? मनमंजुषेतून ?

☆ जागतिक अंध दिवस निमित्त – डोळस…. ☆ श्री सुनीत गोधपुरे ☆

तो अंध तरुण रोज काॕर्पोरेशनच्या त्या बसस्टाॕपवर उभा असतो.

मी ज्या वारजेमाळवाडी  बसमधे चढतो, तोही त्याच बसमधे चढतो. मी वारजे जुन्या जकात नाक्याला माझ्या आॕफीसशी उतरतो अन तो अजून तसाच पुढे माळवाडीला जातो. त्याच्या पाठीवर जी सॕक सदृश्य बॕग असते त्यावर फिक्कट पुसट अक्षरे दिसतात ‘जीवन प्रकाश अंध शाळा, माळवाडी’. गर्दीमुळे ब-याच वेळेला बसायला जागा मिळत नाही तेंव्हा काही सुजाण लोक त्याला बसायला जागा देतात, तेंव्हा तो विनम्रपणे नकार देतो. कोथरुड स्टँडच्या आसपास गाडी ब-यापैकी रिकामी होते तेंव्हा आम्हाला बसायला जागा मिळते. माझा स्टाॕप त्यानंतर  लगेच असल्याने मी पुढे जाउन बसतो व उतरुन जातो. बसबरोबर त्या तरुणाची आठवण दुस-या दिवसापर्यंत पुढे निघून जाते.

त्या दिवशी योगायोगाने आम्ही नळस्टाॕपला एका सिटवर बसतो. ब-याच  दिवसांचे कुतुहल असल्याने मी त्याला विचारतो..

‘तुम्ही रोज बस ला दिसता..पुढे माळवाडीला जाता..स्टुडंट आहात का?’

अचानक मी विचारलेल्या प्रश्नाने तो आधी चमकतो. मग उत्तर देतो.

‘सर, मी विद्यार्थी नाही मी शिकवतो..’

‘ओ अच्छा..ब्रेल वाचायला वगैरे शिकवता का मुलांना?’ मी विचारतो.

तो हसतो..मग उत्तरतो ’नाही सर. मी ज्या मुलांना शिकवतो ती ब्रेल मधले मास्टर आहेत. मी त्यांना कम्प्यूटर ब्रेल कोड शिकवतो..आम्ही अंध व्यक्तींना उपयुक्त ब्रेल साॕफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी कोड्स तिथल्या मुलांना शिकवतो. ही मुले पुढे ब्रेल प्रोग्रामर होतील ’

माझ्यासाठी हे नवीनच होतं..मी उत्सुकतेने त्याला विचारतो.. ‘अरे वा म्हणजे दिवसभर तुम्ही तिकडेच शिकवायला असता?’

पुन्हा मला खोडून काढत तो म्हणतो

‘नाही मी दुपारी परत येतो..डेक्कनला आमच्या कंपनीत..तिथे आम्ही काही स्पेशल प्रोजेक्टस वर काम करतो’

मी चिकाटीने पुन्हा त्याला विचारतो ‘म्हणजे ब्रेल प्रोग्रामिंग वगैरे?’

पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत  तो म्हणातो ‘आम्ही जे करतो त्याला एथिकल हॕकींग म्हणतात..तुम्ही त्याबद्दल ऐकले असेल’

आता थक्क होण्याची वेळ माझ्यावर वर आली असते.

‘माय गाॕड..पण एथिकल हॕकिंग साठी लागणारे सिस्टीम्स..सर्व सुविधा…?’

‘आमच्याकडे आहेत..’  तो पटकन म्हणतो, ‘आता विषय निघालाय म्हणून सांगतो. आपल्या देशात ज्या  सरकारी वेबसाईट्स आहेत त्यांचे सतत हॕकिंग होत राहते..ते काम  देशविरोधी गृप्स करत राहतात. आम्ही अशा हॕकर्स ना कसा प्रतिबंध करता येइल यासाठी नॕशनल इन्फाॕर्मटीक्स सेंटर म्हणजे NIC बरोबर मिळून काम करतो.  आम्ही चार अंध मित्र आहोत..आम्ही या लोकांना लोकेट करतो..आम्ही हे काम NIC बरोबर मिळून करतो कारण NIC या सर्व सरकारी वेबसाईट्स होस्ट करते व त्यांच्या सुरक्षेची काळजी घेते. या सर्व अज्ञात शक्तींना प्रातिबंध करण्यासाठी आम्हाला आम्हा अंध लोकांमधे जन्मजात असलेले Intuition कामाला येते..’ तो हसत म्हणतो.

तो तरुण जे सांगत असतो त्याने मी अवाकच होतो. हा तरुणसवदा मुलगा जे एवढ्या सहजताने सांगत आहे ते करणे सोपे नसते. मी स्वतः माझी छोटीशी आय टी कंपनी चालवत असल्याने हे सारे किती अवघड आहे हे मला ठाउक असते. तरीही न राहवून मी त्याला शेवटचं विचारतो,

‘फक्त या कामावर तुम्ही व तुमची कंपनी चालते..?’

‘नाही सर..!’ तो उत्तरतो ‘ आम्ही ब्रेल कम्प्युटींग व एथिकल हॕकींग साठी काही अल्गोरिधम वर ही बरंच काम करतोय की जेणे करुन हे काम आमच्या इतर अंध बांधवापर्यंत आम्हाला पोचवता येइल.आमचं काम प्रत्यक्ष NIC चे हेड आॕफीस हँडल करतं..काम खूप सिक्रेटीव्ह असल्याने यापेक्षा जास्त सांगता येत नाही.’

तो हसतो व म्हणतो ‘बाय द वे तुमचा स्टाॕप आलाय..’

मी पाहतो तर खरोखरच माझा स्टाॕप आलेला असतो.

‘अरेच्चा..’ मी विचारतो..’ तुम्हाला कसे कळाले माझा स्टाॕप आलाय?’

‘सर तुम्ही तिकीट घेतला तेंव्हा मी तुमचा स्टाॕप ऐकला..माझ्या डोक्यातही एक प्रोग्राम देवाने आपलोड केलाय..Travelled Distance Analysis चा..पण  त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन..गुड डे सर!’

तो मला हसत म्हणतो.

बसमधूनन उतरतो व स्तंभित होउन ती नाहीशी होइपर्यंत मी फक्त पहात राहतो. खरे सांगू? आपल्या आंधळ्या दुनियेत आज मला एक डोळस माणूस भेटलेला असतो.. त्याच्या प्रखर प्रकाशात मी अक्षरशः दिपून जातो.

 

© श्री सुनील गोबुरे

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments