मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुक्रवारचे गरम चणे…… ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? मनमंजुषेतून ?

☆ शुक्रवारचे गरम चणे…… ☆ श्री विजय गावडे ☆  

गेले ते दिन गेले. बालपणस्य कथा रम्य :

जे काय म्हणाल ते लागू पडेल त्या रम्य बालपणाला. त्या मंतरलेल्या दिवसांना. पावसाळा आला की मोठ्या प्रमाणेच आम्हा शाळकरी मुलांना सुद्धा श्रावण महिन्याची ओढ लागायची.  त्याच्या अनेक कारणामध्ये श्रावणी सोमवारची शाळा फक्त अर्धा दिवस असणे हे एक होतं.  तशी श्रावण महिन्यात सुट्ट्यांची रेलचेल असे.  गणपती बाप्पा च्या आगमनाची चाहूलहि श्रावण सुरु झाला की लागे.

श्रावणातील शुक्रवार हा  आम्हांला खूप आवडायचा. किंबहुना पावसाळ्यातील शुक्रवार म्हणजे तव्यावर भाजलेल्या खमंग चण्यांच्या मुठी तोंडात कोंबून साजरा करायचा  वार असायचा.  आंबोली चौकुळचा तो पाऊस त्या काळी खऱ्या अर्थाने कोसळायचा. साधारण होळी दरम्यान सुरु झालेला पाऊस गणेश चतुर्थी आली तरी न थकता आपलं अस्तित्व राखून असायचा. ‘ शिगम्यान पावस नी चवतीन गिम ‘ अशी मालवणी म्हणच प्रचलित होती त्यावेळी. अतिवृष्टीमुळे कित्येक वेळा शाळा अर्ध्यावरच सुटे. आमच्या आनंदाचं हेही एक कारण असे.  परंतु शुक्रवारी दुपार नंतर आम्ही वर्गात असलो की चणे विकत आणण्यासाठी पैसे गोळा केले जायचे. हि जबाबदारी मॉनिटर वर असायची. फक्त पाच पैसे वर्गणी देऊन मूठभर गरमागरम चणे बुक व्हायचे. आजूबाजूच्या घरातून तवा आणला जायचा. तात्पुरती चूल पेटविली जायची. दुकानातून एक, दोन किलो चणे आणले जायचे. चण्यावर मिठाचे पाणी शिंपडून ते खरपूस भाजले जायचे. हि सगळी कामे करतानाचा आमचा उत्साह कपडे ओले चिंब झाले तरी टिकायचा. घरी गेल्यावर पावसात उनाडक्या केल्या म्हणून आई कडून उत्तरपूजा बांधली जायची ती वेगळी. पण ‘शुक्रवारचे गरम चणे, कुणा हवे का फुसदाणे’ या मस्तीत असे कित्येक पावसाळी शुक्रवार आम्ही बालमित्र मैत्रिणींनी साजरे केलेले अजूनही स्मरणात आहे.

आता ते आठवलं की मनात चणे फुटतात आणि चणे न खाताही ती खरपूस चव जिभेवर रेंगाळते.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈