सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
बाळसेदार पुणे..
रोज सकाळी सुस्नात होऊन, तुळशीपुढे दिवा लावून, सुबकशी रांगोळी काढून, हातात हळदी कुंकवाची कुयरी सावरत सुवासिनी, श्री जोगेश्वरी दर्शन घेऊन मगच स्वयंपाकाला पदर बांधायच्या. वारांप्रमाणे वेळ काढून एखादी उत्साही गृहिणी समोरच्या बोळातून बेलबागेकडे प्रस्थान ठेवायची. आमच्या हातात आईच्या पदराचे टोक असायचं. आई भगवान विष्णूच दर्शन घ्यायला सभा मंडपात शिरली की आईच्या पदराचं टोक सोडून आमचा मोर्चा मोराकडे वळायचा. खिडकीवजा जागेत दोन मोर पिसारा फुलवित दिमाखात फिरायचे. आम्ही मोरपिसांचे मोहक रंग आणि पिसाऱ्यावरची पिसं मोजत असतांना मोर आपला पिसांचा पसारा आवरता घ्यायचा. आणि मग मनांत खट्टू होऊन आम्ही मागे वळायचो.
तर काय ! आनंदाने आणि सुगंधाने वेडच लागायचं. पानोपान फुलांनी डंवरलेल्या झाडांनी, बकुळीचा सडा शिंपलेला असायचा. अगदी ‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशिल दो कराने, ‘अशी स्थिती व्हायची आमची. इवल्याश्या मोहक फुलांचा गजरा मग लांब सडक वेणीवर रुळायचा. अलगद पावलं टाकली तरी नाजूक फुलं पायाखाली चिरडली जायची. नाजूक फुलांना आपण दुखावलं तर नाही ना?असं बालमनात यायचं. बिच्चारी फुलं ! रडता रडता हसून म्हणायची, “अगं चुकून तू आमच्यावर पाय दिलास, तरी मी तुझ्या पायांना सुगंधचं देईन हो !
देवळाच्या पायरीवर बसलेल्या आईला आम्ही विचारलं, ” आई इथे मोर आहेत म्हणून या देवळाला मोरबाग का नाही गं म्हणत? बेलबाग काय नाव दिलंय. ? आई बेलबागेचं गुपित सांगायची, ” हे भगवान श्री विष्णूंचं मंदिर आहे. इथे पूर्वी बेलाचं बन होतं. फडणवीसांचं आहे हे मंदिर. इथे शंकराची पिंड असून खंडोबाचे नवरात्र पेशवे काळातही साजरं व्हायचं. तुळशीबागेत पूर्वी खूप तुळशी म्हणून ती तुळशीबाग. हल्लीचं एरंडवणा पार्क आहे ना ! तिथे खूप म्हणजे खूपच एरंडाची झाड होती अगदी सूर्यकिरणांनाही जमिनीवर प्रवेश नव्हता. एरंडबन म्हणून त्याचं नाव.. अपभ्रंश होऊन पडलं एरंडवणा पार्क. रस्त्याने येतानाही नावांची गंमत सांगून आई आम्हाला हसवायची. प्रवचन कीर्तन असेल तर ते ऐकायला ति. नानांबरोबर
(माझे वडील आम्ही पंत सचिव पिछाडीने रामेश्वर चौकातून, बाहुलीच्या हौदा कडून, भाऊ महाराज बोळ ओलांडून, गणपती चौकातून नू. म. वि. हायस्कूलवरून श्री जोगेश्वरीकडे यायचो. ऐकून दमलात ना पण चालताना आम्ही काही दमत नव्हतो बरं का !
गुरुवारी प्रसादासाठी हमखास, घोडक्यांची सातारी कंदी पेढ्याची पुडी घेतली जायची. तिथल्याच ‘काका कुवा’ मेन्शन ह्या विचित्र नावांनी आम्ही बुचकळ्यात पडायचो. वाटेत गणपती चौकाकडून घरी येताना शितळादेवीचा छोटासा पार लागायचा. कधीकधी बाळाला देवीपुढे ठेवून एखादी बाळंतीण बारावीची पूजा करताना दिसायची. तेला तुपानी मॉलिश केलेल्या न्हाऊनमाखून सतेज झालेल्या बाळंतपणाला माहेरी आलेल्या माझ्या बहिणी, बाळांना, माझ्या भाच्यांना देवीच्या ओटीत घालून बाराविची पूजा करायच्या, तेव्हां त्या अगदी तुकतुकीत छान दिसायच्या. नवलाईची गोष्ट म्हणजे घरी मऊशार गुबगुबीत गादीवर दुपट्यात गुंडाळलेली, पाळण्यात घातल्यावर किंचाळून किंचाळून रडणारी आमची भाचरं सितळा देवीच्या पायाशी, नुसत्या पातळ दुपट्यावर इतकी शांत कशी काय झोपतात? नवलच होतं बाई! कदाचित सितळा आईचा आशीर्वादाचा हात त्यांच्या अंगावरून फिरत असावा. गोवर कांजीण्यांची साथ आली की नंतर उतारा म्हणून दहिभाताच्या सितळा देवी पुढे मुदी वर मुदी पडायचा. तिथली व्यवस्था बघणाऱ्या आजी अगदी गोल गरगरीत होत्या. इतक्या की त्यांना उठता बसता मुश्किल व्हायचं, एकीनी आगाऊपणा करून त्यांना विचारलं होतं “आजी हा सगळा दहीभात तुम्ही खाता का? आयांनी हाताला काढलेला चिमटा आणि वटारलेले डोळे पाहून आम्ही तिथून पळ काढायचो ‘आगाऊ ते बालपण ‘ दुसरं काय !
पाराच्या शेजारी वि. वि. बोकील हे प्रसिद्ध लेखक राह्यचे. त्यांच्याकडे बघतांना आमच्या डोळ्यात कमालीचा आदर आणि कुतूहल असायचं. त्यांच्या मुलीला चंचलाला आम्ही पुन्हा पुन्हा नवलाईने विचारत होतो “, ए तुझे बाबा ग्रेट आहेत गं, एवढं सगळं कधी लिहितात ? दिवसा की रात्री? शाई पेननी, की बोरुनी? ( बांबू पासून टोकदार केलेल लाकडी पेनच म्हणावं लागेल त्याला) एवढं सगळं कसं बाई सुचतं तुझ्या बाबांना? साधा पेपर लिहिताना मानपाठ एक होते आमची. शेवटी शेवटी तर कोंबडीचे पाय बदकाला आणि बदकाचे पाय कोंबडीला असे अक्षर वाचताना सर चरफडत गोल गोल भोपळा देतात. ” कारण पेपर लिहिताना अक्षरांचा कशाचा कशाला मेळच नसायचा, त्यामुळे सतत लिहिणारे वि. वि. बोकील आम्हाला जगातले एकमेव महान लेखक वाटायचे.
आमची भाचे कंपनी मोठी होत होती. विश्रामबागवाड्याजवळच्या सेवासदनच्या भिंतीवर( हल्लीच चितळे बंधू दुकान, )सध्या इथली मिठाई, करंजी, समोसे, वडा खाऊन गिऱ्हाईक गोलमटोल होतात, पण तेव्हां त्या भिंतीवर किती तरी दिवस डोंगरे बालामृतची गुटगुटीत बाळाची जाहिरात झळकली होती. ती जाहिरात बघून प्रत्येक आईला वाटायचं माझं बाळ अगदी अस्स अस्सच व्हायला हवं ग बाई, ‘.. मग काय मोहिमेवर निघाल्यासारखी डोंगरे बालामृतची बघता बघता भरपूर खरेदी व्हायची. सगळी बाळं गोंडस, गोपाळकृष्ण दिसायची. आणि मग काय ! सगळं पुणचं बाळसेदार व्हायचं.
बरं का मंडळी म्हणूनच त्यावेळची पिढी अजूनही भक्कम आहे. आणि हो हेच आहे त्या पिढीच्या आरोग्याचे गमक. जोडीला गाईच्या दुधातून पाजलेली जायफळ मायफळ मुरडशिंग हळकुंड इत्यादी नैसर्गिक संपत्तीची अगदी मोजून वेढे दिलेली बाळगुटी असायचीच. मग ते गोजिरवाणं गोंडस पुणं आणखीनच बाळसेदार दिसायचं.
– क्रमशः भाग १२.
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈