सौ कुंदा कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ अहो आश्चर्यम् ! ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
ज्येष्ठा कनिष्ठा गौरी बद्दल खूप माहिती आपल्याला मिळत आहे. एक अनुभव सांगते. सांगलीला होतो आम्ही त्यावेळेस. वाड्यात बरीच बिर्हाड होती. त्यात माझ्या मामी पण राहत होत्या
मामीकडे सुगडाच्या गौरी होत्या. झोकात गौरी हळदी कुंकू झाले. दुसरे दिवशी विसर्जन पण झाले. मामी म्हणाल्या, “ सगळ्या आमच्या घरी या. तुम्हाला गौरीचा चमत्कार दाखवते.”
त्या म्हणाल्या, “ आज विसर्जन केले तरी गौरीचं अस्तित्व घरात असतं. तिला खेळायचं असतं.” त्यांनी आपले दोन अंगठे जमिनीवर हात ठेवून उभे केले. समोर एका सवाष्णीला बसवून तिला पण त्यांच्या प्रमाणे दोन अंगठे उभे करायला सांगितले .आणि चार अंगठ्यावर ती सुगडाची गौर म्हणजे सुगडच ठेवायला सांगितले. त्या म्हणाल्या, “ आता तुम्ही फक्त यात अक्षत टाका आणि तुमची इच्छा बोला .जर इच्छा पूर्ण होणार असेल, तर गौर उजवीकडे फिरायला लागेल व नसेल तर डावीकडे फिरेल—–.
——-आणि अहो आश्चर्यम् !— प्रथम मीच त्या गौरीवर अक्षत टाकली आणि माझी एक इच्छा बोलून दाखवली आणि अक्षरशः 4 अंगठ्यांवर ती सुगडरुपी गौर उजवीकडून गरगर गरगर जोरात फिरायला लागली. नंतर दुसरी इच्छा बोलून दाखवली. अक्षत टाकून मनातल्या मनातच मी काही विचारले. आणि गौर डावीकडे जोरजोरात फिरायला लागली. फक्त चार अंगठ्यावर ती उभी होती. मग हळूहळू वाड्यातल्या सगळ्या जमल्या. आणि दीड तास हा खेळ रंगला. नंतर मामी म्हणाल्या, “ आता गौर दमली, आता बास करा. कुणीतरी अक्षत टाकली आणि म्हटले,” गौरी माते खूप खेळलीस, दमलीस आता तुझ्या तुझ्या घरी जा.” त्यानंतर ती जागच्या जागीच हलली आणि शांत झाली. पुढे कितीही अक्षत टाकून कोणी काही विचारले तरी ती सुगडरुपी गौर अजिबात हलली नाही. हे स्वतः आम्ही अनुभवले आहे .
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈