सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? मनमंजुषेतून ? 

☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग दुसरा ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆  

आम्ही रहात होतो तेथेही स्वातंत्र्य चळवळीने भारावलेले काही तरुण तरुणी रहात होते. जवळच सेवादलाची शाखा होती. सर्व लहान मुलांना तेथे गोळा करून गाणी गोष्टी सांगितल्या जात. साने गुरुजींची, त्यांच्या विचारांची ही सेवादल शाखा होती. अनेक मैदानी खेळ इथे खेळायला मिळत. झेंडावंदन, देशभक्तीची गाणी शिकवली जात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेवादलाच्या शाखा हळूहळू बंद पडल्या. पण साने गुरुजींच्या विचाराप्रमाणे, ध्येयाप्रमाणे कार्य मात्र सुरू राहिले.

माझ्या लग्नानंतर एकदा घराच्या माळ्यावर सूतकताईचा चरखा दिसला. मी चौकशी केली तेव्हा समजले, तो माझ्या मिस्टरांचा, ‘माधव नारायण कुलकर्णी’ यांचा होता. ते सेवादलाचे कार्यकर्ते होते. साने गुरुजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी कोल्हापुरात राष्ट्रसेवादलाचे शाखा प्रमुख म्हणून उल्लेखनीय काम केले होते. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची ते एक आठवण सांगत. ध्वजारोहण कसे करावे, वंदेमातरम म्हणायला शिकवणे, तिरंगा हवेत लहरत ठेवण्याचे नियम शिकवणे वगैरे गोष्टींची माहिती लोकांना देण्याकरिता हे सेवादलाचे कार्यकर्ते गावागावातून जात. त्यात श्री. राम मुंगळे, श्री. बाबासाहेब बागवान, श्री.यमकनमर्ढे वगैरे मित्र असत. सेवादलाची गाणीही गायला शिकवले जाई. नंतरही बरीच वर्षे हे सर्व मित्र (‘ह्यांच्या सांगण्याप्रमाणे जवळजवळ पन्नास वर्षे) महिन्यातून एकदा एकत्र येत. स्थळ होतं, श्री. मोहनराव लाटकर यांचे ‘ओपल हॉटेल!’ त्यात श्री. चंद्रकांत पाटगावकर, बाबुराव मुळीक,इ. होते. हे सर्व श्री. एस्. एम्. जोशी, श्री. नानासाहेब गोरे, श्री. यदुनाथ थत्ते, श्री. आजगावकर आणि साधना परिवाराशी जोडलेले होते. देशभक्तीने भारावलेले हे प्रामाणिक कार्यकर्ते! बरेचसे प्रसिध्दी पराङमुख!! बाबुराव यमकनमर्ढे यांनी तर त्या काळात कोकणात जाऊन शाळा सुरु केली.

बालवयात ऐकले होते, स्वातंत्र्य मिळाले, चांगले दिवस येतील. लहानपणी काही दिवस रेशनवर धान्य मिळे. मिलो (तांबडा जोंधळा)मका, बटाट्याचे चौकोनी तुकडे… कापड सुध्दा रेशनवर मिळे. चीटाचे  कापड म्हणत. . याचेच कपडे शिवले जात. फ्रॉक, परकर-पोलकी, गल्लीतल्या सर्व मुलींची सारखी! आम्हाला गंमत वाटे!! गोर गरीब, सामान्य, श्रीमंत, सुस्थितीतील लोकांनाही तेच कपडे घालावे लागत. त्यावेळी साथीचे रोग होते. प्लेग, कॉलरा, टी. बी., देवी, इ. पालक चिंतेत असत. दंगलीही होत. सामाजिक वातावरण काहीसं असुरक्षित वाटे. तरीही शेजारी एकमेकांना मदत करत. लपंडाव, सागरगोटे, आंधळी कोशिंबीर असे अनेक देशी खेळ खेळण्यात मुलांना आनंद मिळे. वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके यांच्या वाचनाने विचार आणि जीवन समृद्ध होत असे.

आज विचार केला तर? अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो आहोत. तरी शेतकरी काळजी मुक्त नाही. कपडे, फळे, धान्य मुबलक आहे. अद्ययावत साधने, विज्ञान-तंत्रज्ञान यामुळे  सुधारणा झालेली आहे. परंतु संकटांचा ससेमिरा तसाच आहे. कोरोनाची महामारी, महापूरासारखी आस्मानी संकटे त्यात भर घालत आहेत. कोविड जीवाणूंचे नवीन प्रकार पाय पसरत आहेत. शासन व्यवस्था करत आहे. पण गरज आहे मनोबलाची, स्वच्छतेची, शिस्तीची! गरज आहे विश्वासाने एकमेकांना समजून देण्याची!! लहानथोरांना आधार देण्याची!! स्वतंत्र भारताची, स्वातंत्र्य देवीची ही मागणी, ही इच्छा आपण सर्वांनी मिळून एकजूटीने, निष्ठेने पूर्ण करायची आहे.

वंदेमातरम !!

© सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

फोन नंबर : 0738768883

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments