सुश्री तृप्ती कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ गाणं आपलं आपल्यासाठी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
एखादं गाणं आपल्या आयुष्यात कुठल्या वेळी आपल्या कानावर पडतं त्यावर त्या गाण्याची आणि आपली नाळ किती जुळणार हे अवलंबून असतं असं मला वाटतं. आपल्या मनात त्यावेळी लागलेला एखादा विशिष्ट सूर आणि त्या गाण्याचा सूर जर जुळला तर ते गाणं आपल्या जिव्हाळ्याचं होतं. मग त्याचा राग, त्यातली सुरावट, ते कुणी गायलंय, कुठल्या वेळी गायलंय, त्यातले शब्द, त्याचा अर्थ, या सगळ्या पलीकडे जाऊन ते गाणं आपल्याला एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीने, बऱ्याच भेटीनंतर समोर दिसताच आनंदाने बिलगावं तसं बिलगतं. आणि मग पुढे एखाद्या चित्रपटाच्या पार्श्वसंगितासारखं आयुष्यातल्या अनेक प्रसंगात ते गाणं आपल्या मनात त्याच्या विशिष्ट सुरावटीसह रुणझुणत राहतं. अनेक अर्थाने आपल्याला समृद्ध करत राहतं. अशावेळी त्या गाण्याचा मूळ भाव काय, त्याची रचना कशी आहे, कुठल्या प्रसंगात केली आहे, अशा कुठल्याच गोष्टींचा प्रभाव त्यावर पडत नाही. ते गाणं अगदी आपलं आपल्यासाठीच खास झालेलं असतं. आपण आपल्या मनातले, स्वप्नातले विशेष रंग, विशेष सूर त्या गाण्याला दिलेले असतात. आणि त्या भावनेतूनच आपण ते गाणं पुन्हा पुन्हा आपल्या मनात आळवत राहतो.
काही गाणी अशीच मनाला भिडलेली आहेत. त्या त्या वेळी कुठल्या प्रसंगात ती आपल्यासमोर आलेली आहेत ते सुदैवाने माझ्या लक्षात राहिलं आहे. त्यामुळे त्याला अनुसरून असलेला एखादा प्रसंग समोर आला की आपल्या प्ले लिस्टच्या लूपवर टाकल्यासारखी ती आपोआपच सुरू होतात.
पण त्यातलं एक गाणं फार खास आहे. कारण बऱ्याचदा ते मनात रुणझुणत असतं…..
‘भय इथले संपत नाही…’. कविवर्य ग्रेस यांचे अफाट शब्दरचना असलेलं शिवाय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी शब्दबद्ध केलेलं आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं अजरामर ठरेल यात शंकाच नाही. पण या गाण्याची गंमत म्हणजे देवकी पंडित, राहुल देशपांडे यांनी देखील हे गाणं गायलं आहे आणि त्या प्रत्येक वेळी ते तेवढेच प्रभावशाली ठरलं आहे. त्यामुळे ग्रेसांच्या आणि हृदयनाथांच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो.
हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं, तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. अकरावीतली गोष्ट आहे. स्केचिंग करून घरी परत येताना बरीच संध्याकाळ झाली होती. विठ्ठल मंदिराच्या समोरच्या एका छोट्याशा खाजगी रस्त्यावरून मी आमच्या घराकडे निघाले होते. त्या रस्त्यावर पुष्कळ फुलझाडी आहेत. कारण आजूबाजूला बंगले आणि काही जुन्या अपार्टमेंट आहेत. अगदी कातर म्हणावी अशी ती वेळ. झाडांची स्केचेस काढून आम्ही मैत्रिणी परत घरी निघालो होतो. रात्रीच्या रस्त्यावरच्या लाईटमध्ये झाडांच्या पडणाऱ्या सावल्या किती वेगळ्या दिसतात. या विषयावर मी आणि माझी मैत्रीण गप्पा मारत होतो. या निद्रिस्त सावल्या जास्त मोहक की मूळ झाडं? असा आमचा चर्चेचा विषय होता. गप्पा मारता मारता मधल्या एका टप्प्यावर माझी मैत्रीण दुसरीकडे वळली आणि मग मी एकटीच हळूहळू पावलं टाकत घराकडे निघाले. एकटेपणाने वेढलं तसं दिवसभराचा धावपळीचा थकवा चांगलाच जाणवायला लागला. अगदी थोडं अंतर चालणंसुद्धा नको झालं होतं. त्यात पाठीवर जड सॅक, हातामध्ये मोठं स्केचबुक घेऊन उद्याच्या सबमिशनचा विचार मनात चालू होता.
बाहेरचं वातावरण मात्र प्रसन्न होतं. थंडीचे दिवस होते. हवेत सुखद गारवा होता. रस्त्यावरच्या झाडांमुळे, फुलांचा खूप सुंदर असा मंद वास येत होता. रस्त्यावर बराच शुकशुकाट होता. तुरळक सायकलवरून जाणारे कुणी किंवा बंगल्याबाहेर उभे असणाऱ्या काही व्यक्ती असं सोडलं तर फारशी रहदारी नव्हती. तसाही तो रस्ता खाजगी आणि आतल्या बाजूला असल्यामुळे फारशी वर्दळ त्यावर नसायचीच. त्यामुळे माझा तो लाडका रस्ता होता. त्या रस्त्यावरच एका बंगल्याच्या खाली एक कारखाना होता. कारखाना म्हणजे एक मोठी पत्र्याची दणकट शेड होती आणि त्याला मोठ्या खिडक्या होत्या. आत मध्ये भरपूर लाईट लागलेले असायचे आणि तीन-चार लोकं काहीतरी काम करत असायचे. काय काम करायचे ते माहित नाही पण त्या जागेवर बऱ्याचदा फेविकॉलचा वास यायचा. कसला तरी कटिंगचा आवाज यायचा. तिथे उशिरापर्यंत साधारण नऊ-साडेनऊपर्यंत काम चालायचं. तर त्या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे कधीही, गडबड, गोंधळ ओरडा नसायचा. पण तिथे संध्याकाळ झाली की कायम रेडिओ विशेषतः आकाशवाणी चॅनल चालू असायचा. आणि त्या रेडिओवरची गाणी रस्त्यावर दूरपर्यंत ऐकू यायची.
त्यादिवशी असाच रेडिओ चालू होता आणि जशी जशी मी त्या कारखान्याच्या जवळ आले तसं माझ्या कानावर हे सूर पडले ‘ भय इथले संपत नाही…’ आणि का कोण जाणे सुरुवातीचे हे शब्द ऐकून मी थबकलेच. हळूहळू जसं ते गाणं पुढे जायला लागलं तशी मी त्याच्यात इतकी रंगून गेले की नकळत मी त्या कारखान्याच्या मागच्या बाजूला असलेल्या चाफ्याच्या झाडाखाली येऊन उभी कधी राहिले ते माझं मलाही कळलं नाही. अगदी शांतपणे कान देऊन जणू झाडांना, गाण्याला किंवा अगदी रस्त्यालासुद्धा माझ्या असण्याचा त्रास होणार नाही अशी काळजी घेत मी ते गाणं ऐकू लागले. वातावरणाची मोहिनी असेल, मनातली स्थिती असेल किंवा आणखीन काही असेल पण त्या गाण्यानं त्या दिवशी मला अगदी अलगदपणे कवेत घेतलं ते आजतागायत. ‘ झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवायचे ‘ हे शब्द माझ्या कानावर पडायला आणि बरोबर त्याचवेळी मी उभ्या असलेल्या झाडावरून चाफ्याचं एक फुल गळून माझ्या पायापाशी पडायला एकच गाठ पडली. त्यासरशी एका विशिष्ट तंद्रीत मी पटकन वर बघितलं. सहज आकाशाकडे लक्ष गेलं. स्वच्छ चांदणं होतं. फुल पडण्याचा योगायोग काहीतरी वेगळाच होता. काय झालं ते कळलं नाही. झाडावरून फुलानं सहजपणे ओघळून पडावं तसं त्या गाण्यानं माझं मी पण बाजूला सारून मला आपल्या कवेत घेतलं. आजही अगदी हे लिहीत असतानासुद्धा मला ती भारावलेली अवस्था आठवते.
नक्की कशाचं भारावलेपण होतं ते माहित नाही. इतकं जाणवलं की हे सूर आपले आहेत. आपल्यासाठी आहेत. आपल्याला आता कायम सोबत करणार आहेत. आणि ते गाणं माझं झालं. त्यानंतर येणाऱ्या अनेक सुखदुःखाच्या प्रसंगात विशेषतः जेव्हा जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा तेव्हा हे गाणं मला आठवतं. पण वेदना घेऊन नाही तर कसली तरी अनामिक ऊर्जा आणि चैतन्य घेऊन ते गाणं येतं. मला हे गाणं नेहमीच सर्जनशीलतेला उद्देशून म्हटलं आहे असं वाटतं. कदाचित त्यावेळी माझ्या डोक्यात सबमिशनचे विचार असतील ते पूर्ण करण्याचा ताण असेल त्यावर या गाण्यानं थोडं आश्वस्त झाल्यासारखं वाटल्याने असेल. पण मला ते गाणं .. निर्मिकाला निर्मितीचं भय हे कायम व्यापूनच असतं पण तरीही त्या भयाला सहजतेने सामोरं जावं, सश्रद्ध शरण व्हावं मग निर्मिती तुम्हाला पुन्हा संधी देते .. असं सांगणार वाटतं.
…… निर्मिक आणि निर्मिती यांच्यामधल्या निरंतर चालणाऱ्या खेळात निर्मिकाला लाभणारा उ:शाप वाटतं.
☆
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈