मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ यमक ☆ सुश्री सुषमा जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ मनमंजुषेतून ☆ यमक ☆ सुश्री सुषमा जोशी ☆ 

ज्योतिताईंनी एकदा विचारलं, “एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं होते, या काव्यप्रकाराला काय म्हणतात?”  माझा हक्काचा स्रोत  म्हणजे आईदादा!

दादांचा फोन बंद होता आठ दिवसांपासून! जाम बेचैन झाले. म्हणून आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करून ठेवलं. पाचव्या मिनिटाला दादांचा फोन!

“अगं, आत्ताच फोन सुरू झाला आणि तुझा मेसेज वाचला. ऐक, यमकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तू म्हणतेस ते दामयमकाच्या जवळपास जाणारं यमक असेल, असं आई म्हणत्ये.”

मागून मला आईच्या नाजूक गुणगुणण्याचा आवाज आला. आईची स्मरणशक्ती अफाट! कोणतीही कविता पाठ असते.

‘श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया|

मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया|

सारा या प्रभुची हे लीला गाती सदैवही सुकवी|

सुकवी भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी|’

(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा.)

दादा म्हणाले, “हे बघ ऐक!” त्यांनी तोवर, ते आठवीत असतानाचं (आईला ८४ वर्षे पूर्ण होतील आता. दादा ८६ वर्षांचे!) मराठीचं पुस्तक आणलं होतं.  पाय प्रचंड दुखतात त्यांचे! पण ब्रिज आणि भाषा हे विषय आले की, त्यांना पंख लाभतात!

तर कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. थोडक्यात इथे मांडत आहे.

१) एकाक्षरी यमक: 

एक्या पदे भूमि भरोनि थोडी

दुजा पदे अंडकटाह फोडी

(डी ला डी हे एकाक्षरी यमक)

२) द्व्यक्षरी

दे तीसरा पाद म्हणे बळीला

म्हणोनी पाशी दृढ आकळीला

(ळीला हे द्व्यक्षरी)

३)चतुराक्षरी

बाई म्यां उगवताच रवीला

दाट घालुनि दही चरवीला

त्यात गे फिरवितांच रवीला

सार काढुन हरी चरवीला

(काय अफाट आहे ना हे!  प्रत्येक ‘चरवीला’ वेगळा आशय मांडतो.)

४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदि चरण सारखा.

सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात

तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात

५) दामयमकाचं उदाहरण वर दिलंच आहे.

६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक.

सुसंगति सदा घडो… पडो.. झडो… नावडो

७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक.

वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो

(वाजत गाजत साजत आजत याजत.. अशी गंमत आहे.)

मज मागे मत्स्यांचा हा रिपु – शशि- राहु- बाहु राणा हो

८) युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे.

पायां नमी देइन वंश सारा

पा या न मी दे इनवंशसारा

(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम!)

९) समुद्रक यमक

हेही अफाट प्रकरण आहे. –

अनलसमीहित साधी राया, वारा महीवरा कामा

अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा

(हे पृथ्वीपते धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला  साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, बलरामही हवे तर येतील. मग वराका (बिचारी) मा (रुक्मिणी) तुझ्या साह्यास का येणार नाही?

अशा यमकांत चमत्कृती असते. पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!

©️ सुश्री सुषमा जोशी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈