श्री उदय गोपीनाथ पोवळे
मनमंजुषेतून
☆ स्व बदल ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
नाही म्हणू नका,
काहीतरी करून दाखवूया
दुसऱ्याला नाही,
तर स्वतःलाच बदलून दाखवूया
फुटपाथ हा फक्त चालण्यासाठी असतो
फेरीवाले विक्रेते ह्यांच्या बापाचा नसतो
मान्य आहे,
रस्त्यातली खरेदी, वेळेची बचत करते
सर्व काही आपल्याला, स्वस्त्यात मिळते
अहो,
घाणीचे साम्राज्य, तिथेच तर पसरते
सवय आपलीच, शहराची दुर्दशा करवते
तुम्हीच नाही म्हणा, ते बसणार नाहीत
रस्त्यात आपला ठेला, ते मांडणार नाहीत
विचार करा,
विचार करा, आपल्या वरिष्ठ नागरिकांचा
रस्ता द्या हो त्यांना, त्यांच्या हक्काचा
नाही म्हणू नका,
काहीतरी करून दाखवूया
दुसऱ्याला नाही,
तर स्वतःलाच बदलून दाखवूया
सिग्नलचे पालन करून, शिस्तीचे धडे गिरवू
झेब्राच्या आधी, एका रांगेत गाडी थांबवू
नको तो हॉर्न, नको ती घिसाडघाई
मीच पहिला, अशी नको ती बढाई
उजव्या हाती आहे त्याला, पहिले जाऊ द्या हो
कोंडी न करता, इंधन आणि वेळ वाचवूया हो
गाडी पार्किंग करताना, दुसऱ्यांचा विचार करूया
वेगावर नियंत्रण ठेऊनच गाडी चालवूया
नाही म्हणू नका,
काहीतरी करून दाखवूया
दुसऱ्याला नाही,
तर स्वतःलाच बदलून दाखवूया
गावातील आपलेच बांधव, वणवण फिरतात
पाण्यासाठी अजूनही, त्यांचे हाल होतात
शहरात मात्र पाण्याचा, अति वापर करतात
आंघोळीला शॉवरखाली, तासनतास बसतात
पाण्याचे नियोजन करून, अपव्यय टाळूया
पावसाचे पाणी अडवून, बंधारे बांधूया
काहीही करून गावकऱ्यांना, दिलासा देऊया
श्रमदान करून गावांमध्ये, शेततळी बांधूया
नाही म्हणू नका,
काहीतरी करून दाखवूया
दुसऱ्याला नाही,
तर स्वतःलाच बदलून दाखवूया
झाडांची कत्तल करून, इमारती बांधतात
काँक्रीटची दाट जंगले, उभी रहातात
ऑक्सिजनची कमी होऊन, माणसे मरतात
माणसेच माणसाच्या मरणाला, जबाबदार ठरतात
झाडे लावून, जंगलांचे जाळे वाढवूया
जंगलाचे, वणव्यांपासून रक्षण करूया
निसर्गाशी मनापासून, जवळीक साधूया
वाढदिवस हा झाडे लावून, साजरा करूया
नाही म्हणू नका,
काहीतरी करून दाखवूया
दुसऱ्याला नाही,
तर स्वतःलाच बदलून दाखवूया
स्कुटर गाड्या चालवून, प्रदूषण वाढतंय
पब्लिक ट्रान्सपोर्टला, मात्र टाळ लागतंय
पेट्रोल डिझेलमुळे होतेय, पैशांची उधळण
अती वाहनांनमुळे होतेय, ध्वनी प्रदूषण
हॉर्न वाजवून कानाचे पडदे नका फाडू
संयम राखूनच रस्त्यावर गाडी चालवू
चालणे, सायकलवर, भर देऊन तर बघा
स्व स्वास्थाचा, विचार करून तर जगा
नाही म्हणू नका,
काहीतरी करून दाखवूया
दुसऱ्याला नाही,
तर स्वतःलाच बदलून दाखवूया
कचऱ्याचा प्रश्न, हा उभाच का रहातो
मुळात कचराच, आपण का बरे करतो
स्वच्छतेचे शिक्षण, हे शाळेतून मिळावे
घरात त्याचे, सगळ्यांनी धडे गिरवावे
कचऱ्याचे व्यवस्थित, नियोजन करूया
त्यापासूनच खताची, निर्मिती होऊ द्या
ओला आणि सुका ह्यांचे विभाजन करूया
घरातल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करूया
नाही म्हणू नका,
काहीतरी करून दाखवूया
दुसऱ्याला नाही,
तर स्वतःलाच बदलून दाखवूया
प्ल्यास्टीकवर वर बंदी घालून, जगायला शिकूया
काही अडत नाही, त्याशिवाय राहून तर बघूया
कापडी पिशवी घेऊनच खरेदीला बाहेर पडूया
देणारा देतो तरीही, प्लास्टिक पिशवीला नाही म्हणूया
अनेक पर्यायांपैकी चांगल्याची निवड करूया
पुढच्या पिढीचा विचार, करूनच वागूया
काही झाले तरी निर्धार पक्का करूया
प्लास्टिकला कायमचेच, राम राम म्हणूया
नाही म्हणू नका,
काहीतरी करून दाखवूया
दुसऱ्याला नाही,
तर स्वतःलाच बदलून दाखवूया
स्वतःशीच आरशात बघून, संवाद साधूया
स्वतःलाच मनापासून, समज देऊया
स्वतःशीच ठाम राहून, बदल घडवूया
स्वतःलाच बदलण्याची, एक संधी देऊया
दुसऱ्यात पहिले आपण, स्वतःला शोधूया
स्वतः कडूनच बदलाची, हमी घेऊया
नाही म्हणू नका,
काहीतरी करून दाखवूया
दुसऱ्याला नाही,
तर स्वतःलाच बदलून दाखवूया
स्वतःला नाही,
तर शहरालाच बदलून दाखवूया
शहराला नाही,
तर देशालाच बदलून दाखवूया——-
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
मो. नं. ९८९२९५७००५.
ठाणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈