावणार्या एकनाथांइतके नाही, तरी माझे मामा एकूण ग्रेटच. पण त्यांचे संस्कार होऊनही बारीक-सारिक, क्षुल्लक गोष्टींचा विचार करण्याची माझी सवय. एखादे बॉलपेन किंवा एखादा चमचा दिसेनासा झाला, तरी मी अस्वस्थ होते.
कारखाने नेहमीच तोट्यात चालतात, पण मालक, संचालक, यांची आर्थिक स्थिती अधिकाधिक कशी सुधारते हे गणित मला कधीच कळलं नाही. बदलता येईल आपल्याला ही वृत्ती, प्रवृती?
व्यक्तीला लुबाडलं, तर ते अनैतिक, पण शासनाला लुबाडायला काहीच हरकत नाही, अशी वृत्ती, प्रवृती स्वातंत्र्योत्तर काळात वाढत चाललीय. त्यातूनच बोगस कंपन्या, पतसंस्था हे प्रकार सर्रास दिसतात. पंचवीस हजाराला दुसर्याला गंडा घालणारा पंचवीस रुपये सापडत नाहीत, म्हणून दुसर्यावर तुटून पडतो.
व्यक्ती जितकी श्रीमंत, तितका करबुडवेपणा अधीक. अर्थात हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे.
पण समाज व्यवहारात बव्हंशी असं दिसतं. समाजात अशी माणसंच जास्त ताठ मानेने मिरवतात.
समाजात प्रतिष्ठा, लौकिक प्राप्त करून घेतात. आदर-सन्मान मिळवतात. इतकंच नव्हे, असं करायला हवं… तसं करायला हवं… असा इतरांना उपदेश करतात.
माझी एक मैत्रीण म्हणते, आज-काल माणसाकडे पैसा पाहिजे. मग तो कुठल्या का मार्गाने मिळालेला असेना का? सुखी माणसाचा सदरा वगैरे गोष्ट काल्पनिक झाली किंवा पैसा हाच सुखी माणसाचा सदरा. मी विचार करू लागले, की खरंच पैशाने सुख मिळतं का? याचं उत्तर अर्थातच सुखाच्या ज्याच्या त्याच्या कल्पनेवर अवलांबून आहे. प्रतिष्ठा, लौकिक, उपभोग, यातच सुख आहे, असं ज्यांना वाटतं, त्यांना नक्कीच वाटत असेल, जवळ पैसा आला की झालं ! मग तो कोणत्या का मार्गाने आलेला असेना का?
‘ व्यवहारात सगळ्यांनाच काही असं वाटतं नाही. मनाचं समाधान, तृप्ती याचा कदाचित पैशाशी मेळ नाही घालता येणार. ’ मी मैत्रिणीला सांगते.
मला एक दंतकथा आठवली. दंतकथा खर्या की खोट्या? कुणास ठाऊक? पण त्या माणसाच्या वृत्ती, प्रवृत्ती यावर प्रकाश टाकतात, आणि संवेदनाक्षम व्यक्तींच्या वर्तनाला वळण लावतात, हे नक्कीच.
एक स्त्री तीर्थयात्रेला निघाली होती. वाटेत एका झर्याकाठी ती पाणी पिण्यासाठी थांबली. पाणी स्फटिकासारखं शुभ्र होतं. तळातल्या दगड-वाळूत तिला काही तरी चकाकताना दिसलं. ते एक मूल्यवान रत्न होतं. तिने ते उचललं आणि आपल्या शिदोरीच्या फडक्यात ठेवलं. ती पुढे चालू लागले. वाटेत तिला एक सहप्रवासी भेटला. दोघेही बोलत बोलत बरोबर निघाली. त्याच्याजवळ शिदोरी नव्हती, म्हणून तिने त्याला आपल्याबरोबर जेवायचा आग्रह केला. तिने शिदोरी सोडली.
त्यातील भाकरी, कोरड्यास, कांदा, चटणी वगैरे तिने त्याला दिले.
शिदोरी सोडताना त्याला ते मूल्यवान रत्न दिसले. त्याला वाटलं, या बाईला काही त्या रत्नाची किंमत कळलेली नाही. म्हणून तर तिने ते नीट सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं नाही. आपल्याला ते मिळालं, तर आपण मालामाल होऊ. आपलं जन्माचं दारिद्र्य फिटेल.
जेवता जेवता तो त्या बाईला म्हणाला, ‘बाई, तुमच्याकडे तो रंगीत खडा आहे ना, तो मला देऊन टाकाल?’
बाईने लगेच ते रत्न त्या यात्रेकरूला देऊन टाकलं.
पुढे कुठली यात्रा आणि काय, यात्रेकरू ते अनमोल रत्न घेऊन आपल्या घरी परत आला.
‘सहा महीने झाले. तो यात्रेकरू ते अनमोल रत्न घेऊन त्या बाईचे घर शोधत शोधत पुन्हा तिच्याकडे आला. तिचं रत्न परत करत तिला म्हणाला, ‘मला तुझ्याकडून या रत्नापेक्षा अधिक मूल्यवान गोष्टीची अपेक्षा आहे आणि माझी खात्री आहे, की तू मला निराश करणार नाहीस. ’
‘आता माझ्याकडे मूल्यवान असं काहीच नाही. ’ ती बाई म्हणाली.
‘नाही कसं? तुझी वृत्ती.. ज्या सहजपणे कोणताही मोह न धरता तू मला हे मूल्यवान रत्न देऊन टाकलंस, ती वृत्ती… ’
कथा इथच संपते. अशी निर्मोही वृत्ती देता-घेता येईल का? देता येणार नाही, पण घेता खचितच येईल. चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांकडे बघून, त्यांच्या वागण्या- बोलण्यातून, अनुभवातून, निरीक्षणातून प्रयत्नपूर्वक ही वृत्ती नक्की आपल्या अंगी नक्की बाणवता येईल.
मला एकदम विंदा करंदीकरांची कविता आठवली “घेता घेता एक दिवस देणार्याचे हातच घ्यावे. “
सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈