मनमंजुषेतून
☆ आमची वैदेही…. ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆
नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली.. हा भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण! आणि आमच्या घरातही.. जन्मष्टमी म्हणजे “श्रीकृष्णाचा हॅप्पा” (हॅप्पी बर्थडे) म्हणून सकाळीच वैदेहीने तिच्या या “मित्राच्या” पूजेची तयारी केली.. सकाळीच देवासमोर बसून आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला “जन्मदिनमिदं…” म्हणून शुभेच्छा दिल्या, आणि मग घरातील देव्हाऱ्या व्यतिरिक्त असलेले बाळकृष्ण/श्रीकृष्ण गोळा करून देव्हाऱ्याशेजारी आपला वेगळा पाट मांडला, आणि आजोबांच्या बरोबर आमचीपण जन्माष्टमीची पूजा संपन्न झाली! (त्यात “दिवसभर सॉफ्ट कृष्ण सुद्धा हलवायचा नाही हं पूजेतून, आजी!” अशी मला दटावणी पण झाली)
साक्षात भगवंताचा हॅप्पा साजरा करणारी ही “सहज भक्ती” सर्वांनाच मिळावी हीच त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी आज जन्माष्टमी निमित्त प्रार्थना!
सौ. मेधा सहस्रबुद्धे
पुणे
मो 9420861468
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈