श्री अरविंद लिमये

☆ मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये ☆

मराठी भाषेच्या शब्दसौंदर्याइतकाच तिचे शब्दसामर्थ्य हाही सखोल अभ्यासाचा विषय आहे. व्यूह हा शब्द याचीच प्रचिती देणारा वाटतो. चांगले आणि वाईट असे दोन्ही अर्थ ल्यालेला हा शब्द!बेत, योजना, धोरण, युक्ति, हे जसे सकारात्मकता ध्वनीत करणारे अर्थ, तसेच कट, कारस्थान, डाव, डावपेच असे नकारात्मकतेच्या कृष्णछायाही याच शब्दाच्या. . ! युध्दात युध्दनीति, रणनीति ठरवताना शत्रुपक्षाच्या कसब/कुवतीचा अंदाज/अभ्यास जसा महत्वाचा तसाच त्यांच्या रणनीतिला छेद देण्यासाठी बुध्दीकौशल्यही तेवढेच आवश्यक. . ! हे बुध्दीकौशल्य अपरिहार्य ठरतं जेव्हा शत्रूपक्ष सर्वार्थाने प्रबळ असतो. ठाम निर्धार, खंबीर मन,  संघटन कौशल्यआणि उत्कट राष्ट्रप्रेम याच मुख्य भांडवलाला तीव्र बुध्दीमत्तेची जोड मिळाली आणि शिवाजीमहाराजांनी अतिशय प्रबळ मोगलसम्राटाशी लढताना युध्दनिती ठरवली ती स्वनिर्मित अशा ‘गनिमी कावा’या संकल्पनेनुसार. . !

व्यूह या शब्दाला रचनाकौशल्याची जोडही तेवढीच आवश्यक असते. विशेषत: बुद्धीबळासारख्या खेळात(लुटूपुटूच्या लढाईत)सुध्दा व्यूहरचनाकौशल्य अपरिहार्यच. . !

युध्दरचना, युध्दनीति यांची कसोटी लागते ती रणांगणावर हे कालपरवापर्यंतचं

वास्तव होतं. पण कालौघात व्यूहरचनेची गरज ही आज कुटुंबव्यवस्थेलाच खिळखिळी करु पहात आहे. सहजीवनातील अस्वस्थता, घटस्फोटांचं वाढत चाललेलं प्रमाण ही कौटुंबिक पातळीवरील छुप्या युध्दाचीच परिणती. या रणांगणावर व्यूह शब्दाचे नकारात्मक अर्थच ठळक होतात आणि ते सार्थ ठरवायला कट कारस्थानं प्रबळ होतात. टोकाचा आत्मकेंद्रीपणा नात्यातला गोडवा शोषून घेत स्वत; पुष्ट होत जातो आणि युध्दशस्त्रं परजली जातात. परस्पर सामंजस्य रणांगणावरील युध्दविरामासाठी अपरिहार्य असतं तसंच गृहकलहातही. देवाणघेवाण तिथल्यासारखी इथेही. पण इथे त्याची जाणिव  व्हायची तर ती उशीरा सुचलेल्या शहाणपणा सारखी नसावी हे आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण त्या युध्दांच्या बाबतीत रम्य वगैरे असणार्या ’ युध्दस्य कथा’ या प्रकारच्या युध्दात मात्र अतिशय क्लेशकारक असतात. . . !

 

© श्री अरविंद लिमये

सांगली.

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments