सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

अण्णा

कितीतरी वर्षं “आण्णा गद्रे” आमचे भाडेकरू होते. गल्लीतले सगळेजण त्यांना अण्णाच म्हणायचे. त्यांचे प्रथम नाव काय होतं कोण जाणे! त्यांची मुलंही त्यांना आण्णा म्हणायचे म्हणून सगळ्यांचेच ते आण्णा होते. त्यांचा संसार याच घरात फुलला असे म्हणायला काही हरकत नाही. तीन मुली आणि एक मुलगा. एका पाठोपाठ एक मुलीच झाल्या म्हणून आण्णा आणि वहिनी फारच निराश असत. पण तीन मुलींवर नवस सायास करून त्यांंना एक मुलगा झाला आणि आण्णांचा वंश तरला. वहिनी म्हणजे अण्णांची पत्नी. अण्णांचे एक भाऊ आमच्याच गल्लीत राहायचे. ते “वहिनी” म्हणून हाक मारायचे म्हणून त्याही समस्त गल्लीच्या वहिनीच.

कोकणातून आलेलं हे दाम्पत्य. ब्राह्मण वर्णीय. जातीय श्रेष्ठत्वाची भावना पक्की मुरलेली. दोघांच्याही स्वभावात चढ-उतार होते. चांगलेही वाईटही पण धोबी गल्लीवासीयांनी सगळ्यांना सामावून घेतलेलं. नाती बनायची नाती बिघडायची पण नाती कधी तुटली नाहीत. आमच्या कुटुंबाचा आण्णा- वहिनींशी सलोखा नसला तरी वैर नक्कीच नव्हतं. म्हणजे मालक भाडेकरू मधल्या सर्वसाधारण कुरबुरी चालायच्याच पण प्रश्न आपापसात सामंजस्याने सोडवले ही जायचे. शिवाय त्यांच्या विजू, लता, रेखा या मुली तर आमच्या सवंगडी समूहात होत्याच.

अण्णा शिस्तप्रिय होते म्हणण्यापेक्षा तापट आणि हेकेखोर होते. कुटुंब प्रमुखाचा वर्चस्वपणा त्यांच्या अंगा अंगात भिनलेला होता त्यामुळे विजू लता रेखा या सदैव धाकात असत.

अगदी उनाड नव्हतो आम्ही… पण मनात येईल तेव्हा, केव्हाही, कुठल्याही खेळासाठी आम्ही एकत्र जमायचो. खेळणं भारी प्रिय. खेळतानाचा आरडाओरडा, गोंधळ, हल्लाबोल मुक्तपणे चालायचा, गल्लीत घुमायचा. अण्णा घरात आहेत म्हणून विजू लता रेखा उंबरठ्यातूनच आमची खेळ मस्ती बघायच्या. त्यांचे खट्टू झालेले चेहरे मला आजही आठवतात. बाहेर आमचा खेळ चालायचा आणि या उंबरठ्यावर बसून गृहपाठ पूर्ण करायच्या नव्हे गृहपाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न करायच्या. का तर? अण्णा ओरडतील म्हणून. त्यांच्या घरात मुलांना सरळ करण्यासाठी वेताची छडी होती म्हणे! 

एक दिवस आण्णा आमच्या पप्पांना म्हणाले होते, ” का हो ढगेसाहेब? मी ब्राह्मण ना मग ही सरस्वती तुम्हाला का म्हणून प्रसन्न?”

तेव्हा पप्पा उत्तरले होते, ” अण्णा ती वेताची छडी बंबात टाका मग बघा काय फरक पडतो ते. ”

अण्णांचं कुटुंब विस्तारलं. मुलं मोठी झाली आता त्यांना हे भाड्याचं घर पुरेनासं झालं. आण्णांचे जोडधंदे ही चांगले तेजीत होते. त्यांची वखार होती. आणि त्या माध्यमातून त्यांनी भरपूर पैसा जोडला होता. वृत्ती कंजूष आणि संग्रही त्यामुळे गंगाजळी भरपूर. आण्णांनी धोबी गल्ली पासून काही अंतरावर असलेल्या चरई या भागात प्लॉट घेऊन चांगलं दुमजली घर बांधलं. घराची वास्तुशांती केली आणि एक दिवस गद्रे कुटुंबाने धोबी गल्लीचा निरोप घेतला. मात्र त्यांनी आमच्या घराचा ताबा मात्र सोडला नाही.

काही दिवस जाऊ दिले. त्या दरम्यान आण्णा रोज त्यांच्या या जुन्या घरी येत. झाडलोट करत, पाणी भरून ठेवत. बऱ्याच वेळा दुपारच्या वामकुक्षीच्या निमित्ताने ते येतही असत. वखारीच्या हिशोबाच्या वह्या वगैरे तपासत बसत आणि फारसं कुणाशी न बोलता गुपचूपच पुन्हा कडी कुलूप लावून निघून जात. भाडं मात्र नियमित देत.

जीजी (माझी आजी) मात्र फार हैराण झाली होती. ती बऱ्याच वेळा आण्णांना गाठून शक्य तितक्या उंच आवाजात सांगायची, ” आमच्या घराचा ताबा सोडा. आणि व्यवहार मिटवून टाका. बांधलंत ना आता मोठं घर? जरूर काय तुम्हाला हे घर ताब्यात ठेवायचे आणि माझ्या जनाच्याही मुली आता मोठ्या झाल्यात. आम्हालाही आता घर पुरत नाही. अण्णा नुसतंच हसायचे. निर्णयाचं काहीच बोलायचं नाही.

“सोडतो ना आजी. एवढी काय घाई आहे तुम्हाला ?”

त्यावेळी भाडेकरूंचे कायदे अजबच होते. आपलं स्वतःचं घर असूनही भाडेकरूनकडून ते रिकामं करून घेणे हे अत्यंत तापदायक काम होतं. कायदा हा भाडेकरूधार्जिणा होता. असे म्हणायला हरकत नाही. आतासारखे मालक आणि टेनंट मध्ये ११ महिन्याचा करार, कायदेशीर रजिस्ट्रेशन, इच्छा असेल तर कराराचे नूतनीकरण वगैरे मालकांसाठी असलेले संरक्षक कायदे तेव्हा नव्हते. शिवाय भाडोत्री जर अनेक वर्षं तिथे राहत असेल तर ती जागा त्याच्या मालकीची होऊ शकते अशी एक भीती कायद्याअंतर्गत होती पण पप्पांच्या वकील मित्रांनी त्यांना चांगला सल्ला दिला होता.

“हे बघ! त्या गद्र्यांनी घर बांधले आहे. आता त्यांच्या मालकीची स्वतःची जागा आहे. शिवाय तुझी गरज आणि तुझे घर ही दोन कारणे तुला न्याय मिळवून देण्यासाठी पुरेशी आहेत. तुझी बाजू सत्याची आहे. आपण गद्रेंवर केस करूया, तशी नोटीस त्याला पाठवूया”

“शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. ” असा काळ होता तो! पण आमच्या कुटुंबाचा नाईलाज होता.

तर ही कायद्याची लढाई लढायला हवी. साम दाम दंड भेद या तत्त्वातील ही शेवटची पायरी होती. भेद.

घर रिकामं करायची नोटीस आण्णांना गेली. गरम कढईत उडणाऱ्या चण्यासारखे अण्णा टणटण उडले त्यांनी नोटीसीला गरमागरम उत्तर दिले.

“नोटीस देता काय ?एवढ्या वर्षांचे आपले संबंध? थांबाच आता.. बघतोच घर कसे काय खाली करतो ते!” पप्पा कधीच कचखाऊ नव्हते. डगमगणारे तर मुळीच नव्हते.

केस कोर्टात उभी राहिली. आता नातं बदललं. आरोपी आणि फिर्यादीचे नाते निर्माण झाले. आमचं कुटुंब तसं लहानच. माणूसबळ कमी. स्वतःच्या व्यवसायाचा ताप सांभाळून कोर्टाच्या तारखा पाळताना पप्पांची एकट्यांची खूप दमछाक व्हायची.

केस खूप दिवस, खूप महिने चालली. तारखावर तारखा पडायच्या. निकाल लागतच नव्हता. हळूहळू अण्णांना आणि पप्पांनाही कोर्टाच्या वातावरणाची सवय झाली असेल. शिवाय पप्पा म्हणजे माणसं जोडणारे. नावाचा पुकारा होईपर्यंत कोर्टात नियमितपणे येणारी माणसं पप्पांची दोस्त मंडळीत झाली जणू काही. विविध लोकांच्या विविध समस्या पण पप्पा गमती, विनोद सांगायचे. त्यांच्या उपस्थितीत वातावरण हलकं व्हायचं आणि आश्चर्य म्हणजे या समूहात आण्णाही आनंदाने सामील असायचे. न्यायपीठापुढे आरोपी आणि फिर्यादी आणि बाहेर फक्त वक्ता आणि श्रोता. कधीकधी तर कोर्टाच्या बाहेर अण्णा आणि पप्पांच्या गप्पाच चालायच्या. खूप वेळा आण्णा माथ्यावरची शेंडी गुंडाळत, टकलावरून हात फिरवत. डोळ्यात पाणी आणून त्यांच्या कौटुंबिक समस्या सांगत आणि पप्पा त्यांच्या पद्धतीने त्यांचे सांत्वनही करत.

घरी आल्यानंतर आम्ही सारे पप्पांभोवती कडे करायचो. “केस चे काय झाले? निकाल लागला का? कुणाच्या बाजूने लागला ?वगैरे आमचे प्रश्नांवर प्रश्न असायचे आणि पप्पा म्हणायचे, ” हे बघा अण्णांनी डबा भरून खरवस आणला होता. मी खाल्लाय तुम्ही खा. मस्त झालाय खरवस.. ”

याला काय म्हणायचे ?

आज हे लिहिताना माझ्या मनात सहजच आलं. अण्णांनी दिलेला खरवस पप्पांनी कशाला खावा? अण्णांनी त्यांच्यावर विषप्रयोग वगैरे केला असता तर? टीव्हीवरच्या माणूसकी शून्य मालिका बघून झालेली ही मानसिकता असेल पण त्या वेळचा काळ इतका वाईट नक्कीच नव्हता. माणूस काणूस नव्हता झाला.

यथावकाश केसचा निकाल लागला. पपा केस जिंकले, अण्णा हरले. कोर्टाच्या आदेशानुसार अण्णांना तात्काळ घर रिकामे करून द्यावे लागणार होते.

दुसर्‍याच दिवशी आण्णा घराची चावी द्यायला आले. थोडा वेळ आमच्यात बसले. गप्पा -गोष्टी, चहा -पाणी झाले. पपानीही नवे कुलूप आणले होते. दोघेही खाली गेले. आम्ही खिडकीतूनच पाहत होतो. गल्लीतले सर्व आपापल्या गॅलरीतून पाहत होते. बाबा मुल्हेरकर मात्र खाली आले होते. दोघांच्याही सोबत ते उभे होते. आण्णांनी त्यांचे कुलूप काढले आणि पप्पांनी आपले लावले. विषय संपला. कोणीच कोणाचे वैरी नव्हते. “केस” संपली होती. मैत्र उरले होते.

आण्णा दोन पावले चालून गेले आणि माघारी फिरले. आम्हाला वाटले, ” आता काय?”

अण्णांनी घराच्या दोन पायऱ्या चढून दाराला पप्पांनी लावलेले कुलूप ओढून पाहिले. नीट लावले होते आणि त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या खांद्यावर पपांनी हात ठेवला. तेव्हा ते म्हणाले, ” ढगे साहेब! या वास्तूचं खूप देणं लागतो मी. इथेच माझा संसार बहरला. आयुष्य फुललं. तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसं भेटली. माझा कुलदीपक इथेच जन्मला. या वास्तूचा निरोप घेताना माझं मन खूप जड झाले आहे हो ! पाऊल उचलत नाहीय. ”

हिरव्यागार डोळ्यांचा, डोक्यावर टक्कल असलेला, बोलण्यात अस्सल कोकणी तुसडेपणा असलेल्या या तापट, हेकट माणसाच्या अंतःप्रवाहात हा भावनेचा झरा कुठून उत्पन्न झाला असेल?

“याला उत्तर आहे का?”

“नाही” 

याला फक्त जीवन ऐसे नाव… 

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments