सौ.मंजुषा सुधीर आफळे
मनमंजुषेतून
☆ हितगुज ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆
आज गौराईचे विसर्जन . प्रत्यक्ष जगत्जननी माहेरपणाला आली होती . तीन दिवस तटस्थ व्रतस्थपणे उभी होती . माझे घर न्याहाळत होती . नुसत्या कुंकवाचा तिलक लावल्यामुळे किती तेजस्वी व प्रसन्न दिसत होती . घरभर फिरली . दृश्य अदृश्य गोष्टी पाहात होती . अगदी तिच्या स्वागतासाठीचा माझा आटापिटाही तिने पाहिला असेल . मी केलेल्या पाहुणचाराने ती खूश झाली असेल ना ! आज तिने निरोप घेतला . तरीही तिच्या अस्तित्वाचा सुवास सुगंध घरभर दरवळत आहे . माझ्या मनातही तो रेंगाळून राहिला आहे . गौराईचा निरोप घेताना डोळे भरून तर येतातच . आरती मधील शेवटच्या कडव्यांचे उच्चारही कधी कधी नीट होत नाहीत . मन भरून येते .
चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी॥
लिहिल्या असतील माते माझे निज भाळी॥
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ॥
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥
हे आई , माझ्या नशिबात सर्वच कुशल मंगल असणार नाही हे मी जाणते . पण तू माझ्याजवळ असलीस तर सर्व अमंगल आपोआप पुसून जाईल . प्रथम आम्हाला स्वतःमधील वाईट गुणांचे , वाईट सवयींचे विसर्जन केले पाहिजे . चराचरातील प्रत्येकाकडे सहृदयतेने पाहिले पाहिजे . तूच दिलेल्या दिव्य शक्तीची आम्हाला जाणीव झाली पाहिजे .
‘ थोडी श्रद्धा व विश्वास माझे ठायीं ठेवा म्हणजे या संसाररूपी खेळात तुम्हाला आनंद मिळेल,’ असेच काही तू सांगत होतीस ना !
खरेच आई आज थोडे थोडे कळते आहे . जीवनातील हा संसाररूपी खेळ म्हणजे एक श्रेष्ठ शाश्वत सत्य आहे . या सृष्टीत माणसाने सुखाने जगावे म्हणून तू किती भरभरून दिले आहेस . तुझी प्रत्येक निर्मिती रसपूर्ण , सौंदर्य युक्त आणि परिपूर्ण आहे . पण आम्हाला हे समजून घेण्याला किती काळ जाईल कोणास ठाऊक ? चराचरात तुझ्यामुळे व्यापून असलेला आनंद आम्हाला कधी ओळखता येणार ? भरभरून देण्यामधले समाधान आम्हाला कधी कळणार ? केवळ ममतेने जग जिंकता येते हे कधी अनुभवता येणार ? प्रत्यक्षात पृथ्वीतलावर स्वर्ग लोकाची अनुभूती येईल असा सुदिन लवकर येवो, म्हणजे तुझ्या आरतीचा अर्थ खऱ्या अर्थाने आम्हाला कळेल .
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी॥
वससी व्यापक रूपे तू स्थूलसूक्ष्मी॥
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
विश्रामबाग, सांगली.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈