सुश्री मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ हे ईश्वरा – डाॅ.निलीमा गुंडी ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
हे ईश्वरा,
तुझ्या असण्याविषयीच्या
भोव-यात गुंतण्यापूर्वी
नि तुझ्या बासरीच्या सुरांनी
मोहित होण्यापूर्वी
विचारायचा आहे तुला
एक प्रश्न !
पुन्हा पुन्हा अवतार घेताना
एकदाही तू स्त्रीचा जन्म
कसा नाही घेतलास ?
तिच्या दुर्दैवाचे दशावतार
भोगायला का कचरलास ?
सोपे होते रे तुझे
कुब्जेला सुंदर करणे
नि द्रौपदीला वस्त्रे पुरवणे !
जगून तरी पाहायचे
त्यांचे अपमानित जगणे !
मोरपिसाच्या स्पर्शाने
बुजतात का क्षणात
सा-या जखमांचे व्रण ?
नि शिळा जिवंत होताच
सरते का रे ,
तिचे अपराधीपण ?
हे सर्वज्ञा,
जन्माचे रहस्य तूच
जिच्याकडे सोपवलेस,
तिच्या मनाचा थांग
तुला कसा नाही लागला ?
- डाॅ. नीलिमा गुंडी
संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मनाचा ठाव घेणारी कविता