सौ राधिका भांडारकर

? मनमंजुषेतून ?

☆ अशीही शाळा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

जीवनाच्या वाटचालीत अनेक नाती जुळली. काही टिकली काही कालांतराने विरली. कळत नकळत अनेकांनी शिकवण दिली .संस्कार केले जे मनावर कायम कोरले गेले…पण आज लिहावसं वाटतंय् ते माझ्या सासुबाईंबद्दल—नवर्‍याची आई म्हणून माझ्या सासुबाई—हे माझं आणि त्यांचं धार्मिक नातं. पण त्या पलीकडे आमचं एक वेगळं नातं होतं—एक सांगते,मी त्यांना आई म्हणत असले, तरी सासू  ही आईच असते वगैरे आमच्या बाबतीत नव्हतं—आणि ही आमची सून नसून मुलगीच आहे बरं का—असंही त्या कधी म्हणाल्या नाहीत—

घराचा उंबरठा ओलांडला तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, “ये आत सुनबाई. आता हे तुझंही घर—”

डोईवरुन घेतलेला नऊवारी साडीचा ऐसपैस पदर, कपाळावरचं ठसठशीत कुंकु, अंगावर चमचमणारी पारंपारिक भारदस्त सौभाग्यलेणी, गौर वर्ण, मध्यम पण ताठ अंगकाठी, आणि नजरेतला एक करारीपणा—-

सुरुवातीला नातं जुळवायला खूप कठीण गेलं—सगळंच वेगळं होतं—

मी स्वतंत्र कुटुंबात वाढलेली. मुक्त. मोकळी. स्वत:ची मतं असणारी. शिक्षित, नोकरी करणारी—

इथे वेगळं होतं—मोठ्ठं कुटुंब–चार भिंतीतली निराळी संस्कृती–नात्यांचा गोतावळा–परंपरा–आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेलं आईंचं प्रभावी व्यक्तीमत्व ! दरारा—त्यांचं सपासप आणि फटकारुन बोलणं—

पण व्यवसायाच्या  निमित्ताने आम्ही गावापासून काही अंतरावरच्या शहरात रहात होतो—त्यामुळे त्या घराचा आणि संस्कृतीचा मी दूरचा भाग होते—

पण हे असं वाटणं, भय, तुटणं, वैवाहिक जीवनाची अनिश्चितता, हे सर्व सुरुवातीला होतं—-

पण इतक्या विसंगतीतही आमचं नातं एका वेगळ्या स्तरावर घडत गेलं, जुळत गेलं, हे विशेष होतं—दोघींनाही आपले किनारे सोडणं सुरवातीला कठीण होतं— पण हळुहळु मी त्यांच्यात वसलेल्या एका स्त्रीचं स्वरुप पाहू लागले..आणि मला ते आवडायला लागलं—

एकदा म्हणाल्या, ” अग्गो आठ मुलं झाली मला…रात्रीचा दिवस करुन वाढवलं…पण यांनी कधी हातही लावला नाही…रडलं म्हणून थोपटलंही नाही…कुटुंबाच्या रगाड्यात मुलांकडे बघायलाही वेळ नसायचा—-सीताकाकु म्हणायची हो–” माई उचल ग लेकराला. घे पदराखाली. मरो ते काम…”

पुढे म्हणाल्या, ” तुझं बरं आहे–दादा किती मदत करतो तुला—पण मी म्हणते कां करु नये त्याने तुला मदत—-संसार दोघांचाही असतो ना…”

घट्ट अटकळी असलेल्या त्यांच्या मनातल्या या उदारमतवादांनीही मी चकीत व्हायची…

कळत नकळत मीही त्यांच्याकडून खूप काही शिकत होते. वैवाहिक जीवनाच्या कविकल्पना जिथे संपतात, तिथून सुरु होतो संघर्ष. एक कांटेरी सत्याची वाट. हे काटे बोथट कसे करायचे हे मी आईंकडून  शिकले.

एक प्रकारे त्या माझ्या वैवाहिक जीवनाच्या गुरुच ठरल्या—त्यांच्याकडून मी खूप धडे घेतले—

एकदा त्या मला म्हणाल्या होत्या, ” तुझं बराय. तू मनातलं स्पष्टपणे बोलून मोकळी होतेस..आमचं आपलं ,ओठातलं ओठात आणि पोटातलं पोटातच राहिलं… पण असं बघ, नाती सुद्धा टिकवावी लागतात ग….”

एकत्र कुटुंबातले अनेक पडझडीचे किस्से त्या मला सांगत…त्यावेळीही त्यांच्यातली एक जबरदस्त निर्णयक्षम, धडाडीची स्त्री मला दिसायची…कधी विद्रोही ,कधी भेलकांडलेली ,कधी हताश, परावलंबी, स्वप्नं असणारी स्त्रीपण मी त्यांच्यात पाहिली—त्यांच्या या वेगवेगळ्या रुपांमुळे मीही एक स्त्री म्हणून घडत होते—

मी कशी असावे आणि मी कशी नसावे हे त्यांच्यामुळे मला समजत होतं—मला हेही जाणवत होतं की त्यांना माझ्यातल्या अनेक गोष्टी पटत नव्हत्या ,त्या त्यांनी स्वीकारल्या असंही नव्हे. पण विरोध नाही केला— मी कधी नवर्‍याच्या बाबतीत तक्रार केली तर त्यांचे मुलाविषयी ऐकताना डोळे गळायचे…पण म्हणायच्या—” बयो स्त्री होणं सोपं नसतं….”

आईंशी गप्पा मारताना वाटायचं आई म्हणजे एक स्त्री शिक्षण देणारी शाळाच आहे….

परातीत सरसर भाकरी थापणारे त्यांचे गोरे गोंडस हात तर मला आवडायचेच. पण त्याबद्दल त्या जे बोलायच्या ते खूपच महत्वाचं होतं—

“बघ गोळा घट्ट नको ,सैल नको, एका हातानं थापत दुसर्‍या हातानं अलगद आकार द्यायचा बरं का—थापताना परातीत पीठ नीट नाही ना पसरलं तर भाकरी वसरत नाही–आणि हे बघ, हलकेच मनगट वर करुन तिला उचलून तव्यावर ठेवायचं. तापलेल्या भाकरीला पाण्यानं सारवून थंड करावी लागते, म्हणजे मग ती टिचत नाही ..सुकत नाही…..”

त्या सहज बोलायच्या .बोलता बोलता चुलीतली लाकडं मागे पुढे करुन जाळ जुळवायच्या. पण भाकरीच्या निमित्ताने जीवनातलं संतुलन, संयम, चढउतार, या सर्व स्थानकांवरचा प्रवास घडायचा–

किती लिहू—-

त्यांच्यात वेळोवेळी  दिसलेलं ‘ जुनं ते सोनं ‘ मला खूप भावलं—

नव्वद वर्षाचं परिपूर्ण आयुष्य जगून त्यांनी जगाचा निरोप घेतला..

आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा गादीवर एक क्षीण देह होता. काहीच उरलं नव्हतं..

नवर्‍याने जवळ जाऊन फक्त ‘आई ’ म्हटलं—हळूहळू त्यांनी हात उचलले, आणि त्यांच्या गालावर फिरवून एक थरथरता मुका घेतला—-

तेव्हा वाटलं, सगळं संपलं. पण त्यांच्यातील आई नव्हती संपली—-ती कधीच संपणार नव्हती—-

आज त्या नाहीत–पण त्यांचं अस्तित्व आहे—

आज त्यांच्या आठवणी मी मुलींना सांगते—-

कळत नकळत त्यांनाही “ याला जीवन ऐसे नाव “ हे कळावे…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments