पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(१० मार्च.. कविवर्य कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन.. त्यांना ही स्मृतिसुमनांची आदरांजली.)

दि. २२ जानेवारी ९९ हा दिवस मी कधीही विसरणार नाही. तो दिवस म्हणजे आदरणीय कुसुमाग्रजांची आणि माझी अखेरची भेट!

नाशिकहून एक कार्यक्रम आटोपून परतताना, नेहमीप्रमाणे कुसुमाग्रजांचे दर्शन घेऊन निघायचे आम्ही ठरवले. तात्यांची तब्येत बरीच खालावली असल्याने शक्यतो त्यांना कुणाला भेटू देत नाहीत, असे ऐकले होते. दीर्घ आजारानंतर ते कसे दिसत असतील, याचा विचार करत, थोडं बिचकतच मी त्यांच्या खोलीत शिरले. “या S या S ” म्हणून त्यांनी, अर्ध्या तिरक्या पलंगावर पहुडलेल्या अवस्थेत, अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. त्यांची ती हसरी मूर्ती पाहून मनाला बराच दिलासा मिळाला. मी आणि सुनील त्यांना नमस्कार करून शांतपणे बाजूच्या खुर्च्यांवर बसलो. माझ्या मुलाने, आदित्यनेही नमस्कार केला.

“सध्या नवीन काय चाललंय? ” क्षीण आवाजात तात्यांनी विचारलं. मी म्हटलं. “अटलजींची ‘आओ फिरसे दिया जलाएँ’ या कवितेला चाल लावून मी रेकॉर्ड केलीय. ” तात्या म्हणाले, ” मग म्हणाना. ” एवढ्यात तात्यांच्या जवळचे एक सद्गृहस्थ काळजीने म्हणाले, “अहं. तात्यांना आता काहीही त्रास देऊ नका. आता काही ऐकवू नका. ” परंतु तात्या हसत हसत म्हणाले, ” अहो, तिचं गाणं ऐकणं म्हणजे आनंदच आहे. आणि तो आनंद घ्यायला आपल्याला काहीच हरकत नाही. म्हणू द्या तिला. “

मी गायला सुरुवात केली. शेवटचा अंतरा –

‘आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा

अंतिम जय का वज्र बनाने, नवदधिचि हड्डियाँ गलाएँ…. ” गाता गाता मी डोळे किलकिले करून माझा ‘व्हिडिओ ऑन’ केला. तात्यासाहेब प्रसन्न दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. मला धन्य धन्य वाटलं त्याक्षणी!

“वा, फारच सुंदर झालंय नि किती वेगळा आणि सुंदर विचार दिलाय अटलजींनी. अशाच चांगल्या कविता गात रहा… ” असा ‘आयुष्यभर जपावा’ असा आशीर्वाद त्यांनी मला दिला. दुसऱ्या कवीलाही मनमुराद ‘दाद’ देणाऱ्या या महाकवीला पहात मी नमस्कार केला.

कुसुमाग्रजांची पहिली कविता ‘खेळायला जाऊ चला’ व ‘मोहनमाला’ त्यांच्या वयाच्या १७व्या वर्षी प्रकाशित झाली. प्रत्येक प्रतिभासंपन्न कलाकाराला, त्याच्या सुरुवातीच्या काळात पाऊल टाकायला जर खंबीर आधार आणि प्रोत्साहन मिळालं तर त्याची झेप ही ‘गरुडझेप’ ठरू शकते. ‘रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य, डौलदार शैली, भव्य कल्पना, ज्वलंत भावना, मानवतेविषयीच्या प्रेमामुळे किंवा अन्यायाच्या चिडीमुळे प्रक्षुब्ध झालेल्या कवीमनाचा आविष्कार यांपैकी काही ना काही या कवितांत आपल्याला आकृष्ट करते आणि रातराणीच्या सुगंधाप्रमाणे आपल्या अंतर्मनात असणाऱ्या अनेक चिरपरिचित ओळींचा गोडवा जागृत होऊन आपण म्हणतो, “ही कुसुमाग्रजांचीच कविता आहे…. ’’ असं कुसुमाग्रजांविषयी, त्यांच्या ‘विशाखा’ या संग्रहाची प्रस्तावना अत्यंत प्रेमानं आणि गौरवपूर्ण लिहिणाऱ्या वि. स. खांडेकरांनी तात्यांमध्ये ‘स्वधर्म’ या कवितेचं बीज तर पेरलं नसेल? ‘स्वधर्म’ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात;

‘दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण शामलता

गुण गगनाचा निराकारता, मेघाचा गुण व्याकुळता…

तसेच आहे मी पण माझे, तयासारखे तेच असे

अपार काळामध्ये, बनावट एकाची दुसऱ्यास नसे. ‘

आणि तेच वैशिष्ट्य खांडेकरांनी उद्धृत केलंय. योगायोग म्हणजे ‘ज्ञानपीठ’ पारितोषिकाचे मराठीतील पहिले मानकरी वि. स. खांडेकर आणि दुसरे खांडेकरांना ‘गुरुस्थानी’ मानणारे कुसुमाग्रज!

तात्यासाहेबांनी माझ्याही आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा दिली. माझ्या आयुष्यात ते ‘दीपस्तंभ’ ठरले. बऱ्याच वर्षांपूर्वी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संतांना ‘जनस्थान पुरस्कार’ मिळाला. त्यादिवशीचे गाणे ऐकून मला, माझे पती सुनीलना व नाशिकच्या बाबा दातारांना (माझ्या सर्व कॅसेट्सचे प्रायोजक) बोलावून त्यांनी स्वत: निवडून दिलेल्या इंदिराबाईंच्या व स्वत:च्या कवितांना चाली लावून, कॅसेट करायची अत्यंत मानाची आणि मौलिक जबाबदारी आमच्यावर सोपवली. प्रखर राष्ट्रप्रेमाइतकेच मराठीवर जाज्वल्य प्रेम करणा-या या महाकवीनं मराठीतील नितांत सुंदर कवितांची मणिमौक्तिकंच माझ्या ओंजळीत दिली.

“मातीचे पण तुझेच हे घर, कर तेजोमय, बलमय सुंदर,

आत तुझे सिंहासन राहे, ये *क्षणभर ये, म्हण माझे हे,

फुलवी गीते सुनेपणावर…….

तिमिराने भरल्या एकांती, लावी पळभर मंगल ज्योती

प्रदीप्त होऊनि धरतील भिंती, छाया तव हृदयी जीवनभर…….! ” असाच आशीर्वाद देऊन कुसुमाग्रजांनी माझा प्रवास पवित्र, अधिक आनंददायी, सुखकर आणि तेजोमय केला.

या मिळालेल्या मणिमौक्तिकांमधून घडलेला पहिला दागिना म्हणजे ‘रंग बावरा श्रावण’ – (निवड कुसुमाग्रजांची – भाग १ ध्वनिफीत) व दुसरा, भाग २ म्हणजे ‘घर नाचले नाचले’ ही ध्वनिफीत ते असताना पूर्ण होऊ शकली नाही, याची राहून राहून खंत वाटते. तरी त्यांच्या आवडीच्या कविता, कॅसेटद्वारे साहित्याच्या पूजकांकडेच नाही, तर जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत पवित्र काम हाती घेतल्याचं आज समाधान आहे.

तात्यांनी ‘रंग बावरा श्रावण’चा प्रकाशन समारंभ इंदिराबाईंच्या प्रति आदर व्यक्त करण्याकरता, इंदिराबाईंच्या बेळगावलाच जाऊन करा, असा सल्ला दिला. असे विचार म्हणजे, एका महान कलावंताने दुसऱ्या महान कलावंताचा केलेला सन्मानच! आम्हीही एखाद्या लग्नसमारंभापेक्षाही जास्त थाटात हा सोहळा २३ ऑगस्ट ९७ रोजी साजरा केला. त्यावेळी ‘बेळगावसारख्या टाकलेल्या शहरात, तू आमचीच आहेस हे अत्यंत प्रेमानं सांगायला ही सारी मंडळी दुरून इथं आलीत आणि आज कुबेराचा सन्मान आहे की काय; असं वाटतंय, ’ अशा भावपूर्ण शब्दांत इंदिराबाईंनी आपला आनंद व्यक्त केला. ही सर्व बातमी तात्यांना त्यांच्या सुहृदांकडून कळली. त्यानंतर मी पुन्हा नाशिकला गेल्यानंतर, त्यांनी आमचे आनंदाने स्वागत केले….. ‘या S S, बेळगाव जिंकून आलात म्हणे, ‘ अशी अत्यंत मायेनं माझी पाठ थोपटली आणि मला एव्हरेस्टचं शिखर चढून आल्याचा आनंद झाला. केवढं सामर्थ्य त्यांच्या स्पर्शात! ‘स्पर्श’ म्हटला कि तात्यांची’कणा’ ही विलक्षण ताकदीची कविता आठवते. गंगामाईमुळे घर वाहून खचून गेलेल्या नायकाला, त्याक्षणी पैशाची गरज नसते; गरज असते फक्त ‘सरांच्या’ आश्वासक आशीर्वादाची. तो म्हणतो,

‘मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून, नुसतं लढा म्हणा…. ‘

या ओळी कधी कठीण प्रसंगी आठवल्या तरी अंगात तानाजीचं बळ येतं. ‘सरणार कधी रण… ’ म्हणताना बाजीप्रभू संचारतो अंगात! पण अशा अनेक कल्पना वाचून बुद्धी अवाक् होते.

गेल्या १० मार्चला तात्यासाहेब गेल्याची बातमी ऐकून धस्स झालं. मराठी भाषेचे ‘पितामह’ ज्यांना म्हणता येईल असं वादातीत व्यक्तिमत्व – तेजोमय नक्षत्रांचं आश्वासन – निखळून पडलं. ताबडतोब आम्ही नाशिकला पोहोचलो. तिथं बाहेरच्या अंगणात त्यांचं’पार्थिव’ सुंदर सजवलेल्या चबुतऱ्यावर ठेवलं होतं. त्यामागे मोठ्या अक्षरात पाटी होती,

“अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्, मला ज्ञात मी एक धूलीकण

अलंकारण्याला परी पाय तूझे, धुळीचेच आहे मला भूषण…..! ” ही अक्षरे पाहून वाटलं, पृथ्वीचे प्रेमगीत लिहिणारा पृथ्वी होऊन – 

‘गमे कि तुझ्या रुद्र रूपात जावे,

मिळोनी गळा घालूनिया गळा… ’ असे म्हणत सौमित्राला त्याच्या तीव्र ओढीनं भेटायला तर गेला नसेल?

त्यांचं ते अतिशांत स्वरूप पाहून मला, शेजारच्याच पायऱ्यांवरती उभे राहून –

‘आकाशतळी फुललेली, मातीतील एक कहाणी

क्षण मावळतीचा येता, डोळ्यांत कशाला पाणी…

हे गुणगुणणारे तसंच,

‘ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातील एक विराणी,

गगनात विसर्जित होता, डोळ्यांत कशाला पाणी… ‘

हे तत्वज्ञान भरलेलं अंतिम सत्य कुसुमाग्रज स्वत: सांगताहेत, असाच भास झाला. ‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी… ‘ हे विचार आचरणात आणणं तर सोडाच, परंतु सुचणेसुद्धा किती कठीण आहे, हे त्याक्षणी जाणवले आणि या महामानवाची प्रतिमामनात उंच उंच होत गेली.

दुसऱ्या दिवशी गोदाकाठ साश्रुनयनांनी निरोप देण्याकरता तुडुंब भरला होता. लहान-मोठी, सारी मंडळी, प्रत्येक मजल्यावर, गच्च्यांवर, झाडांवर बराच वेळ उभी होती. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ मधून क्रांती नसांनसांत उसळवणारा, सामाजिक जाणिवेचा ओलावा असणारा, माणुसकी जपणारा, ‘नटसम्राट’सारखं कालातीत नाटक लिहिणारा, कादंबरी, लघुकथा, काव्य, लघुनिबंध, अशा अनेक क्षेत्रांत स्वच्छंद संचार करणारा, संयमी कलाकार आणि मला ‘स्वरचंद्रिका’ हा अत्यंत सन्मानाचा मुकुट चढवणारा ‘शब्दभास्कर’ अनंतात विलीन झाला… गगनात विसर्जित झाला. मला मराठीची गोडी लावणाऱ्या, वैभवशाली करणाऱ्या महामानवाला पाहून बराच वेळ मी आवरून धरलेला बांध फुटला…

“एकच आहे माझी दौलत, नयनी हा जो अश्रु तरंगत

दुबळे माझे ज्यात मनोगत, तोच पदी वाहू

मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव..

काय तुला देऊ.. ’’

असं मनात म्हणत, मी या नाशिकच्या ‘श्रीरामा’च्या चरणी पुष्पहार वाहिला आणि शेवटी हारातली दोन सुटी फुलं घरी घेऊन आले…. आठवणी कायमच्याच जपून ठेवण्यासाठी!

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments