मनमंजुषेतून
☆ रोमँटिक दळण ☆ प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
आपलं हे असं आहे.
आपण कशातही कधीही कधीच गुंतून पडत नाही…
संसारात तर बिलकूलच नाही.
भाजी,दळण,इस्त्रीचे कपडे, वाणसामान वगैरे वगैरे गोष्टी आणण्यासाठी आपला जन्मच झालेला नाही.
असं आपलं मी माझं मलाच समजावतो.
गेला बाजार माझी स्वतःचीच समजूत पटत नाही..
बायकोला काय पटणार…?
जरा कुठे निवांत सोफ्यावर सांडलेला दिसलो की…
बायकोला कसंसंच होतंय.
जा दळण आण.
जा ईस्त्रीचे कपडे टाकून ये..
ईस्त्रीचे कपडे घेऊन ये.
अर्धा किलो मैदा घेऊन ये…
भाजी आण.
जाऊ दे..
तुम्हाला सहन नाही व्हायचं.
सांगकाम्या झालोय मी आमच्या बिगबाॅसचा.
कालचीच दुपारची गोष्ट.
दोन ऊशा डोक्याखाली अन् दोन पायाखाली.
मी शेषाशायी मोडवर सोफ्यावर सांडलेलो.
रिमोट भरल्या गोलपोटावर.
नजर टीव्हीकडे.
डोळे मिटलेले.
ब्रह्मानंदी टाळी की का काय ते झालेलं…
एवढ्यात साहेब कडाडले..
जा दळण घेवून ये.
दहा किलो गहू दिलेत काल दळायला.
80 रूपये होतील…
मी दचकून जागा झालो.
सरपटत गिरणीच्या दिशेने.
आमच्या बिल्डींगखाली चौकातच गिरणी आहे.
पुण्याला शिफ्ट झाल्यापासून ईथंच ईथलंच दळण दळतोय.
गिरणीचं काम एकदम सिस्टीमॅटीक.
काऊंटरवर मार्कर ठेवलेला असतो.
दळणाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंना आपलं नाव टाकायचं..
मागाहून घोटाळा नको.
आपला नगरी बाणा.
आमची दळणाची एक पुश्तैनी पिशवी आहे.
नगरच्या कोहीनूर क्लाॅथ स्टोअरची.
लाल रंगाची, भलीमोठी, कापडी, दणकट, युनिक.
एकदम ओळखणेबल…
मार्करची आपल्याला गरजच पडलेली नाहीये.
गिरणीत कोहीनूरवाली पिशवी आपल्याशिवाय दुसर्या कुण्णा कुण्णाकडे नाहीये.
माझा फुरफुरणारा ओव्हरकाॅन्फीडन्स.
मी तडक गिरणीत धडकलो.
80रू मालकांच्या हाती टेकवले.
घरी परत.
कोहीनूरची पिशवी स्वयपाकघरात आदळली.
शून्य मिनटात सोफ्यावर आडवा.
जरा कुठे डोळा लागतोय तर…
केळकरांचं घर आपट्यांचं झालेलं.
नुसती आदळआपट, धूसफूस.
बिगबाॅस कडाडले…
“कुणाची पिशवी ऊचलून आणलीयेस ?
यात दहा किलो भाजणी आहे.
कुठं लक्ष…..”
चलता है.
मी परत गिरणीत.
असं कसं झालं ?
तिथं पोचतो अन्…
माझा खपली गहू झालेला.
जुन्या खपल्या.
आमच्या वर्गातली, हमारे जमानेवाली,
सगळ्यात सुंदर अप्सरा…
अजूनही तश्शीच.
हाय मै मर जावा.
काळजात ड्रिल मारल्यासारखं वाटलं.
अप्सरा आली…
हातात लाल कोहिनूरची पिशवी घेऊन.
ती कनफ्युजलेली तिथं ऊभी.
गिरणीवाल्यानं मला ऊसासारखा सोलला.
तिकडे लक्ष न देता ती म्हणाली…
“तू ईकडे कुठे ?
किती वर्षांनी भेटतोयस ?
आमचीही दळणाची पिशवी सेम टू सेम.
तेवढीच माहेरची आठवण.
बरं झालं कोहिनूरच्या लाल पिशवीनं घोटाळा केला,
अन् तू भेटलास..
कसा आहेस ?”
ती नुकतीच मुंबईहून ईथं शिफ्ट झालेली.
ऊभ्या ऊभ्या गप्पा.
सेल नं. ची देवाणघेवाण.
‘ ये ना घरी ‘ ची नाजूक विनंती.
ठार मेलो..
दळण इतकं रोमँटिक असेल असं वाटलंच नव्हतं कधी..
ठरलं—-
आजपासून कधीही कुठल्याही संसारिक कामाला नाही म्हणायचं नाही.
आपल्या वर्गात साडेनऊ सुंदर अप्सरा होत्या..
आज गिरणीत एक भेटलीये.
न जाणो ऊद्या मातीगणपतीपाशी भाजीवाल्याकडे दुसरी—-
आशाँए—-
अवघाची संसार…
सुखाचा करीन—–
प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला
(*माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈