सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ विचारायला काय जातं ?… – लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मागे बऱ्याच वर्षांपूर्वी टाटा स्कायच्या खूपच छान जाहिराती आल्या होत्या. काही जाहिराती खरच इतक्या नेमकेपणाने बनवलेल्या असतात की डायरेक्ट दिलातच घुसतात. त्यातल्या दोन माझ्या फारच आवडीच्या होत्या.

मिलिटरी परेड चाललेली असते, दोन मित्र इतरांप्रमाणेच ती परेड बघत असतात; त्यातल्या एकाला त्या परेड मधल्या मिलिटरी टँक मध्ये बसायची हुक्की येते, तो दुसऱ्याला मस्का मारत असतो विचार ना विचार ना…….. त्याचा मित्र त्याला हुर्रss करत उडवून लावतो.

आता त्या टँक मध्ये बसणं सोडा बाजूला तरी कोणी उभं राहू देईल का?

पण नाही………

त्याला आपली इच्छा मारणं अजिबात उचित वाटत नाही, तो म्हणतो बघूया विचारून आणि तो मग त्या उग्र चेहऱ्याच्या गाडीवानाला विचारतो,

Unclji, can I get a lift till Victoria hotel?

दुसऱ्या मित्राला वाटतं, झालं पडणार आता याला!

तो गाडीवान देखील याच्याकडे अचंबित नजरेने पाहतो आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्याला लिफ्ट द्यायला राजी होतो!

अन् मग तो आश्चर्याचा झटका कॅच करणाऱ्या म्युझिक सकट टॅग लाईन येते……..

पुछने मे क्या ज्याता है??

दुसरी ही अशीच भारी. ……..

नवरा एका गेटटूगेदरला जाण्यासाठी एकटाच निघत असतो आणि बाईसाहेबांच्या मनात येत एवढं छान वातावरण आहे तर पाच मिनिटं का होईना मस्तपैकी बाहेर चक्कर मारायला जावं. बया नवऱ्याला विचारतेही लगेच, तो म्हणतो ठिक आहेस ना? इथे दहा मिनिटात मला गेटटूगेदरला पोचायचयं आणि तुझं काय भलतंच? पंचवीस वर्षांपासून ओळखतेस मला मी कधी लेट पोचलोय कुठे?

पण नंतर मात्र कशी कोण जाणे बायकोची इच्छा त्याला पूर्ण करावीशी वाटते आणि तो तिला चक्क ड्राईव्ह वर नेतो…

नवरा यावेळी नेणं शक्य नाही हे माहीत असूनही ती मनाला त्या क्षणी वाटलं ते बोलते आणि फारशी अपेक्षा नसतानाही तिची इच्छा पूर्ण होते सुद्धा!

सही ना?

तुम्ही आहात का या येड्यांमधले! काही का असेना भला पुछने मे क्या ज्याता है म्हणणारे ? मी तर आहे बाबा!

खरंच काय जातं विचारायला?

काय जातं आपल्या इच्छा बोलून दाखवायला?

जात काहीच नाही, पण प्रत्येक ठिकाणी आपला संकोच आड येतो.

बघा जरा यावरही विचार करून……….

किती जणी बेधडक आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवतात सांगा?

बहुतेकदा मन मारूनच जगतात, ह्याला- त्याला काय वाटेल याचा विचार करत कुढतच बसतात. घरी कामाचा ढिगारा एकटा उपसतील, पण समोर नवरा रिकामा असेल; त्याला मदतीला बोलवावंही वाटत असेल; पण येईल का तो, असं कसं विचारायचं उगाच? जाऊ दे तिकडं! करत बसतील.

पण कधीतरी सांगूनही बघा की, तुम्हालाही गोड सरप्राईज मिळू शकतं, नाही येत कधी काही गोष्टी घरच्यांच्या लक्षात, म्हणून आपण आणून दिल्या तर चालतं, कोणाला माझी कदरच नाही करत रडण्यापेक्षा फार फार बरं!

या पुछने मे क्या ज्याता है चे रिझल्ट मला तर नेहमीच पॉझिटिव्ह मिळालेत ……

एकदा रात्री साडे अकरा वाजता घरातली चहा पावडर संपलीये, हे मला आठवलं. अन् तेव्हा मुलीची सकाळची शाळा होती, चहा तिच्यासाठी मस्ट होता. किराणा मालाची दुकान एव्हाना बंद झालेली होती. मी नवऱ्याला सांगितलं तर त्याने आता सगळं बंद झालं म्हणून मला वेड्यात काढलं. मी तरी त्याला जबरदस्तीने बाहेर काढलं.

म्हटलं चल पाहू तरी! 

एक मेडिकल जागं दिसलं. मी नवऱ्याला म्हणाले, विचारून बघूया ना!

तो म्हणाला, ठीक आहेस ना? मेडिकल मध्ये चहा कोण ठेवत का? जा तूच विचार, मी नाही येणार मुर्खपणा करायला!

मला पण कसंतरी वाटत होतं खरं, पण अगदी गरजच म्हणून मी मेडिकल मध्ये तोंड वर करून विचारुन बघितलं आणि फॉर माय सरप्राईज दहा रुपयाचं चहाचं पाकीट त्याने चक्क माझ्या हातात ठेवलं, अक्षरशः तिथल्या तिथे नाचत मी ते नवऱ्याला दाखवलं!

देखा? पुछनेमे क्या ज्याता है?

आपण आपलेच आराखडे बांधतो आणि त्याला धरूनच चालतो, काहीही म्हणा नकारघंटा वाजवायला जरा जास्तच आवडते आपल्याला.

एखाद्या मोठ्या दुकानात भाव करायला आपल्याला लाज वाटते, भाजीवाल्याकडे पुलाव मध्ये घालण्यासाठी फक्त चार फरसबी लागणार असतात, आपण पाव किलो घेतो (घरी भाजी आवडत नसली तरी) चार देईल का म्हणून, नॉनस्टॉप गाडी आपल्या गावावरून जाते, पण आपण दोन मिनीटं थांबवाल का विचारतच नाही, गप गुमान पुढे उतरुन मागे येतो.

खूप गोष्टी आहेत अशा ज्या आपण न विचारता सोडून देतो, आणि मन मारून जगत राहतो.

एकदा फक्त एकदा बोलून बघायला हवंच, नकोच ती रुखरुख मागे……

काय होणारे होऊन होऊन?

तसं तर आपण विनाकारण बरच बडबडत असतो पण जिथे बोलायचं तिथेच तोंड दाबून बसतो.

होणार नाही, मिळणार नाही वाटणारी unusual demand फक्त मनात न ठेवता विचारून, बोलून मला तरी खूप वेळा मिळालीये!

खरंतर हिच अनोखी डिमांड जेव्हा आश्चर्यकारक रित्या पूर्ण होते, तेव्हा तर एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते.

तर आता, आपण मनात उचंबळून येणाऱ्या लहरींचा गळा घोटण्याआधी थोsssडं थांबायचं आणि फिल्मी स्टाईलमध्ये स्वतःशीच (मनातल्या मनात) बोलायचं!

चलो पुछ ही लेतें है, आखिर पुछने मे क्या ज्याता है?

पूछ डाला तो लाईफ झिंगालाला…..

हे मी नाही ते ऍडवाले म्हणतात बरं का..

तुम्ही त्या टाटा स्कायवाल्या ऍड नक्की बघाच हं यूट्यूबवर “puchneme kya jata hai” टाईप करा आणि पाच-सहा मस्त ऍड एन्जॉय करा……..

त्यांचा होऱ्या कायम लक्षात ठेवून आपली लाईफ झिंगालाला करायला मुळ्ळीच विसरू नका !

लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments