सुश्री नीता कुलकर्णी
☆ “लोखंडी काॅट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी एकंदरीत सर्वच समाज साधा मध्यमवर्गीय असा होता. अर्धे अधिक लोकं गरीबच होते. घरं बैठी साधी लहान लहान दोन- तीन खोल्यांची असायची. तेव्हा लोकं आहे त्यात सुखासमाधानात, काटकसरीत राहणारी असायची. घरात दहा-बारा लोकं सहज असायचे. इतके जण असुनही घरात एकचं लोखंडी कपाट असायचे, ज्याला सगळेच ” गोदरेजचे कपाट ” म्हणत असत. त्यात घरातल्यांचे चांगले कपडे ठेवलेले असायचे.
घरातलं सगळ्यांत मुख्य एकमेव फर्निचर म्हणजे… ” लोखंडी कॉट” असायची.
तिचा अनेक प्रकारे उपयोग व्हायचा. त्या कॉटवर एकावर एक गाद्या ठेवलेल्या असायच्या त्या सुद्धा दोन किंवा फारतर.. तीन असायच्या. घरातला कर्ता पुरुष कॉटवर झोपणार हे ठरलेले असायचे. बायका तर कधीच कॉटवर झोपायच्या नाहीत. खाली सतरंजीवरच झोपायच्या.
शर्टाची घडी घालून गादीखाली ठेवली की झाली इस्त्री… कारण तेव्हा क्वचितच कोणाकडे इस्त्री असायची.
काॅटखाली लोकं लोखंडी ट्रंक, लाकडी पेट्या ठेवतं. त्यात कागदपत्रांची एक पेटी असायची. स्वेटर, मफलर, टोप्या अशा कधीतरी लागणाऱ्या गोष्टी ट्र॔केत ठेवत असत.
नेहमी न लागणारं सामान गाठोड्यात बांधून ती गाठोडी पण कॉटखाली ठेवलेली असायची.
आणि खालचा हा सगळा पसारा दिसू नये म्हणून खालची बाजू झाकायला जुन्या साडीचा एखादा पडदा केलेला असायचा.. तो लावलेला असायचा.
चादरी काही ठिकाणी गादीखाली ठेवलेल्या असायच्या. उशा कॉटवर एका बाजूला भिंतीला लागून रचून ठेवलेल्या असायच्या. जरा धक्का लागला की त्या पडायच्याच. … मग आई रागवायची…
प्रत्येक घरी असंच असायचं.. त्यामुळे कोणाला त्याची लाज वाटायची नाही. काही कार्यक्रम असला की घरातली ती काॅट घडी करून ठेवता येत असे. तेव्हा घर एकदम मोठे वाटायचे. ती बाहेर अंगणात ठेवली जायची.
पन्नास वर्षांपूर्वी माझं लग्न झालं तेव्हा पहिली खरेदी म्हणजे यांनी मोठी, भक्कम अशी लोखंडी कॉट घेतली. तेव्हा फार आनंद झाला होता. खूप मोठी खरेदी केली असं वाटत होत. कारण तेव्हा पगार अगदी कमीचं होता. काॅटला कडेला छान गोल असे बार होते. त्याला टेकवून तक्या ठेवला की पाय पसरून आरामात बसता येत असे. दर दोन वर्षांनी हे त्याला रंग देत असत. वापरातल्या वस्तूंची नीट काळजी घेऊन जपून, सांभाळून ठेवायच्या असा नियमच होता. आणि तो बहुतेक वेळा पाळला जायचा.
आमची बदली माढा, उदगीर, उस्मानाबाद, मुरुड, पुणे आणि सांताक्रुज मुंबई येथे होत गेली. या सगळ्या प्रवासात ती कॉट आमच्याबरोबरच होती. डबल बेड घेतले तरी ती कॉट काढायचा विचार कधीच मनात आला नाही. मुंबईला सांताक्रुझला बँकेचे क्वार्टर होते. तिथे वर गच्चीत काॅट ठेवली होती. आम्ही मैत्रिणी काॅटवर बसून गप्पा मारत असू…
हे रिटायर झाल्यानंतर आम्ही पुण्याला आलो. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. तिथे पण गच्ची होती. मग ती काॅट गच्चीत ठेवली. नातवंडांनी त्या कॉटचा चांगला उपयोग केला. आता रंग द्यायचं काम त्यांच्याकडे होतं. पण दोघं अगदी उत्साहाने दर दोन वर्षांनी कॉटला रंग देत असत. त्यामुळे इतकी वर्ष
होऊन सुध्दा कॉट अगदी छान होती. आमची डबा पार्टी त्या कॉटवर होत असे. नातू सतरंज्या, गालीचा, ऊशा घेऊन वर जायचा. तक्या ठेवायचा. काॅटवर झोपायला त्याला फार मजा वाटायची.
या काॅटचा पुरेपूर आनंद आम्ही घेतला. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगचे री डेव्हलपमेंट होणार म्हणून ती जागा सोडावी लागणार होती.
तेव्हा आता या काॅटच काय करायचे? … हा विचार मनात आला.
तेव्हा अश्विनीला भाचेसुनेला विचारले. कारण त्यांचा बंगला आहे. ती म्हणाली, ” मामी ती कॉट मी नेते “
ती नेते म्हणाली याचा मला फार आनंद झाला. टेम्पो आणुन ती काॅट घेऊन गेली. आता काॅट तिच्या गच्चीत आहे. त्यावर बसून तिचा अभ्यास चालू असतो.
पन्नास वर्षाच्या संसारात साथ दिलेली काॅट योग्य स्थळी गेली असे मला वाटले.
सहवासात असलेल्या या गोष्टी निर्जीव नसतातच… त्यांच्यात आपला जीव गुंतलेला असतो.
आपण आयुष्यभर वापरलेल्या वस्तूंची मनात असंख्य आठवणींची साखळी असते…. ठेव असते.
या आठवणींचा मनात एक हळवा.. सुखद असा कोपरा असतो. तो असा मधूनच उघडायचा…
मग त्यांच्या आठवणीत आपले आपण दिवसभर रमुन जातो…. घरी बसून मिळणारा हा सहज सोपा आनंद उपभोगायचा….
तुमच्याकडे होती का अशी कॉट? आल्या का काही आठवणी? …
आता आपलं ठरलंच आहे … अशा गोष्टीत रमायचं…
… त्याचा मनाने पुन्हा एकदा अनुभव, आनंद, आस्वाद घ्यायचा… हो की नाही…
… मग कळवा तुमच्या आठवणी…
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
पुणे
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈