सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा…
मानाच्या पहिल्या कसब्यातील गणपतीला, श्री गणेशाला कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याची प्रार्थना करून, मानाचे आमंत्रण देऊन, मंडळी श्री जोगेश्वरी कडे वळायची. तिथेही जगदंबेला साडीचोळी, ओटी, पत्रिका अक्षत, पान सुपारी देवून मानाच आमंत्रण दिलं जायच. अर्थात श्री गणेश, जोगेश्वरी कृपेने कार्य निर्विघ्नपणे पार पडायचचं आणि वाजंत्री सनईच्या सुरांत शुभमंगल शुभ कार्य साजरं व्हायच. व्हीनस बँड किंवा अप्पा बळवंत चौकातला’ प्रभात ब्रास बँड वरातीची रंगत वाढवायचा. त्याकाळी गाजलेली सुंदर गाणी बँड वर वाजवली जायची. मुलगी सासर घरी गृहप्रवेश करतांना हमखास ‘ जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा ‘ हे गाणं बँडच्या सुरातून अलगद बाहेर पडायचं तेव्हां डोळे भरून आलेल्या वधू मायचा पदर डोळ्याकडे जायचा आणि वधू पित्याचा कंठ दाटून यायचा. पाठवणीच्या त्या हळव्या क्षणी बँन्ड वाल्यांच्या सुरेल स्वरांनी सगळ्यांनाच गहिवरून यायच. इतकं ते गाणं बँड वाले अगदी सुरेख, तन्मयतेने वाजवायचे जोडीला कारंजा सारखे उंच उसळणारे भुईनळे लाल, पिवळ्या चांदण्याची बरसात करायचे. झगमग करणाऱ्या गॅस बत्त्या वरातीची शान वाढवायच्या. माझ्या नातवाची चि. यज्ञसेनची मुंज 2012 साली झाली. इतकी दणक्यात आणि अप्रतिम झाली होती की अशी मुंज उभ्या आयुष्यात प्रथमच आम्ही बघितली. डोळ्याचं पारणं फीटलं आणि आमच्या जन्माचं सार्थक झाल. पूर्वीपासून चालत आलेलं प्रसिद्ध ‘खाऊवाले पाटणकरांचे’ दुकान बाजीराव रोडला आहे त्यांनी मौजीबंधनासाठी उत्तम सहकार्य केले होत. गुरुगृही अध्ययनासाठी आश्रमात आलेल्या बटूचा प्रवेश देखावा, इतका सुंदर होता की आम्ही त्या काळात त्या सोज्वळ रम्य वातावरणात पोहचलो. चि. राजेश चि. प्रसाद या दोन्ही मामांसह बटू मांडवात आला माझा हा नातू चि. यज्ञसेन इतका गोड दिसत होता की नजर लागू नये म्हणून, बोट काजळडबी कडे वळलं. मांडवात बटू प्रवेश देखावा अतिशय सुंदर अप्रतिम होता ‘खाऊवाले पाटणकरांनी’ उत्तम योजना केली होती पालखी वजा शामियान्यातून आमचा यज्ञसेन बटू सगळ्यांचे आशिर्वाद घेत शुभ कार्य मंडपाच्या दिशेने कार्यालयात प्रवेश करीत होता मातृभोजनाला बसलेली माझी लेक सौ मीनल व चि. यज्ञसेंनच्या चेहऱ्यावरचे तेज बघून जिजामाता आणि शिवबा आठवला. आमचे जावई श्री सुजित सु. जोशी कमालीचे हौशी आहेत पेशवे काळात पुण्यामध्ये शुभ, आनंद प्रसंगी हत्तीवरून साखर वाटली जायची आमच्या जावयांनी चि. यज्ञसेनची भिक्षावळ त्याला हत्तीवर बसवून साजरी केली. पगडी घातलेला पेशवाई थाटातला मुंज मुलगा अंबारीत खुलून दिसत होता. ‘हौसेला मोल नाही आणि हौसेला तोड नाही’ म्हणतात ही म्हण जोशी कुटुंबांनी सार्थ करून दाखवली. हा नेत्र दीपक सोहळा अवर्णनीय होता. पुण्यातले प्रत्येकजण शुभ मौज्य बंधन, शुभविवाह सोहळा श्री गणेश श्री जोगेश्वरीचे आशिर्वाद घेऊनच साजरा करायचे आणि आजतागायतही करतात. शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडणाऱ्या श्रीगणेशाला आणि श्री जोगेश्वरीला माझा नमस्कार..
– क्रमशः…
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈