श्री मेघ:श्याम सोनावणे

💥 मनमंजुषेतून 💥

☆ महाकुंभ : भक्त, सेवक आणि साधना… लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

प्रयागराज येथील महाकुंभ सोहळ्यात तीन दिवस घालवल्यानंतर, तिथल्या त्रिवेणी संगमावर लोटलेला मानवतेचा महासागर पाहिल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे महाकुंभ प्रामुख्याने फक्त दोनच प्रकारच्या लोकांचा आहे, भाविकांचा आणि सेवकांचा! 

खरे भाविक, जे कुणीही न बोलावता श्रद्धेने भरलेले हृदय घेऊन प्रयागराजला येतात मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी आपली सामानाची गाठोडी डोक्यावर ठेवून मैलोनमैल चालत येतात ते भाविक, जे संगम स्नानासाठी तासचे तास शांतपणे वाट पाहतात, जे गंगाजल भरण्यासाठी आठ दहा मोठे कॅन घेऊन येतात आणि ते भरलेले, जड कॅन मोठ्या कष्टाने वाहून त्यांच्या त्यांच्या गावी नेतात, त्यांच्या स्वतःसाठी नव्हे, तर नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, सुहृदांना देण्यासाठी. जे रात्री झोपायला खोली मिळाली नाही तर शांतपणे पथारी पसरून नदीच्या काठावर वाळवंटात झोपतात, कसल्याच सुविधा नसल्या तरी ते तक्रार करत नाहीत.

पवित्र संगमात स्नान करताना त्यांच्या मिटलेल्या डोळ्यातून आपसूक पाणी वाहते. गंगेच्या थंडगार प्रवाहाच्या कुशीत ते अश्या निःशंकपणे शिरतात जणू त्यांना पूर्ण खात्री असते की त्या क्षणी गंगामाई त्यांना आपल्या निळसर सावळ्या प्रवाहात अशी अलगद सामावून घेईल जशी एक आई आपल्या बाळाला गर्भात सांभाळते. पाण्यात डुबकी घेऊन जेव्हां ते वर येतात तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावरची तृप्तीच सांगत असते की त्यांना पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या आत्म्यावर साचलेल्या कर्मरूपी धुळीची पुटे त्या स्नानाने वाहून गेली आहेत. गुडघाभर पाण्यात उभे राहून जेव्हा ते सूर्याला अर्घ्य देतात तेव्हां सोनेरी उन्हाने झळाळून निघालेल्या त्यांच्या चेहेऱ्यावरचे संपूर्ण समर्पण भाव पाहण्यासारखे असतात. कुंभ खऱ्या अर्थाने त्यांचा असतो.

परमार्थ निकेतनच्या साध्वी भगवती सरस्वती यांनी म्हटल्याप्रमाणे, खरे भक्त हे फक्त आस्थेसाठी, भक्तीसाठी येतात. त्यांचे पूर्वजही कधीकाळी असेच आले असतील प्रयागला, इथल्याच मऊ वाळूत उभे राहून त्यांनी असेच सूर्योदय पहिले असतील. इथल्याच थंडगार पाण्यात असेच स्नान करताना त्या लोकांनी ज्या प्राचीन मंत्रांचा उच्चार केला होता, त्याच मंत्रांचे, त्याच भाषेतले उच्चार त्यांचे वंशज आजही करतात. गंगेचा शांत, प्रेमळ प्रवाह मात्र तेव्हाही असाच अविरत वाहात होता, आजही तसाच वाहात आहे. बाहेरच्या जगाला महाकुंभ म्हणजे काय हे माहिती नव्हते तेव्हांही हे सच्चे भाविक संगमस्नानासाठी प्रयागला येत होते आणि भविष्यात जग महाकुंभ विसरले तरीही ते इथे येतच राहतील. कारण हा महाकुंभ त्यांच्या भक्तीचा महाकुंभ आहे.

मानवतेचा महासागर हे कुंभमेळ्याचे वर्णन काही आजचे नाहीये. ह्युएन त्संग (Xuanzang) हा प्रसिद्ध चीनी बौद्ध भिक्षू सातव्या शतकात भारतात आला होता. त्याने Great Tang Records on the Western Regions या प्रवासवृत्तांतात भारतातील अनेक ठिकाणांचे, संस्कृतीचे आणि धार्मिक परंपरांचे वर्णन केले आहे. कनौजचा सम्राट हर्षवर्धन याच्या राज्यकाळात प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्याचे वर्णन करताना तो म्हणतो की या मेळ्यात हजारो लोक भारताच्या वेगवेगळ्या भागांतून एकत्र आले होते ज्यात हिंदू साधू तर होतेच, पण जैन मुनि, बौद्ध भिक्षू, विद्वान आणि सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मेळ्यात धार्मिक प्रवचने, ग्रंथांचे वाचन, आणि विद्वानांचे वादविवाद (शास्त्रार्थ) चालत असत. लोक येथे मानसिक शांती आणि चित्तशुद्धीसाठी येत असत असे ह्युएन त्संग म्हणतो, जे आजही खरे आहे. वरची आवरणे, पेहनावा जरी बदलला असला तरी कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची आतली भक्ती तीच आहे आणि म्हणूनच महाकुंभ सर्वप्रथम त्यांचाच आहे.

महाकुंभ त्यांचाही आहे, जे इथे काही देण्यासाठी येतात, घेण्यासाठी नाही.

१५, ००० सफाई कर्मचारी, जे दिवसातून चार वेळा नदीकाठ झाडून इथल्या लाखो पाऊलखुणा मिटवून टाकतात, नव्या दिवसाची सुरुवात नव्या पावलांच्या खुणांनी व्हावी म्हणून. १२५, ००० पोलिस, जे प्रयागमध्ये जमलेल्या मानवतेच्या महासागराच्या लाटा अंगावर झेलण्याचे अवघड काम करतात, कधी मार्गदर्शन करतात, कधी संरक्षण देतात, तर कधी शांतता आणि शिस्त राखण्यासाठी ओरडतातही. बचाव पथकातील हजारो स्वयंसेवक, जे नेहमी दक्ष असतात, त्यांच्या कौशल्याची कधीच गरज पडू नये अशी त्यांची आशा असते, पण दुर्दैवाने अशी गरज पडलीच तर ते त्यासाठी सदैव सज्ज असतात. इथल्या ५५० शटल बसचे चालक, जे अखंड फेऱ्या मारून यात्रेकरूंना संगमापर्यंत पोहोचवतात. अनेक मठ, मंदिर, धार्मिक संस्थांचे स्वयंसेवक जे उपाशी लोकांसाठी रात्रंदिवस खपून जेवण बनवतात. थकलेल्या यात्रेकरूंच्या पायांना मालिश करणारे सेवाभावी लोक, धार्मिक संस्थांच्या दवाखान्यांत सेवा देणारे डॉक्टर, पडद्याआड असलेले अदृश्य सरकारी अधिकारी जे अठरा अठरा तास काम करून इथली व्यवस्था सांभाळण्याचे आपले कर्तव्य बजावतात. कुंभ जितका भाविकांचा आहे तितकाच त्यांचाही आहे. सेवकांचा. जे निरपेक्ष भावनेने सेवा देतात त्यांचाही आणि जे कर्तव्य म्हणून सेवा देतात त्यांचाही.

बाकी आपण बहुतेक सारे – कुतूहलापोटी आलेलो असतो. महाकुंभाचा थक्क करणारा आवाका पाहून आपण भारावून जातो. इथली मैलोनमैल पसरलेली तंबूंची नगरे, अशक्यप्राय वाटणाऱ्या ठिकाणी बांधलेली स्वच्छतागृहे, आकाशात घिरट्या घालणारे ड्रोन, नदीकाठी उभारलेली तात्पुरती शहरे, रस्ते, हेलिपॅड वगैरे सुविधा पाहून आपण अचंबित होतो, आपण स्नानही करतो, कदाचित आपल्यापैकी काही जणांना गंगेच्या पाण्याच्या स्पर्शाने भक्तीचा परिसस्पर्शही होतो.

पण मुळात आपण न निखळ श्रद्धावान भक्त असतो, ना निःस्वार्थ सेवा देणारे सेवक.

आपण आहोत घटकाभर थबकून इतिहासाच्या खिडकीतून कुतूहलाने ह्या श्रद्धा आणि भक्तीच्या सोहळ्याकडे डोकावून पाहणारे प्रवासी. आपण उद्या इथून निघून गेल्यावरही महाकुंभ सुरूच राहील, गंगेच्या प्रवाहात छोटा खडा फेकल्यावर उठणारा क्षणिक तरंग आहोत आपण फक्त.

महाकुंभ फक्त एक ‘इव्हेंट’ नाही, तर तो भारताच्या नाडीचा दर बारा वर्षांनी निनादणारा एक ठोका आहे, जो खऱ्या भक्तांना आपसूक ऐकू येतो आणि सेवाभावनेने कार्य करणाऱ्या लोकांना आवाहन करतो.

होय, तुम्ही, मी, आपण बहुतेक जण केवळ पर्यटक आहोत. कुंभ खरा फक्त अश्याच लोकांचा आहे, जे एकतर पूर्ण श्रद्धेने भक्ती करतात किंवा संपूर्ण समर्पण भावाने सेवा देतात!

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments