सुश्री नीता कुलकर्णी
☆ “सुखांचे शाॅटस्…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
रोजच्यासारखी सकाळी शारदा कामाला आली. आल्या आल्या म्हणाली,
“वहिनी हे बघा पैंजण.. शंभर रुपयांना घेतले. काल दारावर एक माणूस आला होता विकायला”
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लोभसवाणा होता… आज एकदम खुषीत होती.
“अगं किती छान आहेत.. थांब शारदा फोटो काढते.. “
“नको नको”.. ती लाजून म्हणाली
“अग तुझा नाही.. पैंजणाचा काढते मग तर झालं…. “
फोटो काढला… फोटो काढताना ती हसत होती.
पैंजणावरून प्रेमानी हात फिरवून शारदा कामाला लागली…
तिच्या पैंजणांचा छुमछुम नाद तिच्याबरोबर मलाही सुखावत होता…
दिवसभर अनेक घरात कामं करूनही ती नेहमी आनंदात असते…
माझ्याही दिवसाची छान सुरुवात झाली…
देवाची पूजा करताना बाप्पाला गुलाब अर्पण केला… सरूची आठवण आली…
काळी सावळी तरतरीत सरू मी गेले की ” या काकू” म्हणते. मी नेहमी तिच्याकडूनच देवासाठी फुलं घेते. काल फुलं घेतली तर एक टपोरा गुलाब देऊन म्हणाली
” काकू हा घ्या तुमच्या देवाला “
.. मनात आलं किती गोड निरागस मन आहे पोरीचं…. देवाला हात जोडले त्याला मनोमन प्रार्थना केली..
“ पहाटे पासून दिवसभर कष्ट करणाऱ्या सरूला सुखी आणि आनंदी ठेव बाबा.. “
साहिलच्या म्हणजे नातवाच्या शाळेत फन फेअर होतं. तिथे त्यांचा पाणीपुरीचा स्टॉल होता. तो बघायला निघाले होते. रिक्षा बघत उभी होते…
काल साहिलने सांगितले होते.. “आजी आम्ही” चीझ रगडापुरी” करणार आहोत”
“अरे पण असं कसं? रगडापुरी वर चीझ?…. असं कुठे कोणी कधी केलं नसेल… कशी चव लागेल रे “
“नसेल केलं… पण आमचं तसंच ठरलं आहे… आणि पाणीपुरीवर नेहमीचं चिंचेचे पाणी नाही तर आम्ही त्यात थम्सअप, फॅन्टा, किंवा स्प्राईट घालणार आहोत… त्याला आम्ही “पाणीपुरी शॉटस् “असं नाव दिले आहे”
मी म्हटलं, “अरे हे कसलं कॉम्बिनेशन? कोणी तरी खाईल का?”
“अगं टीचर म्हणाल्या तुम्हाला करावसं वाटतंय ना करून बघा…. शिवाय आम्ही चिंचेचं पाणी पण घेऊन जाणार आहोत. लोकांना नाही आवडलं तर ते घालून नेहमीची पाणीपुरी करणार. “
काय झालं असेल… मी विचार करत होते तेवढ्यात..
“नीता. “.. अशी हाक आली
मैत्रीण दुकानात आईस्क्रीम घेत होती. बाईसाहेबांनी स्वेटर घातला होता आणि घेत होती आईस्क्रीम…
विचारलं तर म्हणाली.. “थंडीतच आईस्क्रीम खायला मजा येते.. ही घे तुला एक कॅंन्डी जाताना खा”
” अग आत्ता.. नको नको. नातवाच्या शाळेत चालले आहे “
तर डोळा मारून म्हणाली, ” घे ग.. वन फाॅर द रोड…. एन्जॉय इट.. कोणी…. तुझ्याकडे बघत नाही…. “
.. आयुष्यात प्रथमच रिक्षात बसून आईस कँन्डी खाताना मला गंमत वाटत होती….
फन फेअरला शाळेत पोचले तर तिथे खूपच मज्जा चालली होती…
नातवाच्या स्टॉलवर गर्दी उसळली होती. लोक धमाल करत होते. पाणीपुरी शॉटस् हिट झाली होती…
आई, बाबा, आजी, आजोबा, पोरं… सगळे हसत होते. ट्राय करून बघत होते…
साहिलचे मित्र मैत्रिणी चीझ रगडा पुरी, पाणीपुरी शाॅटस बनवत होते. ते पण लोक आवडीने खात होते…
“कसली भारी आयडिया आहे ना… वाॅव….. मला अजून एक दे रे… एक्सलंट.. ए तु पण ट्राय कर रे… ” वगैरे चाललं होतं…
इतकी गर्दी होती की नातवाला आमच्याकडे बघायलाही वेळ नव्हता. काही वेळाने हे आणि सुनबाईचे आई-वडील पण आले. आम्ही चौघेही गप्पा मारत बसलो.
.. खूप वेळानंतर साहिल सांगायला आला,
” बघ आजी तुला काळजी वाटत होती ना पण… सगळ्यांना खूप आवडलं… आमचं एकुणएक सगळं संपलं. “
“हो रे.. आम्ही तुला बघीतलं तुमची गडबड चालली होती “
” अग पण तुम्हाला शॉट्स नाही मिळाले.. आता उद्या घरी करू.. तेव्हा तू ट्राय कर… “
“चालेल रे…. ” त्याला सांगितले.
पोरं अगदी खुष होती.
मनात म्हणाले…. “ नाही रे राजा…. उलट आज मला सुखांचे शॉट्स मिळाले.. ते कसे घ्यायचे हे समजले
.. त्याची चव दुय्यम होती.. मुलांचा आनंद महत्त्वाचा होता “
खरंच अशा छोट्या छोट्या शॉट्सनीच जीवनाची मजा घ्यायला शिकू… सारखं मोठं काहीतरी होईल मग मी सुखी.. आनंदी होईन असं म्हणत बसलं की हे छोटे शॉटस् हातातून निसटून जातात… हे समाधानाचे असे क्षण मनात भरून घ्यायचे… आणि मुख्य म्हणजे नेमके समाधान कशात मानायचे हे आपले आपण ठरवायचे मग असे क्षण सापडतात…
खरं म्हणजे ते असतातच आसपास… बघायचे ठरवले तर दिसतात..
बघायचे…. हळूहळू येईल ती दृष्टी…. मग दिसतील…. आपले आपले सुखांचे असे शॉटस्
मग ठरलं तर…
अशा शॉट्सची मजा घेत जगायचं.. आनंदाने… हसत हसत..
…. मग पुढचे दिवस, महिने आणि वर्षही नक्कीच आनंदात जातील.
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈