श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मनमंजुषेतून
☆ जातीअंतासाठी – भाग 2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
(त्यांच्या मते त्यांनी एक चांगला विनोद केला होता.) इथून पुढे —-
मी सगळ्यांचं ऐकलं नि माझं म्हणणं माडलं–“आत्ता प्रश्न जातीचा नाहीये. गुणवत्तेचा आहे. हा तरुण मुलगा हुशार आहे. वडील लवकर गेलेत, आईने मोलमजुरी करून संसार पेललाय, चांगले संस्कार केलेत , त्यांचे मार्क्स बघा. त्यांनी शिकताना इंग्रजीच्या शिकवण्या घेतल्या आहेत. ते हार्मोनियम उत्तम वाजवतात. त्यांना संगीताची जाण आहे. गावातल्या भजनी मंडळांना, धनगरी ओव्यांना साथ करायला ते जातात. आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम बसवायला बाहेरचे वादक बोलवायला लागतात, त्याना पैसे द्यावे लागतात. (पैसे हा शाळेचा वीक पॉईन्ट असतो ना.) ते काम ह्यांच्याकडे सोपवता येईल. इतर सगळ्या उमेदवारांपेक्षा हयांची गुणवत्ता सर्व बाबतीत सरस आहे. केवळ त्यांची जात आपल्याला नको म्हणून त्यांना नेमायचं नाही का? म्हणजे रोष्टरचं बंधन आहे म्हणून ,नाहीतर खालच्या जातींवर आपण अन्यायच करणार का? हे मला बरोबर वाटत नाही. माझं ऐका प्लीज, ह्यांना नेमू या “. बरीच वादावादी झाली. भांडलेच जवळजवळ. ठाम राहिले. काहीना माझं बरोबर वाटलं. नि झाली एकदाची माझ्या आवडत्या शिक्षकाची निवड. ती योग्य ठरली. २-३ वर्षांतच, मी निवडलेले शिक्षक मुलांचे आवडते झाले. दरवर्षी समूहगीत स्पर्धेतलं जिल्हा पातळीवरचं पहिलं बक्षिस आमची शाळा पटकाऊ लागली. ‘ उषःकाल होता‘ अशी अवघड गाणी त्यानी पंचवीस-तीस मुलांच्या समूहामध्ये बसवली. वेगवेगळ्या जातीधर्माची मुलंमुली एका सुरांत गाताना ‘एक ह्रदय’ झाली. आसपासच्या शाळा त्यांना बोलावू लागल्या. मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन ते जातात. त्यावेळी बुडलेले तास ते जादा तास घेऊन भरून काढतात. मुलांच्या अभ्यास- विषयांचं महत्त्व ते जाणतात. कर्तव्य तत्पर आहेत ..नीतीमान आहेत. आता तर म्हणे त्यांनी काही पुरस्कारही मिळवलेत ‘ आदर्श शिक्षक ‘ म्हणून. शाळेतल्या मुलांचा कार्यक्रम त्यानी दूरदर्शनवरही सादर केला.
पंधरा वीस वर्षांपूर्वी, सहजपणे, जातीभेद मानणाऱ्या संस्थाचालकांशी (मुख्याध्यापकांचं सर्व्हिस बुक वगैरे त्यांच्या हातात असतं तरीही) झगडून मिळवलेलं ते अगदी छोटसं यश मला समाधान देऊन गेलं आहे.
‘Destiny of the nation is being shaped in the classroom.’ हे लक्षात घेऊन शिक्षकांनी वर्गात, शाळेत, जातीअंतासाठी प्रयत्न केले तर थोडे तरी यश येऊ शकते.
जवळपास एखादी सहल निघते. फिरून झाल्यावर मोठा गोल करून डबे खायला बसायचं. शिक्षकांनी मध्ये गोल करावा. वेगवेगळ्या मुलांसमोर हात करावा. मुलं आपल्यातलं शिक्षकांना तत्परतेने देतात. कोणत्याही जातीच्या मुलाने दिलेलं खावं. ‘ मस्त झालय ‘ म्हणावं. आपले शिक्षक आपण दिलेलं पण आवडीने खातात , हे बघून मुलांना ब्रम्हानंद होतो.
हल्ली बऱ्याच शाळांचे माजी विद्यार्थी गेट-टुगेदर करतात. लहानपणचे भिन्न जातीतले असलेले मित्रमैत्रिणी पुन्हा एकत्र येतात. तेव्हा जात लक्षात ठेवली तर वाईट दिसेल म्हणून मनात आलं तरी दाखवलं जाणार नाही. अशी संमेलनं करायला हवीत.
एखादा मुलगा किंवा मुलगी आजारी असते. त्याची जात कोणतीही असली तरी शिक्षकांनी त्याच्याकडे बघायला जावं. बरोबर तीनचार विद्यार्थ्यांना न्यावं. सर ,बाई जात पाळत नाहीत हे मुलांना कळतं . मुलं नेहमीच शिक्षकांचं अनुकरण करतात. मुलांच्या मनावर ते ठसतं. आमची खारेपाटणची शाळा नवीन निघाली होती. स्वातंत्र्य सैनिक शंकरराव पेंढारकर–’ आता स्वराज्य मिळालं, पण ते सुराज्य व्हायला हवं. त्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा,’ म्हणून त्यांनी ‘ शिक्षणातून पुनर्रचना ‘हे ध्येय ठरवलं. खारेपाटणसारख्या अगदी लहान गावात ते आले. त्या जुन्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांवर जातीभेद न पाळण्याचे संस्कार युक्ती युक्तीने केले. कारण समाजाला दुखवून चालणार नव्हतं. आंबेडकर जयंतीला आम्ही गावाबाहेरच्या वस्तीतल्या झोपड्या स्वच्छ करायला जायचो. पर्युषण काळात बस्ती सजवायचो, गणपती उत्सव , नवरात्र ह्या गावातल्या सार्वजनिक सणांना आम्ही गावकऱ्यांना मदत करायचो, श्रमदानातून भेदाभेद न पाळण्याची सवयच लागली आम्हा त्या काळच्या मुलांना. एक खेडवळ बाई म्हणाली, ” पोरानो, सर सांगतात तसा वागा. कोणाक भिवुचा नाय. लोका काय, चार दिवस कावकाव करतंत. मगे गपचुप बसतंत.” प्रयत्न केले तर अडाणी सुध्दा शहाणी होतात ती अशी.
जातीअंतासाठी मानअपमान मात्र बाजूला ठेवावा लागेल.
आम्ही बरीच वर्षं श्रावणातल्या, गौरीच्या, सवाष्णी म्हणून वेगवेगळ्या जातीच्या बायकांना बोलावतो. त्यांची रीतसर ओटी वगैरे भरतो. त्यांना छान वाटतं. आम्हालाही समाधान वाटतं.
अशा अनेक गोष्टी करून पाउलं पुढेच पडतील, मागे तर नक्कीच जाणार नाहीत.
समाप्त
लेखिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070, 9561582372.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈