श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ जनजागृतीच्या मार्गावर – भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆
वयाच्या साठाव्या वर्षानंतर म्हणजेच ज्येष्ठ नागरिक (सीनियर सिटीजन झाल्यानंतर) समाजकार्याच्या तळमळीमुळे मी अवयव दानाचे क्षेत्र हे स्वतःचे कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
अवयवदानाच्या क्षेत्रात कार्य करायचे ठरवल्यानंतर मी माझ्यापरीने अभ्यास करून व्याख्याने व स्थानिक कार्यक्रम यामधून लोकांपुढे जाऊन हा नवीन विषय त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु नंतर लक्षात आले की या बाबतीत जनजागृती करायची असेल तर स्थानिक स्तरावरील तोटके प्रयत्न उपयोगाचे नाहीत. या विषयाला मोठ्या जनजागृतीची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे पदयात्रा या संकल्पनेचा उगम माझ्या मनात झाला. त्यादृष्टीने मी प्रयत्न सुरू केले. फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या संस्थेत सहभागी होऊन या आमच्या संस्थेमार्फत आजपर्यंत एकूण चार पदयात्रा यशस्वी रीत्या पूर्ण केल्या. माझ्या वयाच्या ६६व्या वर्षापासून ७० वर्षापर्यंत या चार पदयात्रां मधून जवळपास ४००० किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन, एकूण पन्नास हजार पेक्षा अधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवू शकलो. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हे पायाखालून घातले. या सर्वांचा अनुभव मिश्र स्वरूपाचा असला तरी एकूण अनुभव उत्साहजनक होता हे नक्की. त्यामुळे माझ्या मनाप्रमाणे काही करू शकलो याचं समाधान आहेच. पण आता सत्तरी पार केली आहे. हळू हळू डोळे आणि कान सहकार्य करण्यासाठी कुरकुरत आहेत. प्रकृती चांगली असली तरी पदयात्रेचा मार्ग कितपत चालू ठेवता येईल याबाबत साशंक आहे. तरीही कार्य चालूच राहील. राहणार आहे आणि राहिले पाहिजे. पण हे प्रयत्न खूपच तोटके आहेत आणि अत्यंत तुटपुंजे आहेत याची नम्र जाणीव मला या पदयात्रांनी नक्कीच करून दिली आहे.
अवयवदान प्रबोधनाच्या कार्यासाठी अनेक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण होऊन ते मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजेत. आता याचसाठी कार्य करायचे आहे. त्यासाठी या विषयाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या विषयाचे प्रबोधक व कार्यकर्ते निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध स्थानिक स्तरावरील संस्थांमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून या क्षेत्रातील कार्यकर्त्यांची संख्या आणि ज्ञान याची वृद्धी करणे आवश्यक आहे. आम्ही फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या संस्थेतर्फे व केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील रोटो-सोटो च्या सहकार्याने विविध प्रशिक्षण कार्यक्रम व या विषयावरील प्रबोधनपर साहित्य प्रकाशित करणे असे उपक्रम आयोजित करीत आहोत. त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण कार्यक्रमांचे प्रारूप तयार केले गेले आहे.
आता याच कार्यावर भर देण्याचे निश्चित केले आहे. वास्तविक पाहता कोरोनाच्या प्रकोपामुळे व परिस्थितीमुळे एक धडा सर्वांनी शिकणे आवश्यक आहे.
इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये सरकार, सर्व सरकारी यंत्रणा, सर्व मोठे उद्योग व्यवसाय, सर्व स्वयंसेवी संस्था, सर्व प्रसार माध्यमे आणि सर्व सोशल मीडिया या सर्वांमार्फत कोरोना, कोरोना आणि फक्त कोरोना, हाच विषय आणि त्याबाबतची माहिती आणि जागृती याचे सतत प्रयत्न सतत दोन वर्षे चालू आहेत. त्याच्या कायदेशीर अंमलबजावणीसाठी सर्व कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा तसेच आरोग्य यंत्रणा कार्यरत होत्या आणि तेही 24 तास. पण एवढे असूनही असे दिसून येते की लोकांमध्ये जागृती समाधानकारक होत नाही.
आपण बातम्यांमध्ये रोज पाहतच होतो की एवढी प्रचंड जागृती मोहीम चालू असून सुद्धा स्वतःला सुशिक्षित (?) म्हणवणारे परंतु खरे सुशिक्षण नसलेले फक्त विद्याविभूषित असे पांढरपेशे व मध्यमवर्गीय हे सुद्धा या सर्व जागृती मोहिमेपासून फारसा चांगला धडा शिकताना दिसत नव्हते. मग अशिक्षित व हातावरचे पोट असणारे यांची काय स्थिती असेल ही कल्पनाच करावी. त्याचप्रमाणे सांपत्तिक उच्च स्थितीमध्ये असणारे किंवा राजकारणी आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष अशांसारख्या काही व्यक्तीसुद्धा स्वतःच्या संबंधित अथवा वैयक्तिक समारंभाचे आयोजन व नियोजन करताना आणि त्यात सहभाग घेताना दिसत. अशा वेळेला सरकारी यंत्रणांचीही पंचाईत होते. त्यांना यावर काय कारवाई करावी हेच समजेनासे होते. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी त्यांची बिकट अवस्था होऊन जाते. यावरून समाजाला जागृत करणे हे किती प्रचंड अवघड आहे हे लक्षात येते. पदयात्रेच्या निमित्ताने बऱ्याच वेळा हे लक्षात आले आहे की महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांच्यामध्ये सुद्धा बर्यापैकी जागृती होऊ शकेल असे दिसते आहे. त्यामुळे एकंदरीत अवयवदानाच्या विषयासंबंधी जनजागृति व्हावयाची असेल तर किमान दोन-तीन पिढ्यांमध्ये तरी सातत्याने हे कार्य चालू असले पाहिजे. जेव्हा तरुण या कार्यात कार्यरत असताना, सामील होताना दिसतात तेव्हा पुढील पिढीत काहीतरी आशादायी घडेल अशा समजुतीला बळ मिळते. म्हणूनच तरुण आणि विद्यार्थी वर्ग यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणे उपयोगी ठरेल. त्या स्पर्धांमध्ये भाग घेणारे तरी निश्चित या विषयाचा अभ्यास करतातच. बऱ्याच वेळेला मी असे पाहिले आहे की शालेय विद्यार्थी जेंव्हा स्पर्धेमध्ये भाग घेत असतात तेव्हा त्या विषयाच्या अभ्यासामध्ये त्यांचे आई वडील सुद्धा सामील झालेले असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांमधून संपूर्ण कुटुंब या विषयाच्या अभ्यासाकडे वळवता येईल.
तरुणांना या विषयाच्या अभ्यासाकडे वळवण्यासाठी या विषयासंबंधीच्या स्पर्धा काही संस्थांनी आयोजित केल्या होत्या. त्या मधूनही आजचे तरुण या स्पर्धेच्या निमित्ताने या विषयाचा अभ्यास करून त्याचे चांगल्या प्रकारे सादरीकरण करू शकतात हे लक्षात येते.
आजकालच्या तरुणांना या विषयाचे योग्य प्रकारे प्रशिक्षण देऊन चांगल्या प्रकारे समाजामध्ये या विषयाचे प्रबोधन करता येऊ शकेल याबाबत शंका नाही. त्यामुळे प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुण कार्यकर्ते तयार करणे हे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे. या गरजेपोटी फेडरेशनचे पुढचे पाऊल हे प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या जागृतीचे असल्यास अवयवदानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागृती घडवून आणता येईल असा विश्र्वास वाटतो.
जनजागृती ज्या समाजपरिवर्तनासाठी करावयाची आहे त्याची दिशा काय असली पाहिजे हे प्रथम ठरवायचे आहे. तरुणांच्या डोळ्यात असलेली भविष्याची स्वप्ने जाणून घ्यायची आहेत. ती स्वप्नं साकार करण्यासाठी त्यांच्या हातांना श्रममूल्यांची जाणीव करून देऊन त्याची जपणूक केली पाहिजे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या त्यांच्या मनात कार्याचं पाखरू हळू हळू फडफडवलं पाहिजे. आकाशी भरारी मारणाऱ्या त्यांच्या मनाबरोबर त्यांच्या पायांना जमिनीशी असलेलं नातं घट्ट करायला शिकवलं पाहिजे.
जमिनीवर रोवून पाय
आभाळ धरता आलं पाहिजे
उंच होता आलं पाहिजे
आभाळ खाली आणलं पाहिजे
मनात जिद्द धरली पाहिजे
कोणत्याही कार्यासाठी ही जिद्द निर्माण व्हायला हवी. त्या जिद्दीसाठी प्रयत्नशील राहण्याची जाणीव निर्माण केली पाहिजे. या जाणिवेतूनच समाजासाठी कार्य करणारी मने तयार होतील. त्यांचे कडूनच परिवर्तनाला दिशा मिळेल. परिवर्तनाची ही दिशा देण्यासाठी मग इतर समाज घटकांनीही आपापले योगदान देणे आवश्यक आहे.
— क्रमशः भाग पहिला
© श्री सुनील देशपांडे
उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.
फोन :९६५७७०९६४०
ई मेल. : – organdonationfed@gmail. com; [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर