सौ. सुचित्रा पवार
मनमंजुषेतून
☆ एक स्टाफ रुम ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
शुभ्र आच्छादनाखाली निश्चेष्ट, प्रेतवत पहुडल्या गाद्या उचलताना
तो मिश्किल हसत रहातो —-
इतस्ततः पसरलेल्या कागदी बोळ्यांना, चुरगळलेल्या कागदी कपांना
शेंगांच्या फोलांना अन फळांच्या सालींना
प्रश्न एक विचारतो —-
“घरेही यांची अशीच असतात का ? स्वच्छतेचे धडे देणारे गुरू न गुरुमाऊली
सार्वजनिक स्वच्छतेचे धडे स्वतः गिरवत नसतात का ?—-
कुबट गाद्या कुत्सित हसून साक्ष देतात—
डेस्कवरील चहाचे चिकट डाग ओठ गच्च मिटतात !
पांचट विनोद ,राजकारण अन गावगप्पांचे आवाज हिंदळत राहतात भिंतीवर —-
ऑफ तासाला चघळत नाहीत कुणी– विद्यार्थ्यांचे जटील प्रश्न जिभेवर !
चटकदार खमंग वास अधून मधून दरवळतात भिशी पार्टीचे—
चघळत असतो कुणी शिष्य–डब्यातले कोरडे घास चटणी भाकरीचे—-
“विठ्ठल नामाची शाळा भरली …” दूरवरून एक आवाज रेंगाळतो कानावर–
कल्पनेतली शाळा आकार घेते मनावर–
झटकतो आच्छादन अन मनातले विचार—
शिपाई तो शाळेतला निमूटपणे करतो– शेवटी रूढ पायंडयाचा स्वीकार !!
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈