सौ. प्रतिभा कुळकर्णी
स्वपरिचय
सौ. प्रतिभा उल्हास कुळकर्णी.
शिक्षण- B.A.
संप्रत्ति – माझा स्वतःचा Milk Products चा व्यवसाय होता. आता बंद केला.
रुची – छंद… वाचन, लेखन, कुकिंग, पर्यटन इत्यादी ..
☆ “अनामिक हुरहुर…” — ☆ सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆
वर्षाचा शेवटचा आठवडा हा एक अनामिक हुरहुर घेऊन येतो. गतवर्षीच्या आठवणी आणि येणाऱ्या वर्षाची उत्सुकता…. खरंतर ही हुरहुर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरच असते, नाही का ?
तिचे तारुण्यात पदार्पण.. एक गोड हुरहूर…
नवविवाहिता ते मातृत्व… तिच्या आयुष्याची परिपूर्णता…. अत्यंत आनंदातही एक अनामिक हुरहुर….
आता तिचं तान्हुलं बालवाडीत जातं आणि तिला झालेला आनंद एकीकडे आणि आपलं बोट सोडून गेलेलं बाळ पहाताना हृदयात झालेली कालवाकालव एकीकडे… एक अनामिक हुरहूर!
तेच बाळ मोठं होतं…. त्याला पंख फुटतात आणि आकाशाला गवसणी घालण्यासाठी विश्वविद्यालयीन जगतात भरारी घेतं, त्यावेळेस तिचा आनंद काय वर्णावा!…. तरीही एक अनामिक हुरहूर असतेच.
आता तर तिचे पिल्लू स्वतःच्या पायावर उभे राहिले आहे… एवढेच नव्हे तर त्याने स्वतःबरोबर तिचेही नाव उज्ज्वल केले आहे… आणि आता आयुष्याच्या अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. मग ती लेक असेल तर परक्याचेच धन…. ह्यापुढे तिचे नावासकट सारे आयुष्यच बदलणार आणि मुलगा असला तरीही त्याची सहचारिणी म्हणून एक नवीन व्यक्तीच आयुष्यात येणार आणि तिच्या घरट्यालाच नवं रूप येणार…. हीही एक अनामिक हुरहुर !
आयुष्याची सांजवेळ आणि तिच्या दुधावरच्या सायीचे आगमन…. आनंद आणि धास्तावलेलं मन……
पण ती आता तृप्त आहे… शांत आहे.
आयुष्याच्या साथीदाराचा हात हातात घेऊन निवांतपणे तिच्या गोकुळात रमली आहे.
मला वाटतं, आयुष्यातील ह्या अनामिक हुरहुरीवर तिने सकारात्मक वृत्तीने आणि स्वकर्तृत्वाने विजय मिळविला आहे.
असेच गतवर्षीच्या सार्या कटू आठवणींना मागे ठेवून नववर्षाला सामोरे जाऊया… एका गोड हुरहरी सह….
माझ्या सगळ्या मित्र -मैत्रिणींना नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
© सौ. प्रतिभा कुळकर्णी
संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈