मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वादळ – (तौक्ते) च्या निमित्ताने ☆ सुश्री मंजिरी दातार

? मनमंजुषेतून ?

☆ वादळ – (तौक्ते) च्या निमित्ताने ☆ सुश्री मंजिरी दातार☆ 

मी लग्न होऊन ओरीसात गेले, ओरीसा म्हणजे बरंचसं आपल्या कोकणासारखं वाटलं….सुंदर निसर्ग….आणि आमच्या गावात तर समुद्र. कॉलनीच्या मागे ‘महानदी’ होती. मी इतकी हरखून गेले होते, कॉलनी पाहून…एकूणच तो नविन प्रदेश पाहून….पण आता जितके फायदे तितकेच तोटे पण असणारच.

ओरीसा म्हणजे दरवर्षी cyclone ठरलेलं….छोटं, मोठं….पण वर्षातून एकदा दोनदा तरी वॉर्निंग यायचीच….मग cyclone नाही आलं तर मोकळा श्वास सोडायचा….आलं तर परत पुढचं येईस्तोवर राज्य पडत झडत उभं राहायचं.

माझं लग्न झालं त्याआधी १९९९ ला ओरीसानी super cyclone बघितलं होतं…..त्यामुळे प्रचंड दहशत होती लोकांच्या मनात….नंतर २००२ मधे cyclone ची वॉर्निंग आली. माझ्या साठी हा पहिलाच अनुभव होता…..प्रदिप नी, माझ्या मिस्टरांनी मात्र १९९९ चं cyclone बघितलं होतं.

मला प्रदिप नी सांगितलं, तू जरा सामान भरुन ठेवशिल का? कारण cyclone येईल मग पंचाईत होईल…..म्हटलं चालेल. तर म्हणाले….क्षिप्रा भाभी बरोबर जा दुकानात…तर म्हटलं का…मी जाईन….तर म्हणाले नको तिला बरोबर ने….म्हटलं ठिक.

क्षिप्रा अगदी माझ्या बाजुच्या फ्लॅट मधे रहायची,बंगाली होती….मी आल्यापासून सगळ्यात खूप मदत केली तिने….( ती बंगाली असल्यामुळे आम्ही हिंदीत बोलायचो….पण आता मी सगळं मराठीत लिहितेय) प्रदिप गेल्यावर मी तिला विचारलं की जाऊया का….तर म्हणाली हो चालेल, तासाभरानी जाऊया…..पण एक काम कर, दोन्ही वेळचा स्वैपाक आटपून घे मग जाऊया. मग आम्ही दोघी गेलो दुकानात….मी दुकानदाराला म्हटलं, ही लिस्ट….भाभी म्हणाली मला दाखव लिस्ट….त्यात तांदुळ, डाळ, आटा, तेल असं काय काय होतं….तिनी माझ्या कडे बघितलं म्हणाली ही लिस्ट परत पर्स मधे टाक….मला कळेना असं का म्हणतेय ती.

मग दुकानदाराला तिनी माझ्यासाठी सामान सांगितलं, १५ अंडी, २ ब्रेड चे मोठे पुडे, १०/१२ चिप्सची पाकीटं, २/४ हल्दीराम सारखे काही चिवडा, मिक्चर वगैरे, जॅम, ८/१० बिस्किटाचे पुडे….आणि तो डिप डिप वाला चहा….पहिल्यांदा घेतला मी आयुष्यात….आणि ४ लिटर दुध. मी तिला म्हटलं माझा दुधवाला येवून गेलाय, तर म्हणाली पुढचे २/४ दिवस कदाचित नाही येणार.

मग तिनी पण असंच सामान तिच्यासाठी घेतलं….आणि आम्ही निघालो, परत येतांना मी तिला म्हटलं हे सगळं मला महिनाभर पुरेल….तर म्हणाली ते तेव्हा,जेव्हा तुम्ही बाकी काही जेवता तेव्हा….एकदा वारं सुरु झालं ना की गॅस पेटणार नाहीये….हे जे घेतलंय हेच लंच, डिनर, ब्रेकफास्ट असणार आहे. आता घरी जाऊन, दुध तापवून,  अंडी उकडून फ्रिज मधे ठेव….आपल्याला जी electric शेगडी दिली आहे ना घरात ती अश्या वेळी वापरायची….अर्थात जोपर्यंत वीज आहे तोपर्यत…..आम्ही तिथे रोजचं पाणी उकळून प्यायचो…..तेव्हा तिनी पाणी पण ८/१० लिटर उकळून ठेवायला सांगितलं….कारण वीज गेली, की नंतर पाणी पण जाणार.

ती मला म्हणाली स्वैपाक झालाय ना आजचा….आता घरी जाऊन तुला ही सगळी तयारी करायची आहे…..वापरायचं पाणी भरुन ठेव.

मला खूप टेंशन आलं होतं…मी म्हटलं इतकं काही होईल? तर म्हणाली नाही झालं तर बेस्ट पण तयारी हवी…..आम्ही बिल्डिंग शी आलो तर बरेच लोक तळमजल्यावरच्या फ्लॅट्स मधे दिसत होते….मी म्हटलं हे काय झालंय….तर म्हणाली चल दाखवते….मग खाली एक मैत्रिण रहायची तिच्या घरात गेलो…..तर टिव्ही बांधून ठेवला होता….दोरीनी….आत मधे फ्रिज साठी एक तात्पुरता लाकडाचा उंच पाट करुन त्यावर चढवला होता…..त्याला बांधण्याचं काम सुरु होतं…..कंपनीची लोकं येवून हे करुन देत होते…..कारण वारं सुटलं…वादळ आलं की ‘महानदी’ कॉलनीत येणार….आणि जे हवं ते बरोबर घेवून जाणार….म्हणून शक्य तितकी काळजी घेणं सुरु होतं.

आम्ही दोघी दुसऱ्या मजल्यावर रहायचो….पाण्याची भिती आम्हाला नव्हती….आम्हाला वाऱ्याची भिती होती.

मग क्षिप्रा नी सांगितलं…..आता खाण्यापिण्याचं झालं की घर जे सजवलं आहेस ते काढून बॅग भरुन ठेवून द्यायची…..कपडे सगळे आवरुन ठेव….जितकं कमी सामान बाहेर राहील तितकं चांगलं…..त्याप्रमाणे मी सगळं घर आवरलं.

संध्याकाळ पर्यंत वातावरण कुंद झालं होतं….वारं पण फार नव्हतं…..पण नेहमीपेक्षा जास्त होतं. रात्री प्रदिप ला सगळं सांगितलं सकाळी काय झालं….तो म्हणाला म्हणूनच म्हटलं होतं की भाभी बरोबर जा.

दुसरा दिवस उजाडला, ते एकदम विचित्र वातावरण घेऊनच….वारं पूर्ण पडलं होतं, पाऊस अगदी बारीक होता…..मला वाटलं झालं वाटतं सगळं शांत….प्रदिप तयारी करत होता ऑफिसची….मी म्हटलं सगळं शांत झालं ना….तर फक्त हम्म म्हणाला….पण निघतांना म्हणाला, be brave…काही वाटलं तर क्षिप्रा भाभीला फोन कर….अर्थात फोन सुरु असले तर (हे पण जोडलं त्यानी पुढे) मला फोन केलास तर चालेल पण मी येवू शकेन की नाही सांगता येत नाही, भाभी च मदत करेल.

प्रदिप गेल्यावर भाभी आलीच बघायला,सगळं नीट आहे ना….मी म्हटलं ये चहा पिऊ तर म्हणाली मी घर बघू का तुझं सगळं….म्हटलं बघ की.

तिला मी म्हटलं शांत झालंय ना सगळं….गेलं का वादळ? तर म्हणाली तू वादळापुर्वीची शांतता असा शब्द ऐकला आहेस? हे ते आहे….संध्याकाळी वारं सुरु होईल.

मग मी चहा करेस्तोवर तिनी घर बघितलं….एक दोन वस्तू तिला हव्या तश्या हलवल्या. मग मला तिनी बेडरुम मधे बोलावलं….आमच्या बेडरुम मधे भितींत एका खाली एक असे मोठे कोनाडे केलेले होते…..उघडेच होते, दारं नव्हती त्याला….ते इतके मोठे होते की सगळ्यात खालच्या खणात मी सुटकेस ठेवायची….ती तिथेच उघडायची सुध्दा….तेव्हा तिथे सगळी पेपर ची रद्दी होती माझी ठेवलेली…..भाभी म्हणाली ती काढून घे आणि वर ठेव….म्हटलं ओके….पुढे म्हणाली वारं वाढलं दार, खिडक्या तुटायला लागल्या तर या खणात येवून लपून बसायचं….ही जागा सगळ्यात सेफ आहे. माझ्या अंगावर सरसरुन काटा आला.

संध्याकाळी खरंच सोसाट्याचं वारं सुरु झालं, खिडकी दारं वाजायला लागले…..पाऊस सुरु झाला….निसर्गाचं रौद्र रुप त्या रात्री अनुभवलं….प्रदिप ऑफिस मधेच होता….भाभी शी मी फोनवरच बोलत होते….मग लाईट गेलीच….महानदी आलीच कॉलनीत…..मग खालच्या मजल्यावरचे लोकं वरती आमच्याकडे आले……तेवढंच दुःखात सुख की मी आता घरात एकटी नव्हते…१/२ दोघी मैत्रिणी होत्या. कारण बहूतेक सगळे पुरुष प्लांट मधेच होते…..पूर्ण रात्र जागून काढली….प्रयत्न करुनही झोप लागणं शक्यच नव्हतं…..१९९९ च्या वादळानंतर जास्त पक्की दारं, खिडक्या बसवल्या होत्या त्यामुळे दारं तुटली नाहीत….खिडक्यांच्या काचा मात्र फुटल्या….त्यातून प्रचंड पाऊस आत येत होता….पण आमचा हॉल सेफ होता….सगळ्या खोल्यांची दारं बंद करुन आम्ही रात्र हॉल मधे काढली……मध्यरात्री landfall झाला…..आणि दुसरा दिवस उजाडला…..पुढे अजून एक दोन दिवस वारं, पाऊस होताच. नंतर झालेली हानी बघवत नव्हती….तळमजल्यावर सुध्दा लोकांच्या घरात गेलेलं पाणी काढणं, सामान आवरणं कठिण झालं होतं.

निसर्गापुढे आपण किती थिटे पडतो याचा अनुभव त्यावर्षी घेतला. मग पुढच्या ३ वर्षात असे बरेच छोटे मोठे cyclone ओरीसात अनुभवले पण हा पहिला अनुभव मात्र काळजावर कोरल्या गेलाय.

© सुश्री मंजिरी दातार

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈