मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

मी लहान असताना आमच्या शेजारच्या घरमालकीण (जिला सगळे नानी म्हणत) त्या माझ्या नानीची ही एक आठवण. एकंदरीत चार भाडेकरूंची मालकीण होती तरीही ती घरातली सगळी कामं स्वतःच करायची आणि ते ही अगदी आत्मीयतेनं. आपण शिकलो नाही पण मुलांना शिकवायचंय तर पैसा साठवायला हवा ही जाणीव तिला होती. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे नानीच्या मनासारखी स्वच्छता, टापटीपपणा दुसऱ्या कुणाला जमणं अवघडचं.  स्वच्छतेचं तिला व्यसन होतं असं म्हटलं तरी चालेल. याची छोटी झलक तिच्या भांडी घासण्यात दिसायची. 

रोज रात्री अंगणात गोष्टी ऐकायची आमची वेळ आणि भांडी घासण्याची नानीची वेळ एकच असायची. त्यामुळे गोष्टीला आपोआपच बॅकग्राऊंड म्युझिक मिळायचं. अजूनही ते दृश्य लख्खं आठवतं. रात्रीचं जेवण झालं की नानी भांड्यांचा ढिगारा घेऊन अंगणात यायची. ढिगाराच असायचा. कारण एक तर माणसं जास्त असायची आणि त्यात नानीचं शाकाहारी जेवण आणि इतरांचं मांसाहारी जेवण यांची भांडी वेगळी असायची. मागच्या अंगणात दोन सार्वजनिक नळ होते त्यातल्या एका नळावर नानीचं भांडी घासण्याचं काम चालायचं. नानी भांडी घासता घासता गोष्टीत रस दाखवायची आणि मी तिच्या भांडी घासण्यात. 

कधीकधी गोष्ट नसेल तर माझ्या आणि नानीच्या गप्पा सुरू व्हायच्या. नानीला बोलायला खूप लागायचं. ती मला बोलतं करायची. शाळेतली एखादी गोष्ट सांग, अभ्यास केला का सांग, किंवा अजून काही खेळातली गंमत, मैत्रिणीशी भांडण झालं असेल तर असं सगळं काही त्या भांडी घासण्याच्या कार्यक्रमात बोलणं व्हायचं. 

पण कधीकधी तिचा मूड नसायचा. तेव्हा मी विचारायचे… 

“नानी आज तू बोलत का नाही?” 

“दमले आज मी”.  

“मग मी करते ना तुला मदत”.  

“कशाला पुढं बाईच्या जन्माला हे करावं लागतंच. आतापासून नको. त्यापेक्षा तू श्टोरी सांग.”

आणि मग मी तिला गोष्ट सांगायचे. पण माझं लक्ष गोष्टीपेक्षा नानीच्या भांडी घासण्यात अधिक असायचं. एकंदरीतच ती ज्या पद्धतीनं भांडी घासायची ते पाहून असं वाटायचं नानीचा या भांड्यांवर खूप जीव आहे.

एखादा माणूस पूजा जेवढ्या भाविकतेनं करतो ना तसं नानी भांडी घासायची. पूजेचं कसं एक तबक असतं… त्यात फुलं-पत्री, हळद-कुंकू आणि पूजेचे इतर साहित्य ठेवलेलं असतं तसं नानींच भांडी घासण्याचं सामान एका ताटलीत नीट ठेवलेलं असायचं. (हा! नानीच्या कुठल्याही अशा सामानाला हात नाही लावायचा नाही तर मग काय खरं नसायचं.) नारळाच्या शेंड्या, भांडी घासायची राख, चिंचेचा कोळ, थोडं मिठ  आणि एका मोठ्या भांड्यात गरम पाणी. असा सगळा जामानिमा घेऊन, नानी त्या त्या भांड्यांना त्या त्या पद्धतीनं स्वच्छ करायची. कुठलं भांडं, कसं साफ करायचं, तसंच का साफ करायचं अशा माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीला ती प्रेमानं तोंड द्यायची. आणि भांडी धुऊन झाली की त्यातलंच एक स्वच्छ ताट, मला देऊन म्हणायची,  

“बघ बरं, यात तुझा चेहरा सपष्ट दिसतो का?”

मी ते ताट हातात घेऊन चेहरा बघायचे आणि ‘हो’ म्हणायचे. मग नानीचा चेहरा खुलायचा. तेव्हा मला याची गंमत वाटायची. पण आज कळतंय तिला दिवसभराच्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटत असेल. 

लॉकडाऊनच्या काळात भांडी घासताना नानीची नकळत आठवण आली तशी मी लहान होऊन पुन्हा नानीच्या अंगणात गेले. नानीशी आणि तिच्या भांड्यांशी संवाद साधू लागले.

भांडी

किती निगुतीने घासत असते बाई

आपल्या घरातली भांडी, 

ती भांडी म्हणजे केवळ वस्तू नसतात; 

तर त्या असतात घरातल्या माणसांच्या ‘तृप्ततेच्या खुणा’. 

म्हणूनच माणसांच्या तऱ्हांप्रमाणेच ती ओळखत असते भांड्यांच्या ही तऱ्हा. 

त्यांच्या नितळतेसाठी चांगल्यातला चांगला साबण आणि चरा पडू न देणारी घासणी वापरते.

खरकटं काढून, स्वच्छ आंघोळ घालून, सुगंधी साबणाने घासून, धुवून काढते.

आणि काही वेळासाठी का होईना पण त्यांना पालथं निजवते.

दूध, तेल, तूप, या स्निग्धता जपणाऱ्या भांड्यांवर तर खास जीव तिचा.

ऊन ऊन पाण्याने त्यांचे सर्व अंग शेकून त्यांच्या ओशटपणाचा थकवा ती घालवून टाकते.

इतकंच काय, तिला माहीत असतात तांब्या-पितळ्याच्या भांड्यांच्याही व्यथा.

म्हणूनच त्यांना हाताळताना ती बोटभर का होईना चिंच आणि मीठ यांनी त्यांची दृष्ट काढते. 

मग त्यांच्या तेजस्वी रुपाने स्वतः च झळाळून उठते. 

किती निगुतीने घासत असते बाई, 

आपल्या घरातली भांडी, 

जाणून त्यांच्या तऱ्हा.

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈