मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 – स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? मनमंजुषेतून ?

☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 – स्व दत्ता हलसगीकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

करुणाघन, कोषातून बाहेर, आशयघन,उन्हातल्या चांदण्यात, चाहूल वसंताची, शब्दरूप मी, सहवास, ऋतू सोहळे, झोका ( बालकविता )हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. कवितेतील अमृतघन (समीक्षा), तरुणासाठी दासबोध (ललित), परखड तुकाराम (ललित), बहिणाबाईंची गाणी (संपादित)ही त्यांची इतर पुस्तके आहेत.

सोलापूरची अर्वाचीन साहित्यिक ओळख म्हणून कवी संजीव, कवी रा.ना. पवार आणि कवी दत्ता हलसगीकर या त्रयीकडे पाहिले जाते. नवकवी आणि साहित्याच्या अभ्यासकांच्या पाठीवर दत्ताजींचा नेहमीच प्रोत्साहनाचा हात असे. दत्ताजींच्या नावे महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर ही संस्था ‘ कविवर्य दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय श्रेष्ठ साहित्य पुरस्कार ‘ देत असते. अनेक नामवंत साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे.

मलेशियातील जागतिक मराठी साहित्य संमेलनात फक्त दत्ताजींच्या कवितांचा विशेष कार्यक्रम झालेला होता. कार्यक्रमानंतर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना स्टँडिंग ओवेशन दिले होते.

आकाशवाणी हीरक महोत्सवानिमित्त १९ मार्च २०१३ रोजी दत्ताजींवर ‘ शुभंकराचा सांगाती ‘ नावाचा कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यात त्यांच्या कवितांचे वाचन, गायन सादर झाले होते.

 दत्ताजींच्या वागण्या, बोलण्यात एक अंगभूत साधेपणा होता. तो शेवटपर्यंत टिकून होता. वास्तविक जीवनातही ते अगदी मोकळ्या मनाने एक ‘जिंदादिल’ माणूस म्हणून वावरले. जीवनातील आनंद कसा घ्यावा यावर त्यांनी खूप सुंदर भाष्य केलेले आहे ते त्यांच्या ‘वय’ या कवितेत.

☆ वय ☆

वय झाले असेल माझे नाही असे नाही,

अजूनही फुलांची निमंत्रणे येत असतात मला |

डोळ्यावरच्या चष्म्याच्याही पलीकडचा

हिरवागार बहारदार खुणावतोय मळा ||

 

तुकारामाचा अभंग उत्कट ओढ लावतो तरी

अजूनही आर्त गझलेची चढते नशा | दिवसभर मग्न असतो माझ्या व्यापात मी

रुमझुमणारे पैंजण बांधून अजून येते निशा ||

 

सगळेच ऋतू वेढून आहेत, वसंत तर सखा

मस्त कोसळणार्‍या पावसात अजून राहतो उभा

दरवळणारा सुगंध घेऊन भेटते लाजरी उषा

वेड लावते अजून मला नक्षत्रांची आभा ||

 

वय म्हणजे नक्की काय, वार्धक्याची व्याख्या काय

न बोलवताही आपण, येतच असते मरण

पैलतीरावर नजर तरी जत्रेत रंगलो आहे

झुलते माझ्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण ||

 

असे हे मनाचे चिरतारुण्य त्यांनी शेवटपर्यंत जपले. कवितेच्या रचनात्मक स्वरूपावर हरखून न जाता आशयाशी प्रामाणिक राहायला हवं या विचारांवर ते ठाम होते. म्हणूनच ते सहजपणे लिहितात,

दारे उघडी ठेवली म्हणून फार बरे झाले

नाहीतर सडून गेलो असतो हवाबंद पोकळीत

उघड्या दारातून थोडीशी धूळ आली हे मान्य

वाऱ्यासवे सुगंधाच्या लाटाही आल्या झुळझुळत ||

रसिक मनाच्या दत्ताजींचा दृष्टिकोन खूप आशावादी होता. छोट्या छोट्या गोष्टीत जीवनातला आनंद शोधणारा होता. त्यात लढाऊ बाणा होता, तशीच फुलांची नाजूक गुंफण होती. ते म्हणतात,

जीवनात सारंच घडत नसतं आपल्या मनासारखं

नाही त्याचा नाद सोड, आहे त्याचा हात धर

जीवनावर प्रेम कर, जगणं फार सुंदर आहे

अमावस्येच्या रात्रीलाही नक्षत्रांच झुंबर आहे ||

ही त्यांची सदाबहार, सकारात्मक वृत्ती नीरस, कंटाळवाण्या नकारात्मकतेतून बाहेर काढणार आहे. असे हे विचारसंपन्न व्यक्तिमत्व ९ जून २०१२ ला आपल्यातून निघून गेले. जाता जाता ‘नेत्रदान’ करवून त्यांनी आपल्या शब्दांना कृतीची जोड दिली.त्यामुळे प्रतिभाशाली कवी बरोबरच सर्जनशील व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा दृढ झाली.
अनंताच्या प्रवासाला जाण्याआधी ऋणनिर्देश करताना ‘तुमच्यामुळेच’ या कवितेत ते लिहितात,

तुमच्यामुळेच अंधारातून सुखरूप चालत आलो

आणि सुरेख घराच्या दाराआड येऊन पोहोचलो

अशी किर्रर्र रात्र होती उरात होती भीती

तुमच्या शब्दातला उजेड घेऊन,उजेड होऊन आलो ||

समाप्त

(संदर्भ — गुगल)

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈