श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

“गुजराण ते समृद्धी…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“तुला काय हवंय -गुजराण, उपजीविका, चरितार्थ, सुखवस्तूपण, संपन्नता, वैभव की समृद्धी?“

— गेली १२ वर्षं हा प्रश्न मी विद्यार्थ्यांना विचारत आलो आहे. मी हा प्रश्न विचारला की, मुलंच काय पण पालकांचीही दांडी गुल होते.

१) अमुक व्यक्तीची कशीबशी गुजराण चालायची.

२) अमक्या व्यक्तीचा पडेल ते काम हाच काय तो उपजीविकेचा मार्ग होता.

३) दिवसभर काम करून जे काही पैसे मिळत त्यावरच त्याचा चरितार्थ चालायचा.

४) नोकरी चांगली असल्यामुळे खाऊन-पिऊन सुखी आहे.

५) घसघशीत पगारामुळे अमक्याच्या घरी संपन्नता आहे.

६) उत्तम करिअर झाल्यामुळे अमुक अमुक माणूस वैभवात राहतोय.

७)योग्य शिक्षण आणि कष्ट यांच्यामुळेच अमक्याच्या घरी समृद्धी नांदतेय.

ही वाक्यं आपण अनेकदा ऐकली असतील आणि वापरलीही असतील. पण या वाक्यांच्या मधून जो अर्थ ध्वनित होतो, त्याच्या खोलात जाण्याचे कष्ट आपण सहसा घेत नाही.

आपली मराठी भाषा तर इतकी समृद्ध आहे की, ‘आर्थिक परिस्थिती चांगली नाही’ या करितासुद्धा अठरा विश्वे दारिद्र्य, विपन्नावस्था, दरिद्रीनारायण, बेताची परिस्थिती, हातातोंडाची गाठ, कोंड्याचा मांडा करून खाणे, खिसा कायम फाटकाच, दोनवेळची चटणीभाकरी खाऊन राहणे असे अनेक शब्दप्रयोग वापरले जातात. पण शिक्षण, जीवन जगण्याचा मार्ग आणि हे शब्दप्रयोग यांचा फार घनिष्ठ संबंध आहे, असं माझं मत आहे.

“इंजिनिअर, डाॅक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, आर्किटेक्ट हेच पर्याय करिअर म्हणून का हवे आहेत?” असा बाॅल टाकला की, बहुतेकांचा कल हा आर्थिक परिस्थितीच्याच गणितांकडे झुकलेला दिसतो. पालक आणि मुलं दोघांनाही ‘पॅकेज’ या शब्दाची मोहिनी पडलेली आहे, हे स्पष्ट जाणवतं. पॅकेजचं हे मोहिनीअस्त्र फार फसवं आणि घातक असतं.

‘सायन्सला न जाणं म्हणजे महापापच आहे’ ह्या विचारसरणीची मुळं किती खोलवर गेली आहेत, हे जवळपास रोजच दिसत राहतं. काॅमर्स ला जाऊन सीए किंवा सीएस झाला नाही म्हणजे तो माणूस आयुष्यातच अपयशी आहे, असं माणसं अगदी सहजपणे बोलतात. शाळेतल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातली संतवाणी सरळसरळ ऑप्शनला टाकून द्यायची आणि आर्ट्सच्या विषयांना काडीचाही स्कोप नाही, असं गावभर सांगत फिरायचं, असाही उद्योग अनेकजण करतात.

दहावी-बारावीच्या मुलांचं करिअर आणि त्यांच्या पालकांची मतं यांचा धांडोळा घेतला की, मला हत्ती आणि सात अंधांची गोष्ट आठवते. गोष्टीतले सातही जण पूर्ण अंध असतात. पण करिअरची निवड करण्याच्या बाबतीत फरक फक्त इतकाच आहे की, मुलं आणि त्यांचे पालक दोघंही विनाकारणच स्वत:च्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेऊन हत्तीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतायत. वास्तविक पाहता, ह्या पट्ट्या डोळ्यांवर बांधून घेण्याची गरजच नाही. पण तरीही हे घडतंच. आपल्याला दृष्टी असूनही अंध करणाऱ्या ह्या पट्ट्या कुठल्या? 

पहिली पट्टी म्हणजे अज्ञान..

काहीही माहिती नसतानासुद्धा केवळ कल्पनेच्या आधारावरच स्वत:ची पोकळ, भ्रामक मतं तयार करणारी आणि निर्णय घेणारी मुलं-पालक या वर्गात मोडतात. अज्ञानामुळे यांचे निर्णय चुकतात आणि करिअरमध्ये अपयश येतं.

दुसरी पट्टी म्हणजे अर्धवट माहिती..

ह्या प्रकारची मुलं-पालक माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. पण, सविस्तर आणि खरी माहिती घेत नाहीत. त्यामुळे, खरं जग त्यांना दिसतंच नाही.

तिसरी पट्टी म्हणजे धनाढ्यतेचा अतिलोभ.. पैसा आणि त्यातून मिळणारी सुबत्ता एवढाच काय तो विचार करून कोर्स निवडणारे मुलं-पालक ह्या वर्गातले. ह्यांच्या लेखी ‘सब से बडा रूपैय्या’ हेच एकमेव सत्य असतं. त्यामुळेच, ह्यांना जगात केवळ श्रीमंत माणसंच दिसतात आणि श्रीमंत माणसांचं राहणीमानच दिसतं. पण त्या मागचे कष्ट, मेहनत जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा न करण्यामुळे करिअरविषयक निर्णय सपशेल फसतात आणि ह्यांचं नुकसान होतं.

चौथी पट्टी म्हणजे अंधानुकरण..

‘अमुक एकानं असं केलं आणि तो मोठा झाला म्हणून मीही तसंच करणार’ ही विचारसरणी केवळ धोकादायकच नाही तर मूर्खपणाची आहे. करिअरचा निर्णय घेताना अनुकरण आणि अंधानुकरण यांतला फरक न कळण्याएवढं कुणीच अपरिपक्व नसतं. पण तरीही स्पर्धेचं आणि स्टेटसचं भूत डोक्यात शिरलं की, विवेकबुद्धीचा पराजय होतोच.

पाचवी पट्टी म्हणजे स्वत:विषयीचे आणि जगाविषयीचे गैरसमज..

गैरसमज हे गैरच असले आणि अवास्तव असले तरीही ते निर्माण होणं थांबलेलं नाही. आपल्या लेखी एखादं क्षेत्र कमी महत्वाचं असू शकतं, पण याचा अर्थ ते खरोखरच तसंच आहे, असं नसतं. पुरणाच्या पोळ्या करून विकणं हे आपल्या लेखी लो प्रोफाईल असेल, पण वर्षाकाठी ५०₹ नग यानुसार दोन-दोन लाख पुरणपोळ्यांची विक्री करणाऱ्या उद्योजकांना लो प्रोफाईल कसं आणि कोणत्या आधारावर म्हणायचं? आपले गैरसमज आपलं प्रचंड नुकसान करत असतात, हे लोकांच्या लक्षातच येत नाही.

सहावी पट्टी म्हणजे दुराग्रह..

‘माझंच खरं’ ही धारणा यशस्वी करिअरच्या वाटेतला फार मोठा अडसर आहे. ‘सत्य काहीही असलं तरी मी मात्र बैलाचं दूध काढणारच’ या हट्टापायी चुकीचे निर्णय खरे करून दाखवण्याच्या नादात वेळ, पैसा, उमेद, कष्ट या सगळ्याच गोष्टी पणाला लावल्या जातात. हरल्यानंतर जो वनवास भोगावा लागतो त्याला अंत नसतो. योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन आणि व्यक्तीनं केलेलं योग्य मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी निरनिराळ्या असल्या तरी सारख्याच महत्त्वाच्या असतात.

गुजराण ते समृद्धी…

आधीचा घेतलेला निर्णय फसला किंवा चुकीचा ठरला हे कितीतरी आधी लक्षात येऊनसुद्धा जो वेळकाढूपणा होतो, तो अक्षम्य असतो. निर्णय घाईने घेणं जसं चूक तसंच त्यात नको तितका वेळ काढणंही चूकच.. !

अशा सात-सात पट्ट्या एकावर एक चढवून वावरायला लागल्यानंतर अपयशाशिवाय काय पदरात पडणार? अज्ञान, अर्धवट माहिती, धनाढ्यतेचा अतिलोभ, अंधानुकरण, स्वत:विषयीचे आणि जगाविषयीचे गैरसमज, दुराग्रह आणि आळस या सात पट्ट्या एक-एक करून उतरवायला सुरूवात केलीत की फरक दिसायला लागेल.

गुजराण, उपजीविका, चरितार्थ, सुखवस्तूपण, संपन्नता, वैभव आणि समृद्धी या सात अवस्थांमधला फरक करिअरची निवड करण्याआधीच समजून घेतला पाहिजे. डोळ्यांवरच्या सात पट्ट्या तशाच ठेवल्यात तर वरच्या चार अवस्था केवळ स्वप्नं पाहण्यापुरत्याच राहतील. आणि गुजराण, उपजीविका किंवा चरितार्थ एवढ्यापुरताच आपल्या आयुष्याचा आवाका मर्यादित राहील.

स्वत:करिता योग्य अभ्यासक्रम निवडला म्हणजे उत्तम करिअर झालंच, असं होत नाही. स्वत:मध्ये बदलही करावे लागतात. आतापासूनच स्वत:मधले दोष ओळखून त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू करा. जसजशा तुम्ही डोळ्यांवरच्या पट्ट्या उतरवत जाल तसतसा तुमचा ‘गुजराण ते समृद्धी’ हा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होत जाईल.

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments