श्री मयुरेश उमाकांत डंके
मनमंजुषेतून
☆ “कर्तृत्वाचे डोही अभिमान तरंग” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“काका, तुझ्याकडे मदर टेरेसांचं पुस्तक आहे का?”
“का गं ?”
“मला गोष्ट सांगायची आहे. वुमन्स डे आहे ना. ”
“मदर टेरेसांची गोष्ट ?”
“हो.”
“कुणी सांगितलं हे नाव?”
“मिस् ने सांगितलं.”
“पण त्यांचीच गोष्ट का बरं ? दुसऱ्या कुणाची गोष्ट सांगितली तर चालणार नाही का ?”
“नाही.”
“का पण ?”
“त्यांनी सांगितलं, हीच गोष्ट सांगायची म्हणून.”
“हे बघ. आपण एक काम करू. मी तुला दोन गोष्टी सांगतो. मग त्यातली जी गोष्ट आवडेल ती तू सांग. चालेल का ?”
“चालेल. ”
मग मी तिला मदर टेरेसांविषयी माहिती सांगितली आणि पद्मश्री बछेंद्री पाल यांच्याविषयी माहिती सांगितली.
एव्हरेस्ट चा ट्रेक, बर्फातून चालत जाणं, जगात पाचव्या क्रमांकाची एव्हरेस्ट वीरांगना असणं, त्या ट्रेकिंग शिकवतात, जगभरातले लोक त्यांच्याकडे शिकण्यासाठी येतात, हे सगळं तिला फार आवडलं. थ्रिलिंग वाटलं. महिला दिनाच्या कार्यक्रमाला आणखी पाच दिवस होते. हीनं दुसऱ्या दिवशी तिच्या मिस् ना बछेंद्री पाल यांची गोष्ट सांगितली आणि हीच गोष्ट सांगणार आहे असं लोकमान्यांच्या बाण्यानं सांगितलं.
तिच्या मिस् नं गोष्ट ऐकून घेतली खरी, पण त्यांना त्यातून मोटिव्हेशनल असं काही दिसलं नाही म्हणे. त्यांनी सांगितलं, मदर टेरेसांचीच गोष्ट हवी.
ही पुन्हा माझ्याकडे हजर. काय काय घडलं ते तिनं मला सांगितलं. ‘मदर टेरेसांची गोष्ट सांगणार नसशील तर कुठलीच गोष्ट सांगू नकोस’ असं मिस् म्हणाल्या, हेही सांगितलं.
मी तिला विचारलं, “आईबाबा काय म्हणाले ?”
ती म्हणाली, “तू मदर टेरेसांची गोष्ट सांग. काकाला यातलं काहीही सांगू नकोस. असं आई म्हणाली. ”
“आणि बाबा ?”
“ह्या ट्रेकर आहेत ना त्या फक्त पद्मश्री आहेत. मदर टेरेसा तर भारतरत्न आहेत. म्हणजे त्या जास्त मोठ्या आहेत, त्यांचीच गोष्ट सांग. असं बाबा म्हणाले. ”
“बरं. चल. तुला अजून एक गोष्ट सांगतो. ती एकदम मोटिव्हेशनल स्टोरी आहे. ”
“सांग. ”
मग मी तिला लता मंगेशकरांची गोष्ट सांगितली. त्यांचं लहानपण, त्यांनी केलेले कष्ट, सुरूवातीचे दिवस, अंगात खूप ताप असतानाही गाणं कसं गायलं हे सगळं तिला सांगितलं. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे तीनही पुरस्कार मिळाले आहेत, हेही आवर्जून सांगितलं.
कार्यक्रम तीन दिवसांवर आला होता. हीनं ठरवलं की, मी लता मंगेशकरांचीच गोष्ट सांगणार. दुसऱ्या दिवशी ऑनलाईन शाळेत तिनं तिचा निर्णय मिस् ना सांगितला. पुन्हा तोच प्रकार. मिस् म्हणाल्या, “स्टोरी साधीच तर आहे. यात मोटिव्हेशनल काय आहे?” ही पुन्हा हिरमुसली.
तिच्या मिस् म्हणजे “इतकी चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासानं दुसरं कोण देणार ?” या प्रकारच्या शिक्षिका आहेत, हे माझ्या लक्षात यायला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मी तिला सांगितलं, “जाऊ देत. तू उद्या मिस् ना सांग, मी कुठलीच गोष्ट सांगणार नाही. ”
तिनं दुसऱ्या दिवशी जसं च्या तसं मिस् ना सांगितलं. त्यांचं (जेवढं होतं तेवढं) धाबं दणाणलं असणार. त्यांनी दोन मिनिटांत तिला सांगितलं की, “तू लता मंगेशकरांची गोष्ट सांगितलीस तरी चालेल. ”
ठरल्याप्रमाणे ८ मार्च रोजी तिनं लता मंगेशकरांची गोष्ट सांगितली. सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं. काल ती सगळा वृत्तांत सांगायला घरी आली होती. मग मी तिला विचारलं की, “इंटरनॅशनल वुमन्स डे का सेलिब्रेट करतात, हे तुला माहिती आहे का?”
ती म्हणाली, “नाही. ”
मग मी तिला १९०८ साली महिलांनी आंदोलन का केलं, १९०९ मध्ये अमेरिकन सोशलिस्ट पार्टीनं आंदोलन कसं केलं, क्लारा जेटकिन यांनी त्याला इंटरनॅशनल कसं केलं, का केलं, १९११ पासून हा दिवस इंटरनॅशन वुमन्स डे म्हणून साजरा कसा होतो, १९७५ पासून युनायटेड नेशन्सने हा दिवस सेलिब्रेट करायला सुरूवात केली, वगैरे सगळा इतिहास सांगितला.
अमेरिका, जर्मनी, रशिया, ब्रिटन, या देशांना महिला दिवस साजरा करण्याची गरज का पडली, हेही सांगितलं. १९१९ साली (म्हणजे महिला दिवस साजरा व्हायला लागून नऊ वर्षं उलटल्यानंतर) आपल्या देशात जालियनवाला बाग हत्याकांडात कितीतरी महिलांना जीव गमवावा लागला, ब्रिटीशांनी कितीतरी महिलांवर अत्याचार केले, हे ही सांगितलं. आपल्या देशात महिलांवर बेछूट अत्याचार करणारे हे लोक त्यांच्या देशात मात्र महिला दिवस साजरा करत होते, हेही सांगितलं.
१९१७ साली रशियामध्ये महिलांनी अन्न आणि शांततेसाठी चार दिवसांचं आंदोलन केलं. त्या चार दिवसांच्या आंदोलनामुळं त्यावेळच्या रशियन झार ला पायउतार व्हावं लागलं आणि रशियन सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकारही दिला, याचीही माहिती सांगितली. तिला ही सगळी माहिती ऐकून आश्चर्य वाटलं.
ज्यांनी झाशीच्या राणीवर तलवार उगारली, तेच देश महिला दिवस साजरा करण्याची सुरूवात करतात आणि त्याला इंटरनॅशनल रूप कसं देतात, हा विरोधाभास तिच्या लक्षात आणून दिला. ज्यांनी आपल्या देशातली आंदोलनं माणसांना गोळ्या घालून, फाशी देऊन चिरडली, त्यांनी त्यांच्या देशातल्या महिलांच्या आंदोलनाचा सन्मान केला आणि वरून त्याला इंटरनॅशनल केलं, ह्या प्रकाराला काय म्हणावं?
महिलांना जगभर प्रचलित असणारा सोशल मीडीया वापरू न देणारा ‘चीन’ महिला दिवस किती आनंदानं साजरा करतो, हे तिला सांगितल्यानंतरचा तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
देवीनं महिषासुराला मारलं तो महिला दिवस नाही का ?
श्रीकृष्णानं द्रौपदीचं रक्षण केलं तो दिवस महिला दिवस नाही का?
प्रितीलता वडेद्दार, कल्पना दत्त, लक्ष्मी सहगल, भोगेश्वरी फुकनानी, बेगम हजरत अली, मातंगिनी हाजरा, कनकलता बरूआ यांनी देशासाठी आपले प्राण दिले, तो महिला दिवस नाही का ?
भिकाजी कामा यांच्या कार्याकरिता आपण महिला दिवस साजरा करू शकत नाही का?
आपण यांची केवळ आठवण ठेवून उपयोग नाही, यांचे उपकार न फिटण्यासारखे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई, बाबाराव सावरकरांच्या पत्नी यशोदाबाई आणि नारायण सावरकर यांच्या पत्नी शांताबाई यांना किती यातना भोगाव्या लागल्या, महिला दिवस साजरा करण्यात पुढाकार घेणाऱ्या ब्रिटीशांनीच त्यांचा किती छळ केला, त्यांची दयनीय अवस्था कशी झाली, हे सगळं विसरणं म्हणजे कृतघ्नपणाच आहे.
वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात गोळी लागून कनकलता बरूआ यांचा मृत्यू झाला. ब्रिटीशांनी गोळी मारली त्यांना. पण त्यांना आपण सगळेच विसरून गेलो. २१ व्या शतकात वयाच्या १७ व्या वर्षीच अंगावर गोळी झेलणाऱ्या मुलीला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला.. ! आपणच आपल्या देशासाठी लढलेल्या सुकन्येला सन्मान देऊ शकलो नाही. त्यांचा फोटोच काय, पण नावही कुठल्या शाळेतून घेतलं जात नाही, पुरस्कार तर लांबच राहिला.
विसाव्या शतकाच्या सुरूवातीला १५ हजार महिलांनी आंदोलन केलं, तर ती एक कृती आज आंतरराष्ट्रीय रूप घेऊन जगभर साजरी केली जाते. पण आपल्या देशातल्या माणसांची, त्यांच्या अशा कर्तृत्वाची देशाच्या संसदेत राष्ट्रीय नेत्यांकडून चेष्टा होते, निंदानालस्ती होते आणि सगळं जग ते पाहतं. आपल्याला आपल्या गौरवगाथेविषयी अभिमान का नाही ? कारण, आपल्याला हे काही माहितीच नाही, कुणी सांगत नाही, कुणी बोलत नाही. ज्यांनी मुलामुलींना या कथा सांगितल्या पाहिजेत, त्यांनाच त्या माहिती नाहीत आणि माहित करून घेण्याची इच्छाही नाही. हेच तर मोठं दुर्दैव आहे.
“जगाला ह्यांचा परिचय करून देण्यात आपण कमी पडलो आहोत, हे नक्की. पण आता सुधारलं पाहिजे. चूक दुरूस्त केली पाहिजे. कर्तृत्वाचा सन्मान करायचा तर प्रत्येकाचाच झाला पाहिजे. कर्तृत्वाची प्रेरणा प्रत्येकातच आहे. तिचं कौतुक करता आलं नाही तरी चालेल, पण त्या कर्तृत्वाविषयी आदर मात्र बाळगलाच पाहिजे. समजलं का ?” मी तिला विचारलं.
“काका, तू मला ह्या सगळ्यांविषयीची आणखी माहिती देशील का? मी पुढच्या वर्षी यावरच प्रोजेक्ट करीन. ” ती.
“नक्की देईन. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत… ! आता पळा.. परीक्षा आहे ना ? ती संपली की करूया प्रोजेक्ट.. !” मी.
ती आनंदानं गेली. अगदी अनाहूतपणे उघडलेला मनाचा कप्पा बंद करून मी पुन्हा माझ्या कामामध्ये गुंतून गेलो….. !
© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ
संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈